संगमनेर : संगमनेर तालुक्यातील तिगाव येथे शुक्रवारी (दि. २२) संध्याकाळी एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. दगडाच्या खाणीत साचलेल्या पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्यामुळे दोन सख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण तिगाव आणि संगमनेर परिसरावर शोककळा पसरली असून, एकाच घरातील दोन तरुण मुलांचा अंत झाल्याने सानप कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
महेश गोरक्षनाथ सानप (वय १८ वर्ष) आणि ओंकार गोरक्षनाथ सानप (वय १४ वर्ष) (दोघेही रा. तिगाव, ता. संगमनेर) अशी पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या भावांची नावे आहेत.
https://prahaar.in/2026/05/22/a-retired-police-officer-from-jalgaon-grew-the-worlds-most-expensive-mango/
उन्हाळ्याचे दिवस असल्याने तिगाव परिसरातील एका मोठ्या दगडाच्या खाणीत साचलेल्या पाण्यात गावातील आणि परिसरातील मुले पोहण्यासाठी जात असतात. शुक्रवारी दुपारच्या सुमारास महेश आणि ओंकार हे दोघे भाऊही नेहमीप्रमाणे पोहण्याचा आनंद घेण्यासाठी या खाणीवर गेले होते. मात्र, पाण्याचा आणि खाणीच्या खोलीचा अचूक अंदाज न आल्यामुळे दोघेही पाण्यात बुडू लागले. एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात दोघांचाही पाण्यात बुडून अंत झाला. या घटनेची माहिती तिगावचे सरपंच ज्ञानेश्वर सानप यांना मिळताच, त्यांनी जराही वेळ न दवडता तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने अत्यंत शिताफीने पाण्यात बुडालेल्या दोन्ही भावांना बाहेर काढले. दोन्ही भावांना खाणीबाहेर काढल्यानंतर तातडीने उपचारासाठी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून उपचारापूर्वीच दोघांना ‘मृत घोषित’ केले. एकाच वेळी दोन सख्या भावांचा मृत्यू झाल्याचे समजताच रुग्णालयाच्या परिसरात सानप कुटुंबासह उपस्थित नातेवाईकांनी एकच आक्रोश केला, ज्याने उपस्थितांचेही डोळे पाणावले.
https://prahaar.in/2026/05/22/monsoon-2026-finally-the-date-has-been-set-monsoon-will-arrive-in-maharashtra-from-this-date/
घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या खबरीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अमित महाजन करीत आहेत. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत असून, पालकांनी आपल्या मुलांना अशा धोकादायक पाण्याच्या ठिकाणी जाण्यापासून रोखावे, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.