रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील जांभारी फाटा परिसर मंगळवारी सकाळी भीषण स्फोटाने हादरला. वाटद पोलीस चौकी हद्दीत लाकडे गोळा करण्यासाठी गेलेल्या एका महिलेच्या हातात गावठी बॉम्बचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली. या स्फोटात महिलेच्या हाताच्या पंजाची गंभीर अवस्था झाली असून बोटे, नखं तुटल्याने त्वचा होरपळली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,४५ वर्षीय रेश्मा प्रमोद सुर्वे या मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास जंगल परिसरात लाकडे आणण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांना झाडाझुडपांमध्ये एक संशयास्पद वस्तू दिसली. ती वस्तू नेमकी काय आहे हे पाहण्यासाठी त्यांनी ती हातात उचलताच अचानक जोरदार स्फोट झाला. स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की परिसरात एकच धावपळ उडाली.
https://prahaar.in/2026/05/20/new-revelation-in-twishas-death-case-shocking-pain-revealed-through-instagram-chat/
या भीषण स्फोटात रेश्मा सुर्वे यांच्या डाव्या हाताचा पंजा गंभीर जखमी झाला. हाताची बोटे तुटली असून नखं उडाल्याने त्वचा पूर्णपणे भाजली गेली आहे. स्फोटामुळे त्या रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळल्या. स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत त्यांना उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना मुंबई येथे हलवण्यात आले आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच जयगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी केली. पोलिसांना तपासादरम्यान घटनास्थळाजवळ तब्बल २० ते २५ जिवंत गावठी बॉम्ब आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली. एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटके जंगल परिसरात कोणी ठेवली? त्यामागचा उद्देश काय होता? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
https://prahaar.in/2026/05/20/watermelon-death-case-mumbai-family-news-update/
पोलिसांनी तातडीने संपूर्ण परिसर सील केला असून बॉम्ब शोध पथकाला पाचारण करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून प्रत्येक कोनातून तपास सुरू करण्यात आला आहे. या स्फोटकांचा वापर नेमका कोणत्या कारणासाठी केला जाणार होता, याचा शोध पोलीस घेत आहेत. या धक्कादायक घटनेमुळे जांभारी फाटा परिसरातील नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजापूर शहराजवळील कोदवली साईनगर पुनर्वसन वसाहतीतील फुडलैंड हॉटेलमधून ग्राहक नोंदणी रजिस्टर चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. चार अज्ञात तरुणांनी रूम पाहण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये प्रवेश करून हे रजिस्टर लंपास केल्याने शहरात एकच चर्चा रंगली आहे.
काही वेळाने रूम पाहून आलेल्या तरुणाने रूम नको असल्याचे सांगितले आणि चौघेही तेथून निघून गेले. मात्र त्यानंतर हॉटेल कर्मचाऱ्याच्या लक्षात आले की, काऊंटरवर ठेवलेले ग्राहक नोंदणी रजिस्टर गायब झाले आहे. संशय आल्याने सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता, खाली थांबलेल्या एका संशयिताने रजिस्टर उचलून आपल्या बॅगेत टाकल्याचे स्पष्टपणे दिसून आले.
https://prahaar.in/2026/05/20/unfortunate-incident-in-a-society-in-pune-7-year-old-shivansh-dies-after-getting-stuck-in-an-elevator/
या घटनेची गंभीर दखल घेत राजापूरचे पोलिस निरीक्षक अमित यादव यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. पोलिसांनी संबंधित सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर प्रसारित करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. ग्राहक नोंदणी रजिस्टर चोरीमागे नेमका काय हेतू होता, याचा तपास आता पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.