नाशिक : नाशिक विभाग अद्यापही मान्सूनच्या प्रतीक्षेत आहे. अशातच नाशिक विभागासाठी एक चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. सध्या पशुधनासाठी अवघा पाच महिने पुरेल इतकाच चाऱ्याचा साठा नाशिक विभागात उपलब्ध असल्याचे प्रशासनाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. एकीकडे पावसाला होत असलेला विलंब, वाढती पाणीटंचाई आणि काही भागांत चारा-पाण्याचा निर्माण झालेला तुटवडा यामुळे शेतकरी आणि पशुपालकांच्या चिंतेत आता आणखी भर पडणार आहे. सध्या तातडीचे संकट नसल्याचा दावा प्रशासन करत असले, तरी मान्सून आणखी लांबल्यास परिस्थिती गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
https://prahaar.in/2026/06/15/the-monsoon-session-of-the-legislature-will-be-held-from-june-22-to-july-10/
नाशिकची आकडेवारी काय सांगतेय ?
नाशिक विभागात सध्या तब्बल एक कोटी १९ लाख मेट्रिक टनांहून अधिक चारा शिल्लक असल्याची माहिती प्रशासनाच्या आकडेवारीतून समोर आली आहे. हा साठा सध्याच्या गरजेनुसार साधारणपणे पाच महिने पुरेल इतका आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली, तरी पुढील काही महिन्यांतील पावसाची स्थिती पशुधनासाठी महत्त्वाची असणार आहे.
नाशिक विभागात एकूण ८१ लाख ८१ हजार ६७० लहान-मोठी जनावरे आहेत. या पशुधनासाठी दरमहा सुमारे १९ लाख ७६ हजार ८५ मेट्रिक टन चाऱ्याची गरज असते. यंदाच्या खरीप हंगामात विभागात साधारणतः ४४ लाख १४ हजार ५६४ मेट्रिक टन चारा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे सध्या जनावरांच्या खाद्याची मोठी समस्या निर्माण झालेली नसली, तरी प्रशासनाकडून सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.
https://prahaar.in/2026/06/15/an-example-of-honesty-amidst-discussions-about-the-high-handedness-of-rickshaw-drivers/
जिल्ह्यांची काय स्थिती ?
विभागातील काही जिल्ह्यांमध्ये चाऱ्याचा साठा अधिक आहे. अहिल्यानगर जिल्हा चाऱ्याच्या उपलब्धतेत आघाडीवर असून, येथे तब्बल ८३ लाख ६५ हजार १३९ मेट्रिक टन चारा शिल्लक आहे. तर धुळे जिल्ह्यात सुमारे १७ लाख ४३ हजार ६८० मेट्रिक टन चाऱ्याचा साठा उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे काही भागांना तात्पुरता दिलासा मिळत असला, तरी सर्वच तालुक्यांमध्ये परिस्थिती सारखी नाही.
नाशिक विभागातील अनेक भाग आधीच पाणीटंचाईच्या झळा सोसत आहेत. येवला, मालेगाव, इगतपुरी आणि सिन्नर तालुक्यांतील अनेक गावांना सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांसाठी पाणी उपलब्ध करून देणेही प्रशासनासमोर मोठे आव्हान बनले आहे. त्यात आता चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला तर परिस्थीती अधिक गंभीर बनू शकते.
https://prahaar.in/2026/06/15/only-26-percent-water-reserves-remain-in-nashik-division/
चारा खरेदीसाठी अतिरिक्त आर्थिक भार
काही ग्रामीण भागांत पशुपालकांना चारा आणि पाण्याची कमतरता जाणवू लागली आहे. चारा छावण्या आणि चारा डेपो तातडीने सुरू करण्यात यावेत, अशी मागणी पशुपालकांकडून होत आहे. अनेक ठिकाणी जनावरांच्या संगोपनाचा खर्च वाढला असून, चारा खरेदीसाठी अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत असल्याचीही तक्रार शेतकरी करत आहेत. प्रशासनाने मात्र सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला आहे. पाणीपुरवठ्यासाठी टँकर व्यवस्थेवर विशेष भर देण्यात येत असून, गरज भासल्यास चारा छावण्या सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे संकेत देण्यात आले आहेत.
दरम्यान, हवामान खात्याकडून मान्सूनच्या आगमनाबाबत अजूनही अनिश्चितता कायम आहे. शेतकरी आणि पशुपालकांचे लक्ष आता पावसाकडे लागले आहे. कारण, वेळेत पाऊस न झाल्यास पाण्याबरोबरच चाऱ्याचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.