जालना: जालना (Jalna) जिल्ह्यातील अंबड येथील तहसीलदार विजय चव्हाण यांना लाच (Bribe) स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात अटक केली आहे. विशेष म्हणजे, ज्या दिवशी ही कारवाई झाली त्याच दिवशी त्यांचा लग्नाचा वाढदिवस होता. कुटुंबासोबत वाढदिवस साजरा करण्याचा त्यांचा बेत असतानाच एसीबीने त्यांच्यावर कारवाई केली. (Jalna News)
मिळालेल्या माहितीनुसार, लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी विजय चव्हाण यांनी वारंवार ठिकाण बदलल्याचे तपासात समोर आले आहे. पैसे घेण्यासाठी त्यांनी अनेक वेळा लोकेशन बदलले, मात्र एसीबीच्या पथकाने त्यांच्यावर बारीक नजर ठेवत अखेर त्यांना पकडले. कारवाईनंतर न्यायालयाने आरोपी तहसीलदाराला २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
https://prahaar.in/2026/06/08/new-claim-in-the-case-involving-a-nashik-based-it-company-nida-khan-reveals-details-about-that-incident/
घरातून रोख रक्कम जप्त
या प्रकरणानंतर एसीबीने छत्रपती संभाजीनगर येथील त्यांच्या निवासस्थानी झडती मोहीम राबवली. या तपासादरम्यान घरातून १ लाख ८ हजार ८०० रुपयांची रोख रक्कम, ९ तोळे सोन्याचे दागिने आणि ८० ग्रॅम चांदी जप्त करण्यात आली. याशिवाय घरात असलेला मोठा स्मार्ट टीव्ही, ड्रोन कॅमेरा आणि लॅपटॉपसारख्या महागड्या वस्तूंचीही नोंद घेण्यात आली आहे.
https://prahaar.in/2026/06/08/pune-crime-pretending-to-be-a-psi-a-small-mistake-exposes-a-female-impersonator-police-officer/
तपासात आणखी काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. विजय चव्हाण यांच्या नावावर छत्रपती संभाजीनगरमधील उच्चभ्रू भागात रो-हाउस आणि फ्लॅट असल्याचे आढळून आले आहे. त्यापैकी एक फ्लॅट गहाण ठेवून कर्ज घेतल्याची माहितीही समोर आली आहे.
दरम्यान, त्यांच्या मालमत्तेचा स्रोत, आर्थिक व्यवहार आणि इतर संभाव्य गुंतवणुकींचा तपास एसीबीकडून सुरू आहे. या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली असून पुढील तपासातून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.