Home ब्रेकिंग न्यूज Chilling Robbery Caught On Cam : दुकानात शिरला अन् माथेफिरूकडून भारतीय महिलेवर गोळीबार; अमेरिकेत दरोड्याचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद

Chilling Robbery Caught On Cam : दुकानात शिरला अन् माथेफिरूकडून भारतीय महिलेवर गोळीबार; अमेरिकेत दरोड्याचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद

0
Chilling Robbery Caught On Cam : दुकानात शिरला अन् माथेफिरूकडून भारतीय महिलेवर गोळीबार; अमेरिकेत दरोड्याचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद
America News

वॉशिंग्टन : अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय समुदायाला हादरवून सोडणारी एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. अमेरिकेतील एका ‘कन्वीनियन्स स्टोअर’मध्ये (Convenience Store) काम करणाऱ्या भारतीय वंशाच्या एका गुजराती महिलेची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मेघना पटेल (Meghna Patel) असे या दुर्दैवी महिलेचे नाव असून, त्या मूळच्या गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील विजापूर तालुक्यातील जंत्राल गावच्या रहिवासी होत्या. दरोड्याच्या उद्देशाने ही हत्या झाल्याचा प्राथमिक संशय असून, या संपूर्ण थराराचा सीसीटीव्ही (CCTV) व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या घटनेमुळे अमेरिकेतील भारतीयांमध्ये मोठी भीती आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.

अमेरिकेतच स्थायिक होते पटेल कुटुंब

मिळालेल्या माहितीनुसार, मेघना पटेल या गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या कुटुंबासह अमेरिकेत स्थायिक झाल्या होत्या. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी त्या स्वतःचे एक ‘कन्वीनियन्स स्टोअर’ चालवत होत्या. नेहमीप्रमाणे त्या आपल्या दुकानात काम करत असतानाच अचानक काळाने त्यांच्यावर घाला घातला. या घटनेने त्यांच्या मूळ गावी, जंत्रालमध्येही शोककळा पसरली आहे.

https://prahaar.in/2026/05/26/maharashtra-school-big-news-school-open-on-3-day-and-2-days-online-class-school-bus-association-demand-after-petrol-diesel-price-hike/

सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला अंगावर काटा आणणारा थरार

या दुर्दैवी घटनेचा एक सीसीटीव्ही व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागला आहे. दुकानात लावलेल्या एका हाय-अँगल कॅमेऱ्यात या हल्ल्याचा संपूर्ण थरार कैद झाला आहे. यातून काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. व्हिडीओमध्ये मेघना पटेल या कॅश काउंटर आणि लॉटरी तिकीट डिस्प्लेच्या मागे उभ्या असलेल्या स्पष्ट दिसत आहेत. थोड्याच वेळात, चेहऱ्यावर मास्क आणि डोक्यावर हुड (Hood) घातलेला एक तरुण दुकानात प्रवेश करतो. त्याने अंगात गडद रंगाचे जॅकेट आणि कॅमफ्लाज (Camouflage) पॅटर्नची पँट घातलेली असते. अत्यंत शांतपणे चालत हा मारेकरी काउंटरवर पोहोचतो. सुरुवातीला तो एक सामान्य ग्राहक असल्याचा बनाव करतो आणि मेघना यांच्याशी काही सेकंद संवाद साधतो. मात्र, पुढच्याच काही क्षणांत परिस्थिती भयानक वळण घेते. हा व्यक्ती अचानक बंदूक काढतो आणि थेट मेघना यांच्यावर गोळ्या झाडतो. गोळीबाराच्या वेळी काउंटरवरील वस्तू हवेत उडताना व्हिडीओमध्ये दिसत आहेत.

हल्लेखोराचे घटनास्थळावरून पलायन

या अनपेक्षित आणि प्राणघातक हल्ल्यात मेघना पटेल गंभीर जखमी होऊन खाली कोसळल्या. गोळीबार केल्यानंतर हा माथेफिरू हल्लेखोर अजिबात न घाबरता कॅश काउंटरवरून काहीतरी वस्तू घाईघाईने काढतो आणि दुकानातून धूम ठोकतो. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मेघना यांना तात्काळ उपचारांसाठी रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

पोलिसांचा तपास युद्धपातळीवर सुरु

स्थानिक अमेरिकन पोलिसांनी या हत्याकांडाची अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. हा गोळीबार केवळ दरोडा टाकण्याच्या आणि लूटमारीच्या उद्देशानेच (Robbery Attempt) झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. सध्या पोलीस दुकानातील आणि परिसरातील इतर सर्व सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी करत आहेत. मारेकऱ्याची ओळख पटवून त्याला लवकरात लवकर बेड्या ठोकण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक पुरावे गोळा करत आहे. या भीषण घटनेमुळे अमेरिकेतील स्थानिक भारतीय नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here