संत एकनाथ

0
संत एकनाथ

देहचतुष्टयाची रचोनी होळी।
ज्ञानाग्नि घालुनी समूळ जाळी ॥१॥
अझुनी कां उगलाची।
बोंब पडो दे नामाची ॥२॥
मांदी मेळवा संतांची।
तुम्हा साची सोडवण्या ॥३॥
धांवण्या धावती संत अंतरंग।
संसार शिमगा सांग निरसिती ॥४॥
एका जनार्दनीं मारिली बोंब।
जन वन स्वयंभ एक जालें ॥५॥

या रचनेत संत एकनाथ म्हणतात, चार प्रकारच्या देहांची होळी करावी. त्यात ज्ञानरुपी अग्नी प्रज्वलित करावा. मग होळीच्या होळीच्या निमित्ताने नामाची बोंब ठोकावी. संतांची मांदियाळी जमवावी. आपल्याला संसारचक्रातून सोडवण करुन घ्यायची असेल तर हे आवश्यक आहे. संतांचा मेळा जमला की ते आपले अंतरंग शुद्ध करतात. संसाररुपी शिमग्यातून आपली सुटका करतात. मी या विठ्ठलाच्या नामाची बोंब मारली आीण जन, वन, सारे काही एकरुप होवून गेले.

https://prahaar.in/2026/06/02/relief-for-devotees-in-jejuri-strict-action-to-be-taken-against-those-coercing-devotees-to-purchase-bhandara/

संत एकनाथ होळीच्या रुपकातून भक्तीचे तत्व सांगत आहेत. आपले शरीर वा देह चार प्रकारचे असतात. स्थूलदेह, लिंगदेह, कारणदेह आिण महाकारण देह. या चारही देहांची अग्नीत आहुती दिली वा त्यांची होळी केली, की आपण देहाच्या आसक्तीतून मुक्त होतो. होळीच्या प्रसंगी बोंब मारायचीच झाली तर ती ईश्वराच्या नामाची असावी. इतरांकरिता झिजणे हा संतांचा स्थायी स्वभाव असतो. एकदा का ते आपल्याजवळ आले, की आपल्या अंगभूत चांगुलपणाने ते आपल्याला संसारुपी शिमग्याच्या कोलाहलातून बाहेर काढतात. आसक्तीरुपी बंधनातून मुक्त करतात. संतांचा जन्मच मुळी लोकांच्या कल्याणाकरिता झाला.

https://prahaar.in/2026/06/02/staged-his-own-death-to-escape-debt-shocking-murder-behind-burnt-out-car-revealed/

त्यांचे अस्तित्व चंदनाच्या झाडासारखे असते. आपल्या सहवासात येणाऱ्या साऱ्यांनाच ते आपल्या ममत्वाच्या सुगंधाने न्हावून टाकतात. सत एकनाथांनी विठ्ठलनामाचा उद्घोष केला. नि जन आणि वन एक झाले. द्वैत संपून गेले. भक्ताच्या मागचा शिमग्याचा शिणवटा मिटून गेला. संसाराचे पाश वा मनातील आसक्तीचे रंग मावळून गेले. ईश्वराच्या अनुभूतीने चैतन्याचा प्रवाह वाहू लागला. त्या प्रवाहाच्या चिंब धारांनी तनामनाला अलौकिक आवेगाचा स्पर्श झाला. भक्तीचा अवघा रंग संत एकनाथांनी शिमग्याच्या रुपकातून नेमकेपणाने चित्रित केला.

____ डॉ. देवीदास पोटे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here