मुंबई: मुंबईतील पायधुनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांच्या मृत्यूप्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागील कारण स्पष्ट करणारा अहवाल जेजे रुग्णालयाने मुंबई पोलिसांकडे सादर केला असून, या चौघांचाही मृत्यू झिंक फॉस्फाइड या विषारी रसायनामुळे झाल्याचं नमूद करण्यात आलं आहे. ही माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. फॉरेन्सिक लॅब आणि जेजे रुग्णालयाच्या अहवालानंतर आता या प्रकरणातील पोलीस तपासाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
ही धक्कादायक घटना २५ एप्रिल रोजी पायधुनी परिसरातील मोघल इमारतीत घडली होती. जुन्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या डोकाडिया कुटुंबातील चारही सदस्यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. अब्दुल्ला डोकाडिया (४०), पत्नी नसरीन डोकाडिया (३५) आणि त्यांच्या १६ व १३ वर्षांच्या दोन मुलींचा यात मृत्यू झाला होता.
https://prahaar.in/2026/05/15/shocking-incident-in-pune-young-womans-number-leaked-from-hotels-qr-code-personal-message-received-at-midnight/
मिळालेल्या माहितीनुसार, २५ एप्रिलच्या रात्री साधारण दहा ते साडेदहा वाजण्याच्या सुमारास कुटुंबाने काही नातेवाईकांसोबत जेवण केलं होतं. त्यानंतर नातेवाईक घरी गेल्यानंतर रात्री उशिरा, सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास त्यांनी कलिंगड खाल्ल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. काही वेळातच कुटुंबातील सर्व सदस्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर जेजे पोलीस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पोलिसांनी त्यांनी खाल्लेल्या अन्नपदार्थांचे तसेच कलिंगडाचे नमुने जप्त करून तपासासाठी पाठवले होते. मृतांच्या शरीरातील विविध नमुनेही तपासासाठी घेण्यात आले होते.
https://prahaar.in/2026/05/15/thane-murder-case-murder-of-lover-and-found-in-drum/
फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या अहवालात मृतांच्या व्हिसेरा नमुन्यांमध्ये झिंक फॉस्फाइड आढळल्याचं स्पष्ट झालं. यकृत, मूत्रपिंड, प्लीहा, पोटातील घटक, पित्त आणि शरीरातील मेदाच्या नमुन्यांमध्येही हे विषारी रसायन आढळून आलं. झिंक फॉस्फाइड हे अत्यंत घातक रासायनिक संयुग असून ते मुख्यतः उंदीर, घुशी आणि इतर कृंतक प्राणी मारण्यासाठी वापरलं जातं. शेती आणि धान्य साठवणुकीमध्ये हे रसायन कीटकनाशक म्हणून वापरलं जातं.