Nashik : स्वदेस फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली पेठ तालुक्यातील काळुणे येथे राबविण्यात आलेल्या जलजीवन प्रकल्पामुळे गावातील प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचले आहे. प्रकल्पासाठी गावातील ५५ लाभार्थ्यांनी प्रत्येकी १ हजार ६०० रुपये याप्रमाणे एकूण ८२ हजार ५०० रुपयांचा लोकसहभाग उभारला तर उर्वरित स्वदेस फांऊडेशनने मदत केली. याशिवाय सुमारे ४५ लाख रुपयांचा निधी खर्च करून शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार उच्च दर्जाची कामे करण्यात आली.
७७ कुटुंबांना आज शंभर टक्के पाणीपुरवठ्याचा लाभ
गावातील १२ पाड्यांपर्यंत पाणीपुरवठा व्यवस्था पोहोचविण्यात आली आहे. अतिरिक्त जलस्रोत निर्माण करण्यासाठी दुसरी विहीर खोदण्यात आली, बोअरवेल करण्यात आल्या तसेच शोषखड्ड्यांची उभारणी करण्यात आली. संपूर्ण यंत्रणा सौरऊर्जेवर आधारित असून दररोज सकाळी सुमारे २० मिनिटे पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टळून प्रत्येक थेंबाचे नियोजनबद्ध व्यवस्थापन होत आहे. गावात सुमारे ६ लाख रुपये खर्चून अत्याधुनिक पाणी साठवणूक टाकी उभारण्यात आली आहे. पाण्याच्या वापरावर नियमित देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत असून प्रत्येक कुटुंबाचा पाणी वापर नोंदविला जातो. देखभाल आणि दुरुस्तीसाठी प्रत्येक कुटुंबाकडून दरमहा ४० रुपये जमा केले जातात.
https://prahaar.in/2026/06/05/investigation-into-nida-khan-case-deepens/
गावातील ७७ कुटुंबांना आज शंभर टक्के पाणीपुरवठ्याचा लाभ मिळत आहे.पाणीपुरवठा योजनेचे सुयोग्य संचालन करण्यासाठी गावात निगराणी समिती स्थापन करण्यात आली आहे. पाण्याचे समान वाटप, वापरावर नियंत्रण आणि सर्व लाभार्थ्यांना न्याय्य सेवा मिळावी यासाठी समिती सातत्याने कार्यरत आहे. ग्रामविकास समितीच्या (व्हीडीसी) माध्यमातून गावकऱ्यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यात आला आहे.
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत गावात एकूण ५८ शौचालयांची उभारणी करण्यात आली. प्रत्येक लाभार्थ्यास १२ हजार रुपयांचे अनुदान मिळाले. ग्रामस्थांना शौचालय वापराबाबत विशेष प्रशिक्षण देण्यात आले. जनजागृती आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे गाव प्रत्यक्षात हागणदारीमुक्त झाले असून स्वच्छतेच्या बाबतीत आदर्श निर्माण केला आहे.
https://prahaar.in/2026/06/05/nashik-road-work-worth-six-crores-begins/
गावातच गांडूळखत निर्मिती सुरू
गाव समितीच्या पुढाकारातून ‘वसुंधरा’ या ब्रँडअंतर्गत गांडूळखत निर्मिती सुरू करण्यात आली आहे. यासोबतच मोगरा लागवड, पशुपालन आणि इतर पूरक उपजीविका उपक्रमांनाही चालना देण्यात येत आहे. स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी व्यापाऱ्यांशी समन्वय साधला जात असून ग्रामस्थांच्या उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत. गावातील ४८ लाभार्थी कुटुंबे शेळीपालन व्यवसायाशी जोडली गेली आहेत. सध्या गावात ३०० हून अधिक शेळ्यांचे संगोपन केले जात आहे. लाभार्थ्यांना पशुसंवर्धन, लसीकरण आणि प्राथमिक उपचारांचे प्रशिक्षण स्वदेस संस्थेमार्फत देण्यात आले आहे. सर्व नोंदी काटेकोरपणे ठेवण्यात येतात. विशेष म्हणजे शेळीपालनातून मिळणारे उत्पन्न महिलांच्या हाती येत असल्याने त्यांचे आर्थिक सक्षमीकरण होत आहे.
‘ड्रीम व्हिलेज’कडे गावाची दमदार वाटचाल
काळूणे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वदेस संस्थेने ‘ड्रीम व्हिलेज’ संकल्पना राबविली आहे. गावातील उणिवा ओळखून ग्रामस्थ, शासन आणि सामाजिक संस्थांच्या सहभागातून विकासाचा आराखडा तयार करण्यात आला आहे.या संकल्पनेअंतर्गत एकूण ७३ निकष निश्चित करण्यात आले असून त्यापैकी ४२ निकष अत्यावश्यक आहेत. तसेच २१ निकष कोणतीही तडजोड न करता पूर्ण करणे बंधनकारक आहे. ग्रामस्थांमधील एकजूट, विश्वास आणि सामूहिक सहभागाच्या बळावर गाव शाश्वत विकासाचा आदर्श निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.लोकसहभाग, पारदर्शक नियोजन आणि स्वदेश संस्थेच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे गावाने पाणी, स्वच्छता, शेती, आरोग्य आणि उपजीविका या सर्वच क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती साधली आहे.”
https://prahaar.in/2026/06/05/mechanical-engineers-son-commits-horrific-act-with-his-father/
जलसंधारणामुळे दुबार पिकांची क्रांती ; उत्पन्नातही वाढ
गावात सीसीटी, जलसंधारण आणि भूजल पुनर्भरणाच्या विविध उपाययोजना राबविण्यात आल्या. त्यामुळे जमिनीत पाण्याची पातळी वाढली असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुमारे २१ ते ४५ शेतकरी आता खरीप आणि रब्बी अशी दुबार पिके घेत आहेत. शेततळी, रोपवाटिका आणि कृषी साहित्य उपलब्ध करून देण्यात आल्याने शेती अधिक सक्षम झाली आहे.
गोपीनाथ धूम , ग्रामस्थ