मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यपाल नियुक्त आमदार इद्रीस नायकवाडी यांना पक्षनेतृत्वाने राजीनामा देण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे. खुद्द उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेवरून राजीनाम्याची मागणी करण्यात आल्याची चर्चा असून, नायकवाडी यांच्या कार्यशैलीवर युवा नेतृत्व नाराज असल्याचे कळते आहे. मात्र, आपण राजीनामा देणार नसल्याची भूमिका नायकवाडी यांनी घेतल्याने पक्षात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
अलीकडेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विशेष कार्य अधिकाऱ्याने (ओएसडी) इद्रीस नायकवाडी यांची भेट घेतली होती. याच भेटीत त्यांना पक्षाच्या वतीने राजीनामा देण्याची सूचना देण्यात आल्याचे समजते. मंगळवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली असून, या बैठकीत नायकवाडी यांच्या राजीनाम्याचा विषय चर्चेला येण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
राजीनाम्याच्या चर्चेवर बोलताना इद्रीस नायकवाडी यांनी मात्र या वृत्ताचे खंडन केले आहे. “उपमुख्यमंत्र्यांचे ओएसडी हे मंत्रालयात सातत्याने भेटत असतात. परंतु, मला कोणत्याही नेत्याकडून किंवा पक्षाकडून राजीनामा मागण्यात आलेला नाही,” असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. तसेच, “यापूर्वी दिवंगत नेते अजित पवार यांच्याकडून मला अशी कोणतीही सूचना कधीही देण्यात आली नव्हती. त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,” अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
https://prahaar.in/2026/05/25/neet-paper-leak-case-ed-eyes-professor-shivraj-motegaonkars-assets/
राजीनाम्यासाठी दबाव का ?
दिवंगत नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘अल्पसंख्याक चेहरा’ म्हणून नायकवाडी यांना विधानपरिषदेवर संधी दिली होती. मात्र, अजित पवारांच्या निधनानंतर पक्षांतर्गत समीकरणे बदलली आहेत. सध्या झिशान सिद्दीकी यांच्या रूपाने राष्ट्रवादीचा एक युवा आमदार विधानपरिषदेत अल्पसंख्याक समुदायाचे प्रतिनिधित्व करत आहे. त्यातच पक्षातील नवोदित युवा नेतृत्वाला नायकवाडी यांची कार्यशैली मान्य नसल्याने एकाच समाजाचे दोन प्रतिनिधी ठेवण्याऐवजी नायकवाडींना पदमुक्त करण्याची हालचाल सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.