मोरपीस – पूजा काळे
वेड्या मना गुंतताना
कर विचार एकदा
जागेपणी स्वप्न वेडी
पडतील अनेकदा ।
वेदना कोवळी आली
अलगद ओठावरी
तू न जाणे की न जाणे
मन उधाण वाऱ्यावरी
श्वास घे रे ध्यास दे रे
जगणे दे माझे मला
हात हातात घेऊन
घालते शपथ तुला ।
सजले धजले मन
अंगीया आले उधाण
हळुवार या वाऱ्याचे
पायी बांधू रूणझुण ।
कोणीचं नाही कोणाचे
तू तिथे अन् मी इथे
आतुरलेल्या क्षणांना
करून जाशी पालथे।
माझ्याचं कवितेच्या या ओळी वारंवार तरंग निर्माण करतात. अथांगच्या लाटेत मी पणा विरून जावा. सागराला साक्ष ठेवत बांधलेली नाती, स्वप्नांचे मनोरे, तुझ्यासोबतच्या आठवणीं सोनेरी वाळूत रित्या कराव्यात. शब्दांना मुक्त करून हृदयातली खळखळ ओरडून सांगावी. मनात जपलेली रूजुता दोघांच्या मनोभूमिकेला जोडणारं सुदृढ नातं वाऱ्याशी जोडून घ्यावं, त्याला आपलसं करत हितगुज करावं. प्रेमाचा सांगावा धाडावा आपल्या प्रिय व्यक्तीला. थोडं रूसून थोडं हसून वाद घालावे जन्मभराचे.
मन उधाण वाऱ्याचे,
गुज पावसाचे
का होते बेभान कसे गहिवरते…
मनाचा पहिला आणि शेवटचा पैलू म्हणजे गहिवरणं होय. खूप बोलायचं असून देखील बोलता येत नाही तेव्हा प्रकर्षाने जाणवणारा भाव म्हणजे गहिवरून येणं. पावसाची संततधार, खट्याळ वाऱ्यासह गहिवरलेल्या मनाची पाती निसर्गासंगे बोलू लागतात.
चमत्कार अवनीचा पाहण्यास ।
मी जाय धरणी माझी माय।।
ह्या हिरव्या पांदण वाटा।
कसे ओढती माझे पाय।।
बेधुंद वाहतो वारा।
तनमन पुलकित सारे।।
वसुंधरेला खुणावती ही सताड उघडी दारे।
समिंदराला उधाण येता हवे आणखी काय?।।
ह्या हिरव्या पांदण वाटा ओढती माझे पाय।
वाऱ्याच्या संगतीने डुलते ।।
हिरवे हिरवे रान,।
किलबिलणारी पाखरे बसली ।।
फांदीवरती छान।
दूरस्थ कोकिळ पानाआडून लयीत गाते माय।। ह्या हिरव्या पांदण वाटा।
ओढती माझे पाय ।।
सुंदर नयनरम्य निसर्गाच्या झुल्यावर हेलकावे खाऊ लागलेलं मन शरीरात नक्की कुठे असतं? आशिकीमुळे दिल की धडकन वाढते आणि रोमांचित तनू अवस्था होते. प्रेमात पडलेला प्रत्येकजण जेव्हा परस्पर आकर्षित होतो तेव्हा उधाणलेल्या बेधुंद वाऱ्यासारखी अवस्था होते.
https://prahaar.in/2026/06/10/pm-modi-meloni-modis-historic-record-breaking-feat-special-wishes-arrived-directly-from-italy-giorgia-meloni/
मन उधाण वाऱ्याच्या निर्मितीतला दुसरा प्रकार मजेशीर आणि शिकण्यासारखा आहे. आपल्याकडे महिन्यातील काही रविवार करमणुकीच्या कार्यक्रमाने सजलेले असतात. मागील काही वर्षांत लक्ष देता न आल्याने, उतारवयातील विरंगुळ्याचे साधन म्हणा किंवा, गतस्मृतीनां उजाळा देण्यासाठी किंवा साधता न आलेल्या गोष्टींचा परिपाठ घडवून आणण्यासाठी विविध ठिकाणी ज्येष्ठालयं आणि वाचनालयासारखी दालन महिला पुरुष वर्गासाठी खुली आहेत. आमच्या शेजारच्या ज्येष्ठालयात असा एखादा कार्यक्रम रंगणार आहे याची सकाळपासून मला कुरबुर लागली होती. तेव्हा एक विचार डोक्यात आला, साठीपार केलेले वयस्कर तरुणाईला लाजवतील का? त्यांना वावरताना पाहिलं की किती भारी वाटेल? काय विशेष असेल आज? न राहवून माझे पाय ज्येष्ठालयाकडे वळले. आत प्रवेश करताचं सुखद अनुभवी गारवा जाणवला. त्या शोभिवंत, ऐटदार माणसांच्या चालीत संथपणा असला तरी मनाची उमेद कार्यक्रमास साजेशी होती. स्वागताला मनवेधक दारातली रांगोळी, सनईचे सूर, सुगंधी चाफ्याचा अत्तर शिडकावा. निमित्त होतं आजोबांच्या पंच्याहत्तरीचं आणि त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं. प्रकाशनाचा हा कौतुक सोहळा रंगणार हे जाणून मी स्थानापन्न झाले. काही वेळात शांतता पसरली. माईकचा आवाज आला. स्वागत करू या ‘मन उधाण वाऱ्याचे’ पुस्तकाच्या लेखकाचे. आवाज माध्यम असेल तर शब्द भांडवल आहेत. या मनाचं त्या मनाला समजायला तेवढंही पुरेसं आहे. गोड गळ्याच्या निवेदिकेने सुरुवात करताचं सभागृह टाळ्यांनी दणाणलं. लेखकाचं अभीष्टचिंतन, पुस्तकाचं शीर्षक यावरील निवेदन हळुवार स्पर्शून जात होतं. तरल मनाच्या अवस्थेत निवेदिकेचे शब्दही तरल झाले होते. काही सेकंदात बेधुंद मनाच्या लहरींची पकड घट्ट होत होती. मनाच्या डोहातले आनंदाचे डोई, आनंद तरंग अनुभवत होते मी. तरंग लाटेत लपेटलेली मी आणि माझी मनोवस्था अशी झाली होती. मन प्रत्येकात असणार, क्षणाक्षणाला दाटणार, उधळलेल्या मनाचे सूर घुमणार. अशा मनाच्या व्यथा आणि कथा किती लोभस, गोजिऱ्या, साजिऱ्या, क्लेषदायक असतील नाॽ मन ज्याची-त्याची अंतर्भूत गोष्ट, एक दिव्य शक्ती आहे ती ज्याला पेलते तो सावरतो. अन्यथा भरकटलेल्या मनाच्या व्यथाचं विखुरलेल्या दिसतात. कवी सुधीर मोघे यांनी किती सुरेख शब्दात व्यक्त केली आहे मनाची अवस्था.
मन मनास उमगत नाही,
आधार कसा शोधावा?
स्वप्नातील पदर धुक्याचा
हातास कसा लागावा?
मन थेंबांचे आकाश लाटांनी सावरलेले
मन नक्षत्रांचे रान अवकाशी अवतरलेले
मन गरगरते आवर्त,
मन रानभूल, मन चकवा
https://prahaar.in/2026/06/10/agriculture-minister-dattatreya-bharne-complete-panchnama-of-fruit-crops-disrupted-due-to-stormy-weather-early-in-the-night-provide-immediate-help-to-farmers/
अशा मनाची मनोहारी सावली समजून घेणं खूप महत्वाचं आहे. बाल्यावस्था ते शेवटच्या श्वासापर्यंत मन नावाची गोष्ट आपल्यासोबत असते. ज्याला आकार नसतो पण त्याचं अमूक चित्र साकारता येतं. मन रसिक बनतं तेव्हा रंगबिरंगी फुलपाखरू होतं. त्याचा प्रवास या फुलावरून त्या फुलापर्यंत होतो. असं फुलपाखरी मन उत्साही, निरागस, प्रेमळ, सोज्वळ असतं जे नानारूप धारण करतं. मनाच्या कितीतरी भावावस्था सांगता येतीलं. आईच्या गर्भाशयापासून ते नात्यातलं विविधांगी नटलेलं मन. वारा सांगू पाहतो. पक्षी गाऊ लागतात. फुलं उमलू लागतात. प्रेमी युगुलांच अंतःबाह्य उजळलेलं मन, भेटीसाठी आसूसलेलं मन डोळ्यांतून पाझरतं. कधी मनातली गुंतागुंत कलाकार आपल्या दमदार अभिनयाने तोरा मन दर्पण कहेलाये म्हणत साकारतात.किनाऱ्यावर ऊभ राहून समुद्राची अथांगता तपासता येत नाही, तसचं एखाद्याच्या मनाचा थांगपत्ता लागणं कठीण. त्यासाठी मनाची भाषा समजून नय्या पार करावी लागते. मन तरल भावनांचा वाहता झरा, मनीचे गुज कुणास गवसले अशा मनाला किती उपमा द्याव्यात. सागराएवढे, आकाशाएवढे मन वायूवेगे धावते. संत बहिणाबाई आपल्या कवितेत म्हणतात. ‘मन वढाय वढाय उभ्या पिकातील ढोर’. रामदास स्वामीनी ‘मना सज्जना भक्ती पंथेची जावे’ असे मार्मिक श्लोक केलेत, तर ‘मनी वसे ते स्वप्नी दिसे’ म्हणणारा मनाचा आगळा वेगळा खेळ इथं खेळला जातो. निराशा, आनंद, दुबळेपणा, अस्वस्थता, हळवेपण अवस्थेतून मन फेरफटका मारतं. मनाच्या निग्रहाने आत्मविश्वास उंचावतो. यशाचे शिखर गाठण्यास मदत होते. मन प्रत्येकी वसतं प्रत्येकात असतं. मन चराचर, मन नश्वर, मन ईश्वर. वाऱ्याच्या झुळकेसरशी हळुवार मनाच्या शाईसारखं सभागृहातील गच्च वातावरणात माझं मन हेलकावे खात होतं. या वयातली लेखकाची कलाकृती म्हणजे गतस्मृतींचा बहरलेला वेल, कथानकाच्या रूपात अभिव्यक्त होणं. सारं अद्भुत. वयाला साजेशी ताकद आणि व्यक्त होण्याचं सामर्थ्य मनाशिवाय कोणी देऊ करत नाही. ‘‘मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण’’ संतांच्या अभंगातली सकारात्मकतेची झालर मनाची आणि त्यायोगे आनंदाची द्वार खुली करतात. टाळ्यांच्या आवाजाने प्रकाशन संपन्न झाल्याचं लक्षात येताच मी ओशाळले. म्हणजे इतका वेळ मी माझ्या मनोराज्यात फेरफटका मारत होते तर! मनोमनी स्वर्णिम आनंद होता मन चंगा तो, कटौरी में गंगा उक्तिशी येऊन पोहोचल्याचा.