Home संपादकीय अग्रलेख कोणाला घाई आहे?

कोणाला घाई आहे?

0
कोणाला घाई आहे?
Nationalist Congress Party

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असली, तरी पक्षासमोरचा खरा प्रश्न काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा नसून भविष्यातील राजकीय दिशा ठरवण्याचा आहे.

आपल्याच प्रदेशाध्यक्षांच्या तक्रारी घेऊन दिल्लीत मोर्चेबांधणी करायला गेलेले काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले येताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या काँग्रेसमधील विलीनीकरणाची बातमी घेऊन आले. पटोले यांनी फोडलेल्या या बातमीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेच प्रतिक्रिया दिल्याने बातमीचं महत्त्व साहजिकच वाढलं. काल दिवसभर माध्यमात त्याचीच चर्चा होती. अनेक माध्यमांनी या बातमीचं श्रेय उबाठाच्या अ. भा. प्रवक्त्यांना दिलं असलं, तरी ते खरं नाही. कारण, त्यांनी फक्त इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या अशा अनेक अतृप्त इच्छा महाराष्ट्राला अधूनमधून ऐकाव्या लागतातच. ते देशाला; कधी तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अखिल विश्वाला आपले जे मौलिक सल्ले देत असतात, त्याने सगळ्यांची करमणूक होते, वृत्तवाहिन्यांचा दिवस निघतो; पण त्या पलीकडे त्याला काही किंमत मिळत नाही. यावेळीही दिल्लीत सोमवारी झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर ‘काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतरही त्या विचारांशीच बांधिलकी ठेवलेल्या सर्व प्रादेशिक पक्षांनी पुन्हा काँग्रेसमध्ये सामील व्हावं आणि काँग्रेसची ताकद वाढवावी’ असा उपदेश त्यांनी केला. हा उपदेश देशातल्या बऱ्याच पक्षांना होता.

https://prahaar.in/2026/06/13/india-vs-afghanistan-opportunity-for-ishan-kishan-against-afghanistan-indias-probable-playing-xi/

पण, महाराष्ट्रात ज्यांना याचं निमित्त हवं होतं, त्यांनी हा उपदेश राष्ट्रवादी शरद पवार पक्षालाच आहे, असा अर्थ काढून त्यावर चर्चा सुरू केली. पहिल्या दिवशी खासदार सुप्रिया सुळे यांनी तातडीने दिलेली प्रतिक्रिया ‘काळ ठरवेल, तसं होईल’ अशी सावध आणि मोघम होती. पण, चर्चेचा चेंडू कोणाकडून कुणाकडे जातो आहे आणि तो कोण खेळवतं आहे, याचा अंदाज येताच दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी त्याचा स्पष्ट शब्दात इन्कार केला. पहिल्या दिवशीच्या बातम्यांमध्येही मोठी गंमत होती. विलीनीकरणाचा प्रस्ताव कोणी कोणाला दिला? यातही प्रत्येकाची स्वतंत्र ‘पतंगबाजी’ सुरू होती. कोणाचं म्हणणं असा प्रस्ताव काँग्रेसने राष्ट्रवादीला दिला, तर कोणाचं म्हणणं राष्ट्रवादीनेच काँग्रेसला दिला! थोडक्यात, जिथून बातमी सुटली, त्यांच्याकडून महत्त्वाचे तपशील विशेषकरून अधोरेखित करायचे राहून गेल्याने ज्याने त्याने आपापल्या तर्कबुद्धीने बातमी ‘चालवली’. बातमीतला एकूण जीव पाहता, ती फार चालेल, असं वाटत नाही.

https://prahaar.in/2026/06/13/bhandup-news-dispute-involving-street-vendors-escalates-in-bhandup-senior-citizen-allegedly-assaulted-police-take-action/

बातमी आली कधी? नेमक्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या मुहूर्ताला. अ. भा. प्रवक्त्यांचा हेतू वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातील भाषणात या मुद्द्याला महत्त्वाचं स्थान मिळावं आणि त्याचं श्रेय आपल्याला मिळावं, एवढाच नेहमीप्रमाणे असणार. पण, प्रत्यक्षात त्या मेळाव्यात तसं काहीच घडलं नाही. राष्ट्रवादी शरद पवार गट थकला आहे, हे सध्या सुरू असलेल्या विधान परिषद निवडणुकीत दिसतंच आहे. यापूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही पक्षाचा किती शक्तिपात झाला आहे, हे दिसलं होतंच. त्यामुळे, विधानसभा निवडणुका जवळ येताच या पक्षाचे आमदार (आणि कदाचित त्याआधी खासदार) आपापल्या वाटा शोधणार, हे उघड आहे. स्वतःच्या मतदारसंघातील राजकीय परिस्थिती आणि आपल्या गरजेनुसार भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट कोणासाठी किती ताकद लावतो, यावर ही सगळी विभागणी अवलंबून असेल. तोपर्यंत आहे त्या स्थितीत वाट पाहात राहिलो, तर आपलं सौदामूल्य पूर्ण संपेल, याची कल्पना पक्षनेतृत्वाला आहे. त्यामुळे, खासदार सुळे यांच्या केंद्रातील मंत्रीपदासह राज्यात काही मंत्रीपदं पदरात पाडून घेऊन भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची वाट धरायची, की वैचारिक निष्ठेचा खांब पकडून ठेवून आपलं नैतिक मूल्य वाढवायचं, आणि ‘इंडिया आघाडी’त दामटून राहायचं, या द्विधेत पक्षनेतृत्व आहे. देशातील वातावरणाचा अंदाज ते त्यासाठी घेत असावेत. नेमक्या अशावेळी त्यांची आणि काँग्रेसची विलीनीकरणाची बोलणी सुरू आहेत, अशी बातमी ज्यांनी पसरवली, त्यांनी आपल्या पक्षाचं हित पाहिलं, की शरद पवार गटातल्या खासदार – आमदारांना हलवून जागं केलं, हा प्रश्न आता काँग्रेसमध्येच काही जण विचारत आहेत. पटोले दिल्लीहून स्वतःसाठी नेमका काय निर्णय घेऊन परतले, ते लवकरच आणखी स्पष्ट होईल.

https://prahaar.in/2026/06/13/fifa-world-cup-2026-legendary-brazilian-footballer-brito-passes-away-on-the-very-second-day-of-the-world-cup/

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या रोज चिंधड्या उडताहेत. परिवारवादाच्या मुद्द्यावरून खासदार, आमदार पक्षत्याग करून भारतीय जनता पक्षाची वाट धरताहेत.
त्यामुळे, ममता बॅनर्जी यांना या क्षणी ‘इंडिया आघाडी’चा आधार हवा आहे. त्यासाठी त्या खासदार सोनिया गांधी यांची गळाभेट घ्यायलाही तयार झाल्याचं सगळ्या देशाने पाहिलं. काँग्रेसची ज्या वेगाने घसरण सुरू आहे, ती सावरायला पक्षाला राजकीय मुत्सद्देगिरीची गरज आहे. गांधी घराण्याने अन्य नेत्यांना, राज्या-राज्यातल्या मित्र पक्षांना बरोबरीने वागवण्याची, थोडी मोकळीक देण्याची गरज आहे. त्याची खात्री जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत कोण कशाला परत जाईल किंवा ‘इंडिया आघाडी’ मजबूत करण्यासाठी कष्ट घेईल? काँग्रेसमधल्या दिग्विजय सिंह यांना किंवा अ. भा. प्रवक्त्यांना असं कितीही वाटत असलं, तरी सहा दशकं पूर्णवेळ राजकारणात घालवलेल्या शरद पवार यांना आपला पक्ष ‘बुडत्या जहाजा’वर नेऊन ठेवावा, असं कसं वाटेल? आताची त्यांची कृती ही त्यांच्या राजकारणातल्या अखेरच्या टप्प्यातला फार महत्त्वाचा निर्णय असणार आहे. तो त्यांना घ्यायचाच आहे, पण काही प्रश्नांची उत्तर मिळाल्यानंतर. ती उत्तरं मिळण्यावर त्यांचा निर्णय अवलंबून असेल. त्याला अजून वेळ आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here