बीड : बीड जिल्हा सध्या गुन्हेगारीच्या विळख्यात सापडला आहे. गुन्हेगारीचा हा आलेख वाढत असतानाच, आता जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा अत्यंत धक्कादायक चेहरा समोर आला आहे. बीडमध्ये एका अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली. मात्र, त्याहूनही भीषण आणि चीड आणणारी बाब म्हणजे, वैद्यकीय तपासणीसाठी या पीडित मुलीला उपजिल्हा रुग्णालयात तब्बल १० तास ताटकळत राहावे लागले. प्रशासनाच्या या निर्दयी कारभारामुळे संपूर्ण परिसरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नात्याला कलंक! नराधम चुलत मामे भावाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार
मिळालेल्या माहितीनुसार, हा संतापजनक प्रकार बीडच्या केज उपजिल्हा रुग्णालयात (Cage Sub-District Hospital, Beed) घडला असून, यामुळे आरोग्य विभागाच्या एकूणच कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील चुलत मामे भावाने अत्याचार करून नात्याला कलंक फासला.
https://prahaar.in/2026/05/27/not-one-but-as-many-as-55-underage-girls-became-pregnant-what-exactly-is-the-matter/
बीडच्या केज पोलीस स्टेशनच्या (Kej Police Station) हद्दीत येणाऱ्या एका गावामध्ये मंगळवारी ही घटना घडली. नराधम भावाने पीडित चिमुरडीचे तोंड रुमालाने दाबले आणि तिचे हात दोरीने बांधून तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. या धक्कादायक प्रसंगामुळे पीडित मुलगी प्रचंड मानसिक धक्क्यामध्ये होती.
गुन्हा दाखल करायला लागली अख्खी रात्र; पोलिसांचा संथ कारभार
हा अंगावर काटा आणणारा प्रकार समोर आल्यानंतर पीडितेच्या हवालदिल झालेल्या कुटुंबियांनी तातडीने पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. अधिकृत तक्रार आणि गुन्हा दाखल करण्यासाठी पीडितेसह तिचे नातेवाईक रात्री ९ वाजताच केज पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले होते. मात्र, पोलिसांच्या संथ कारभारामुळे रात्री ९ वाजेपासून पीडितेचे कुटुंब तिथेच बसून होते. अखेरीस पहाटे ५ वाजता या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. म्हणजेच, गुन्हेगाराला तात्काळ अटक करण्याऐवजी पीडितेच्या कुटुंबाला अख्खी रात्र पोलीस स्टेशनमध्येच काढावी लागली.
https://prahaar.in/2026/05/27/nautapa-health-alert-avoid-eating-these-foods-for-the-next-six-days-or-else/
तपासणीसाठी पीडित चिमुरडी १० तास रुग्णालयात
अगोदरच बलात्काराच्या गंभीर धक्क्यामध्ये असलेल्या चिमुरडीला आणि तिच्या कुटुंबाला पोलीस प्रशासनानंतर वैद्यकीय प्रशासनाच्या असंवेदनशीलतेचा सामना करावा लागला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी (Medical Examination) बीडच्या केज उपजिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, रुग्णालयातील प्रशासनाचा ढिसाळ कारभार येथेही थांबला नाही. रुग्णालयात महिला स्त्रीरोगतज्ञ (Gynecologist) उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करण्यात आले. या कारणास्तव पीडित मुलीला चक्क सकाळी ११ वाजेपासून रात्री ९ वाजेपर्यंत रुग्णालयातच थांबवून ठेवण्यात आले.
अल्पवयीन बलात्कार पीडितेला वैद्यकीय तपासणीसारख्या संवेदनशील प्रक्रियेसाठी तब्बल १० तास हॉस्पिटलमध्ये ताटकळत ठेवल्यामुळे आरोग्य विभागाच्या क्रूरतेची परिसीमा गाठली गेली. या संदर्भात जेव्हा माध्यम प्रतिनिधी आणि नातेवाईकांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे विचारणा केली, तेव्हा “स्त्रीरोगतज्ञ उपलब्ध नाही” आणि “कॉल डॉक्टर वेळेत उपस्थित झाले नाहीत” अशी उडवाउडवीची कारणे देण्यात आली.
https://prahaar.in/2026/05/27/raigad-crime-mumbai-girl-brutally-murdered-in-mangaon-body-thrown-into-forest-atmosphere-of-fear-in-the-area/
आधी पोलीस स्टेशनमधील दिरंगाई आणि त्यानंतर आरोग्य विभागाचे पाषाण हृदयी कृत्य, यामुळे पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबाची प्रचंड मानसिक छळवणूक झाली आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखणारे पोलीस आणि जीव वाचवणारे आरोग्य विभाग, या दोन्ही यंत्रणांच्या अशा ढिसाळ आणि असंवेदनशील कारभारामुळे बीड जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणातील दोषी डॉक्टरांवर आणि बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई कधी होणार? असा सवाल आता सामान्य जनता विचारत आहे.