Home ब्रेकिंग न्यूज Mumbai Watermelon Death Case : मुंबईतील ‘कलिंगड डेथ केस’मध्ये मोठा ट्विस्ट; फॉरेन्सिक अहवालातून धक्कादायक सत्य समोर

Mumbai Watermelon Death Case : मुंबईतील ‘कलिंगड डेथ केस’मध्ये मोठा ट्विस्ट; फॉरेन्सिक अहवालातून धक्कादायक सत्य समोर

0
Mumbai Watermelon Death Case : मुंबईतील ‘कलिंगड डेथ केस’मध्ये मोठा ट्विस्ट; फॉरेन्सिक अहवालातून धक्कादायक सत्य समोर
Mumbai Watermelon Death Case Update

मुंबई : मुंबईतील पायधुनी परिसरात घडलेल्या डोकाडिया कुटुंबाच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात आता सर्वात मोठा आणि धक्कादायक ट्विस्ट समोर आला आहे. २६ एप्रिल २०२६ रोजी एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण मुंबई हादरली होती. सुरुवातीला अन्न विषबाधेचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र आता फॉरेन्सिक तपास आणि वैद्यकीय अहवालांमधून समोर आलेल्या माहितीमुळे या प्रकरणाने आणखी गंभीर वळण घेतले आहे. पोलिसांनाही या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर येत असल्याने मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

https://prahaar.in/2026/05/20/yashwant-cooperative-bank-closed-how-will-account-holders-get-money-know-the-complete-process/

तपासादरम्यान घरातून जप्त करण्यात आलेल्या कलिंगडाच्या नमुन्यांमध्ये तसेच मृतांच्या शरीरात झिंक फॉस्फाइड हे अत्यंत विषारी रसायन आढळून आले आहे. यानंतर पोलिसांनी घरातील मिठाचे नमुनेही फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे (FSL) तपासासाठी पाठवले आहेत. झिंक फॉस्फाइड मिश्रित मीठ कलिंगडावर लावण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. मात्र घरात कुठेही झिंक फॉस्फाइड सापडले नसल्याने हे विषारी रसायन नेमके कुठून आले, याचा शोध पोलीस घेत आहेत. त्यामुळे या प्रकरणातील गूढ अधिकच वाढले आहे.

सर जेजे रुग्णालयाच्या वैद्यकीय अहवालात चौघांचाही मृत्यू झिंक फॉस्फाइड विषबाधेमुळे झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मृतांच्या शरीरातील नमुन्यांमध्ये तसेच जप्त केलेल्या कलिंगडावरही झिंक फॉस्फाइडचे अंश आढळल्याने तपासाला नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणात समोर आलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा ट्विस्ट मानला जात आहे.

https://prahaar.in/2026/05/20/ebola-outbreak-is-out-of-control-131-deaths-no-vaccine-america-warns-the-world-by-suspending-visas/

यापूर्वी डोकाडिया कुटुंबीयांच्या मृत्यूबाबतचा हिस्टोपॅथॉलॉजी अहवालही समोर आला होता. या अहवालात मृतांच्या यकृत आणि मूत्रपिंडांच्या नमुन्यांमध्ये हिरवट रंग दिसून आल्याचे नमूद करण्यात आले आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, हा रंग झिंक फॉस्फाइड विषबाधेचा महत्त्वाचा संकेत मानला जातो. त्यामुळे फॉरेन्सिक अहवालानंतर हिस्टोपॅथॉलॉजी अहवालानेही विषबाधेच्या संशयाला दुजोरा दिला आहे.

आता जेजे रुग्णालयातील न्यायवैद्यक शास्त्र विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक या प्रकरणाचा सखोल अभ्यास करणार आहे. चौघांना नेमकी कशाप्रकारची विषबाधा झाली, विष शरीरात कशा प्रकारे गेले, विषबाधेनंतर कोणती लक्षणे दिसून आली, प्रकृती किती वेगाने खालावली आणि मृत्यूची वैद्यकीय प्रक्रिया नेमकी कशी घडली याचा तपशीलवार अभ्यास केला जाणार आहे. यासोबतच मृतांना इतर कोणते गंभीर आजार होते का, याचाही तपास केला जाणार आहे.

दरम्यान, या संपूर्ण घटनेमागील नेमके कारण काय, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे. डोकाडिया कुटुंबीयांनी २५ एप्रिलच्या रात्री कलिंगड खाल्ले होते. त्यानंतर काही वेळातच चौघांनाही उलट्या, चक्कर येणे आणि तीव्र पोटदुखी अशी लक्षणे जाणवू लागली. २६ एप्रिल रोजी त्यांची प्रकृती आणखी बिघडली. कुटुंबातील दोन्ही मुली बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या. त्यानंतर चौघांनाही तातडीने जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचताच एका मुलीला डॉक्टरांनी मृत घोषित केले. काही तासांत दुसऱ्या मुलीचाही मृत्यू झाला. त्यानंतर अल्पावधीतच आई-वडिलांचाही मृत्यू झाला.

https://prahaar.in/2026/05/20/unfortunate-incident-in-a-society-in-pune-7-year-old-shivansh-dies-after-getting-stuck-in-an-elevator/

एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून या प्रकरणामागे नेमके काय कारण आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि वैद्यकीय यंत्रणा युद्धपातळीवर तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here