Home महत्वाची बातमी Worli Concert Youth Dies: वरळी कॉन्सर्टमधील तरुणाच्या मृत्यूबाबत मोठा खुलासा; ‘या’ कारणामुळे आयोजकांवर गुन्हा दाखल

Worli Concert Youth Dies: वरळी कॉन्सर्टमधील तरुणाच्या मृत्यूबाबत मोठा खुलासा; ‘या’ कारणामुळे आयोजकांवर गुन्हा दाखल

0
Worli Concert Youth Dies: वरळी कॉन्सर्टमधील तरुणाच्या मृत्यूबाबत मोठा खुलासा; ‘या’ कारणामुळे आयोजकांवर गुन्हा दाखल

मुंबई: मुंबईतील (Mumbai) वरळी (Worli) येथील एनएससीआय डोममध्ये आयोजित म्युझिक कॉन्सर्टदरम्यान झालेल्या २८ वर्षीय तरुणाच्या मृत्यू (Death) प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. प्राथमिक वैद्यकीय अहवालानुसार मृत तरुणाच्या शरीरात मद्याचा कोणताही अंश आढळला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अति मद्यपानामुळे मृत्यू झाल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री आयोजित करण्यात आलेल्या ‘क्लांगकुएन्स्टलर ऑल नाईट’ या संगीत कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर तरुणांनी उपस्थिती लावली होती. वकिलीचे शिक्षण घेत असलेला रुशील गांगुर्डे हा मित्रांसोबत कार्यक्रमासाठी आला होता. रात्री साडेनऊच्या सुमारास प्रचंड गर्दी आणि घुसमटीमुळे त्याची प्रकृती अचानक बिघडली. त्याला तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

प्राथमिक तपासात रुशीलच्या शरीरात मद्याचे कोणतेही अंश आढळले नसल्याने कोंदट वातावरण, प्रचंड गर्दी आणि गुदमरल्यामुळे आलेला हृदयविकाराचा झटका हे मृत्यूमागील संभाव्य कारण असू शकते, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या कार्यक्रमासाठी सुमारे ६ हजार प्रेक्षक उपस्थित होते. तपासादरम्यान कार्यक्रमस्थळी पुरेशी वातानुकूलन व्यवस्था आणि आपत्कालीन वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे आयोजकांच्या निष्काळजीपणाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, या घटनेची माहिती आयोजकांनी पोलिसांना दिली नव्हती. पोलिसांना मृत्यूबाबतची माहिती थेट रुग्णालयाकडून मिळाली. यानंतर वरळी पोलिसांनी आयोजकांविरोधात निष्काळजीपणामुळे मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात आतापर्यंत २० हून अधिक जणांचे जबाब नोंदवण्यात आले असून आयोजकांना नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, शवविच्छेदनाचा अंतिम अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here