Home अध्यात्म संत नामदेव

संत नामदेव

0
संत नामदेव
sant namdev

पृथ्वी ध्यासी तरी पृथ्वीचि होसी ।
केशव न होसी अरे मना ॥
आप ध्यासी तरी आपचि होसी ।
केशव न होसी अरे मना ॥
वायु ध्यासी तरी वायुचि होसी ।
परि केशव न होसी अरे मना ॥
आकाश ध्यासी तरी आकाशचि होसी।
परि केशव न होसी अरे मना ॥
नामा म्हणे जरी केशवासी ध्यासी।
तरी केशवचि होसी अरे मना॥

ज्या गोष्टीचा ध्यास लागतो तेच आपल्याला मिळते. इतर काही मिळत नाही, ‘पेराल ते उगवेल’ असे एक वचन आहे. जे पेरले असेल त्याशिवाय अन्य काही उगवत नाही. आपण हरिद्वारकडे तोंड करून चाललो तर हरिद्वारला पोहोचू. या अभंगात संत नामदेव म्हणतात, ‘हे मना, पृथ्वीचा ध्यास घेतला तर पृथ्वी प्राप्त होईल. पृथ्वीची प्रदक्षिणाही करता येईल. पण ईश्वराचे दर्शन कसे होईल? तू ईश्वरस्वरूप कसा होशील? वाऱ्याचा ध्यास घेतला तर वारा होशील, पण ईश्वर कसा होशील? अवकाशाचा ध्यास घेतला तर तू सतःच अवकाश होशील पण केशव होणार नाही. संत नामदेव म्हणतात,’ ईश्वराच्या भेटीचा ध्यास घेतला तरच ईश्वर भेटेल आपण स्वतःच ईश्वररूप होऊन जावू. म्हणून हे मना, ही गोष्ट तू नीट समजून घे.

https://prahaar.in/2026/06/01/ril-reliance-industries-limited/

या गोष्टीचा ध्यास घेशील तेच मिळेल. ईश्वर हवा असेल तर ईश्वराचाच ध्यास घ्यायला हवा. विविध उदाहरणांतून नामदेवांनी आयुष्यातले सत्य उलगडून सांगितले. मनात ज्या गोष्टींचे आपण चिंतन, मनन करतो, वा ज्या गोष्टीचा ध्यास घेतो ते आपल्याला प्राप्त होते. यातला गर्भित अर्थ असा की क्षणिक सांसारिक बाबींचा ध्यास न घेता ईश्वरप्राप्तीचा ध्यास घेतला तर ईश्वरच प्राप्त होईल. आपले आयुष्य इश्वरमय झाले की, आयुष्याला अमृताचा स्पर्श होतो. सर्व सुखांची दिवाळी अखंडपणे तेजाळत रहाते. देव प्राप्त झाला की सारे काही आपोआप मिळते. ज्या गोष्टीचा मनाला अखंड ध्यास लागतो ती गोष्ट आपल्याला प्राप्त होते.

https://prahaar.in/2026/06/01/good-news-for-football-fans-zee-finally-secures-fifa-world-cup-2026-rights-in-india/

संत तुकाराम, जनाबाई, चोखामेळा, निळोबाराय अशा संतांच्या मांदियाळीने विठ्ठलाचा ध्यास घेतला आणि विठ्ठल त्यांचा झाला. जो तनामनाने विठ्ठलचरणी समर्पित होतो, विठ्ठल त्याचा होतो. या अभंगात नामदेवांनी मनाशी संवाद केला. मन हे अस्थिर, चंचल असते. मनाने क्षणभंगुर आणि ऐहिक बाबींच्या मोहात न अडकता ईश्वरप्राप्तीचे उच्चतम ध्येय ठेवावे असा त्यांनी मनाला हितोपदेश केला. ‘अरे मना’ असं म्हणत मित्रत्वाचा सल्ला दिला. हा मनाशी केलेला जिव्हाळ्याचा संवाद आहे. ‘जे मागाल ते मिळेल’ हे चिरंतन व्यावहारिक सत्य नामदेवांनी या अभंगाद्वारा अधोरेखित केलेे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here