Home ब्रेकिंग न्यूज Anand Paranjpe In SS : राष्ट्रवादीचा आनंद हरपला, शिवसेनेला पुन्हा गवसला

Anand Paranjpe In SS : राष्ट्रवादीचा आनंद हरपला, शिवसेनेला पुन्हा गवसला

0
Anand Paranjpe In SS : राष्ट्रवादीचा आनंद हरपला, शिवसेनेला पुन्हा गवसला
Anand Paranjpe

ठाणे : तब्बल १४ वर्षे अजित पवारांच्या मार्गदर्शनात ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची संघटना मजबूत करण्यासाठी काम केल्यानंतर माजी खासदार आनंद परांजपे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे सर्वोच्च नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनात खासदार श्रीकांत शिंदेंसोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एकेकाळचे विश्वासू आणि राजकीय स्वप्न साकारण्यासाठी राष्ट्रवादीत गेलेल्या आनंद परांजपे यांनी त्यांच्या मूळ पक्षात शिवसेनेत परतण्याचा निर्णय घेतला. मंत्री दादाजी भुसेंकडून शिवसेनेचा भगवा आणि खासदार श्रीकांत शिंदेंच्या हातून भगवे उपरणे स्वीकारत आनंद परांजपे यांनी शिवसेनेत औपचारिक प्रवेश केला. हा पक्ष प्रवेश मुंबईत झाला. या प्रसंगी मंत्री उदय सामंत, सरचिटणीस राहुल शेवाळे हे पण उपस्थित होते.

https://www.youtube.com/watch?v=H9NfzDGLuoY

https://prahaar.in/2026/05/14/nashik-deputy-collector-abhijit-bhande-patil-suspended-in-bhondubaba-kharat-case/

याआधी माजी खासदार आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्व पदांचा राजीनामा दिला. राजीनाम्याचे पत्र त्यांनी स्वतःच्या अधिकृत सोशल मीडियाद्वारे प्रसिद्ध केले. आनंद परांजपेंनी राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या सर्वोच्च नेत्या सुनेत्रा पवार यांना राजीनामा पाठवला. राजीनामा दिल्यानंतर जेमतेम सहा तासांत आनंद परांजपे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

https://prahaar.in/2026/05/14/hindutva-is-in-mumbais-dna-says-minister-nitesh-rane/

आनंद परांजपे राज्यसभा किंवा विधानपरिषद यापैकी एका सभागृहासाठी इच्छुक होते. पण अजित पवारांनी त्यांना वारंवार वेगवेगळी कारणे देऊन संधी नाकारली. आता अजित पवारांच्या पश्चात संधी मिळेल याची खात्री वाटत नसल्यामुळे आनंद परांजपेंनी राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या संदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारले. पण पक्ष सोडला म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसविषयी वाईट बोलणार नाही, असे सांगत आनंद परांजपेंनी जास्त बोलणे टाळले.

https://prahaar.in/2026/05/14/to-make-maharashtra-a-global-hub-for-india-africa-cooperation/

आनंद परांजपे यांनी २०१४ मध्ये श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता आणि श्रीकांत शिंदे खासदार झाले होते. पण २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आनंद परांजपे श्रीकांत शिंदेंसाठी मनापासून प्रचार करताना दिसले. त्यानंतर श्रीकांत शिंदे आणि आनंद परांजपे यांच्यातील सलोखा वाढत गेला. आता तर श्रीकांत शिंदेंमुळेच आनंद परांजपे स्वगृही परतले आहेत.

शिवसेना खासदार प्रकाश परांजपे यांच्या निधनानंतर झालेली लोकसभा निवडणूक पुत्र म्हणून आनंद यांनी लढवली होती. या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी आनंद परांजपे यांना शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आणले होते. एकनाथ शिंदे हे आनंद परांजपेंना त्यांचे मानसपुत्र म्हणत होते.

प्रकाश परांजपेंच्या निधनानंतर उर्वरित कार्यकाळासाठी आनंद परांजपे शिवसेनेच्या तिकिटावर खासदार झाले. ते २००८ ते १६ मे २००९ या काळात ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. नंतर १६ मे २००९ ते १६ मे २०१४ या काळात ते शिवसेनेचेच कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. पण २०१२ मध्ये आनंद परांजपेंनी शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांनी राष्ट्रवादीसाठी ठाणे जिल्ह्यात पक्ष बांधणीचे भरपूर काम केले. आनंद यांच्या बंडामुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ झाले होते. पण मागील १४ वर्षांत राजकारणात बरंच काही घडलं बिघडलं आहे. आता पुन्हा एकदा आनंद परांजपे नवी इनिंग खेळण्यासाठी शिवसेनेत आले आहेत. आनंद परांजपे यांनी शिवसेनेतली ही दुसरी इनिंग आहे. यावेळी ते काय करतात याकडे राजकीय वर्तुळातील अनेकांचे लक्ष आहे.

आनंद परांजपेंचा असा झाला शिवसेनेत प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिलेले माजी खासदार आनंद परांजपे १४ वर्षांनंतर स्वगृही परतले. बाळासाहेब भवन येथे शिवसेना संसदीय गटनेते खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री दादाजी भुसे, मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत परांजपे यांनी गुरुवारी रात्री शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी माजी खासदार राहुल शेवाळे, शिवसेना सचिव सिद्धेश कदम, रविंद्र फाटक आणि इतर प्रमुख नेते उपस्थित होते.

आनंद परांजपे शिवसेनेत असताना परांजपे आणि शिंदे कुटुंबीयांचे जिव्हाळ्याचे नाते होते. मधल्या काळात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केले. त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या मिळाल्या आणि त्या त्यांनी कुठल्याही अपेक्षा न ठेवता पार पाडल्या असे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले. आनंद परांजपे यांच्या संघटन कौशल्याचा पक्षाला फायदा होईल,असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून दररोज वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. राज्यात पक्षाची ताकद वाढत आहे. राज्यात एसआयआरचे काम सुरू असून शिवसेनेने एक लाखांहून अधिक बीएलओ नियुक्त केल्याचे खासदार शिंदे म्हणाले.

यावेळी परांजपे म्हणाले की, घरातूनच शिवसेनेचा वारसा मिळाला. शिवसेनेकडून दोनदा खासदार बनलो. त्यात शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचे मोठे योगदान होते. मी जरी दुसऱ्या पक्षात होतो तरी माझ्यात शिवसेनेचाच डीएनए आहे, असे परांजपे म्हणाले. मुख्यमंत्री असताना कॉमन मॅन म्हणून काम करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी जनहिताचे अनेक मोठे निर्णय घेतले. त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रभावित होऊन स्वगृही परतण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. पदाची कोणतीही अपेक्षा न ठेवता एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात संघटनेसाठी काम करण्याची इच्छा यावेळी परांजपे यांनी बोलून दाखवली.

शिवसेनेत प्रवेश करताना काय म्हणाले आनंद परांजपे ?

माझा DNA शिवसेनेचा आहे. शिवसेनेत मला राजकारणाचं बाळकडू मिळालं. मी मुळात नाराज नाही. पदासाठी मी इथे आलो नाही. मी सर्व जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पडल्या. राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दिकींना उमेदवारी दिली आहे, पण आता शिवसेनेत आलो म्हणून राष्ट्रवादीवर नाराजी व्यक्त करणं माझ्या रक्तात नाही. मला पदाची अपेक्षा नाही. मी राष्ट्रवादीवर कोणती टीका करणार नाही. माझा चेहरा हसमुख असतो, असं म्हणत आनंद परांजपे यांनी आपल्या मनातलं बोलून दाखवलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here