नवी दिल्ली : दिल्लीतील (Delhi) तुघलकाबाद परिसरात गुरुवारी मध्यरात्री एका पाच मजली निवासी इमारतीला भीषण आग (Fire) लागल्याने तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाला, तर सहा जणांना अग्निशमन दलाने सुरक्षित बाहेर काढले. तळमजल्यावरील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांना आग लागल्यानंतर संपूर्ण इमारत धुराने भरून गेली आणि अनेक रहिवासी आत अडकले.
मिळालेल्या माहितीनुसार, तळमजला अधिक पाच मजली असलेल्या या इमारतीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या तीन स्कूटर, दोन दुचाकी आणि एका सायकलला (Cycle) अचानक आग लागली. काही क्षणांतच धूर आणि आगीच्या ज्वाळा संपूर्ण इमारतीत पसरल्याने रहिवाशांमध्ये घबराट उडाली.
https://prahaar.in/2026/06/12/sindhudurg-murder-news-shocking-plot-to-murder-a-friend-in-phonda-ghat-exposed-body-and-two-wheeler-thrown-into-the-valley-to-stage-an-accident-4-arrested/
घटनेची माहिती मिळताच दिल्ली अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. बचाव पथकाने (Rescue Team) तत्काळ कारवाई करत सहा जणांना सुरक्षित बाहेर काढले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पहाटे सुमारे ३:४५ वाजता आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले.
अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण आठ जणांना इमारतीतून बाहेर काढण्यात आले होते. त्यापैकी सफदरजंग रुग्णालयाच्या बर्न वॉर्डमध्ये दाखल केलेल्या पाच महिलांपैकी दोन महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेल्या तीन जणांपैकी एका पुरुषाचा मृत्यू झाला असून उर्वरित दोन महिलांवर उपचार सुरू आहेत.
वेळीच बचावकार्य केल्यामुळे मोठी जीवितहानी टळली असली तरी या दुर्घटनेने दिल्लीतील अग्निसुरक्षेच्या व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विशेष म्हणजे, अलीकडच्या काळात दिल्लीतील घरे, हॉटेल्स (Hotels) आणि व्यावसायिक इमारतींमध्ये लागणाऱ्या आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून अनेकांना जीव गमवावा लागला आहे.