मुंबई, दि. ३० : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील फुगेवाडी, दापोडी आणि हडपसर येथे विषारी गावठी दारूच्या सेवनामुळे १८ जणांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर भिवंडी येथील मेसर्स रेक्स इंटरनॅशनल या कंपनीवर धाड टाकून मिथेनॉलचा भिवंडी येथे धाड टाकून ५,९२९ किलो साठा जप्त करण्यात आला. प्राथमिक तपासात पुणे प्रकरणातील दारूमध्ये वापरण्यात आलेले मिथेनॉल याच कंपनीकडून पुरविण्यात आल्याचे समोर आले आहे.
जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती अथवा आस्थापनेला कोणतीही सवलत दिली जाणार नाही. औषधे व सौंदर्यप्रसाधने अधिनियम, १९४० तसेच संबंधित कायदे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर व न्यायालयीन कारवाई करण्यात येईल. सुरक्षित अन्न व औषधे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असून तो सुनिश्चित करणे हीच आमची सर्वोच्च जबाबदारी आहे, असे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी म्हटले आहे.
विषारी गावठी दारूच्या सेवनामुळे मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई केली आहे. अवघ्या ३० रुपयांत विकल्या जाणाऱ्या या दारूमध्ये ‘मिथेनॉल’ हे विषारी रसायन मिसळण्यात आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभर मिथेनॉलच्या अवैध साठ्यांविरोधात तातडीने कारवाईचे आदेश दिले.
https://prahaar.in/2026/05/30/deadline-for-submission-of-marksheet-and-school-leaving-certificate-for-11th-admission/
पोलीस तपासातून उघड झालेले धागेदोरे
पोलीस तपासानुसार, मृत व्यक्तींनी फुगेवाडी येथील कर्नालसिंग विरका यांच्या ठिकाणी हातभट्टीची दारू सेवन केली होती. विरका याला ही दारू योगेश वानखेडे याच्याकडून मिळाली होती. पुढील तपासात योगेश वानखेडे हा उरळी कांचन येथील राजू प्रजापती याच्याकडून दारू घेऊन पुरवठा करत असल्याचे निष्पन्न झाले. या साखळीतील दारूमध्ये वापरलेले मिथेनॉल मेसर्स रेक्स इंटरनॅशनलकडून प्राप्त झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
धाडी मध्ये ५,९२९ किलो मिथेनॉल जप्त
कंपनीचे कार्यालय वाशी येथे असून गोदाम अनंत अँड कंपनी, गाळा क्र. ५४४/ए, म्हात्रे कंपाउंड, अंजूर रोड, वळगाव, भिवंडी येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर आयुक्तांच्या निर्देशानुसार ठाणे येथील औषध निरीक्षक योगेंद्र पोळ यांनी धाड टाकली.
तपासणीदरम्यान कंपनीचे मालक अरुणकुमार चौबे व सक्षम व्यक्ती अभिषेक अरुणकुमार चौबे उपस्थित नव्हते. कारवाईत एकूण ५,९२९ किलोग्रॅम मिथेनॉलचा साठा आढळून आला. मात्र या विषारी रसायनाच्या खरेदी-विक्रीची कोणतीही अधिकृत नोंद, साठा नोंदवही अथवा आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नव्हती.
https://prahaar.in/2026/05/30/tukaram-mundhes-big-attack-on-gutkha-mafia-33-people-arrested-in-a-day-28-establishments-sealed-crackdown-across-the-state/
गुन्हा दाखल; परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू
विषारी द्रव्य नियमांनुसार आवश्यक नोंदी व व्यवहारांचा तपशील उपलब्ध नसल्याने संबंधित साठा जप्त करण्यात आला. तसेच कंपनीचे मालक अरुणकुमार चौबे आणि सक्षम व्यक्ती अभिषेक अरुणकुमार चौबे यांच्याविरुद्ध नारपोली पोलीस ठाणे, भिवंडी येथे तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे
याशिवाय अन्न व औषध प्रशासनाच्या ठाणे कार्यालयाने विषारी द्रव्य अधिनियमांतर्गत कारणे दाखवा नोटीस बजावून संबंधित परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.अवैध औषध विक्री, औषधांमधील भेसळ, विषारी रसायनांचा गैरवापर आणि फसव्या जाहिरातींविरोधात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.
https://prahaar.in/2026/05/30/mumbai-mandwa-ro-ro-service-regular-during-monsoon-for-passengers/
तक्रार कशी कराल?
औषधांच्या गुणवत्तेबाबत शंका असल्यास किंवा अवैध साठवणुकीची माहिती मिळाल्यास तात्काळ एफडीएकडे तक्रार करावी. तक्रारीमध्ये नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, संशयित आस्थापनेचा अचूक पत्ता आणि संबंधित औषध अथवा पदार्थाची माहिती नमूद करावी. नागरिकांच्या सर्व तक्रारींची गोपनीयतेने पडताळणी करून तातडीने कायदेशीर कारवाई केली जाईल.
नागरिकांना तक्रार नोंदविणे अधिक सुलभ व्हावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून लवकरच स्वतंत्र मोबाईल ॲप विकसित करण्यात येणार असून, टोल-फ्री हेल्पलाईन सुविधाही उपलब्ध करून देण्यात येत आहे, अशी माहिती सहआयुक्त (औषधे) यांनी दिली.