मुंबई : राज्यावर घोंगावणाऱ्या ‘एल निनो’च्या संभाव्य संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारने विशेष नियोजन सुरू केले आहे. एल निनोमुळे ओढवणाऱ्या टंचाईवर मात करण्यासाठी आणि जलसंधारणाच्या कामांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ‘राज्यस्तरीय कृती दल’ (टास्क फोर्स) गठित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मृद व जलसंधारण विभागाने घेतला आहे.
गेल्या महिन्यात २० एप्रिल रोजी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एल निनोच्या परिणामांवरील उपाययोजनांबाबत आढावा बैठक पार पडली होती. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी जलसंधारणाशी संबंधित विविध विभागांमध्ये समन्वय राखण्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावर बैठका घेण्याचे आणि राज्यस्तरावर स्वतंत्र टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे.राज्याचे मुख्य सचिव या टास्क फोर्सचे अध्यक्ष असतील. यामध्ये कृषी, महसूल व वन, ग्राम विकास, जलसंपदा, पाणी पुरवठा व स्वच्छता आणि रोहयो विभागाचे अपर मुख्य सचिव किंवा सचिव सदस्य म्हणून काम पाहतील. मृद व जलसंधारण विभागाचे सचिव या कृती दलाचे सदस्य सचिव असतील. हे कृती दल प्रामुख्याने पुढील ३ महिन्यांत मृद व जलसंधारण योजनांतर्गत पूर्ण करावयाच्या सर्व कामांच्या नियोजनाचे संनियंत्रण करेल. आवश्यकतेनुसार संबंधित सर्व विभागांना कामांबाबत तातडीने सूचना देईल.
https://prahaar.in/2026/05/09/pm-modi-questions-eknath-shinde-about-the-helicopter-incident/
मिशन मोडवर काम करणार
जलसंधारणाची कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देणे आणि त्यांच्या कामाचा आढावा घेणे. क्षेत्रीय स्तरावर कामांची अंमलबजावणी करताना येणाऱ्या तांत्रिक किंवा प्रशासकीय अडचणींचे निराकरण करण्याची जबाबदारी टास्क फोर्सवर असेल. राज्यातील पाणी टंचाईचे संकट गडद होऊ नये आणि पावसाळ्यापूर्वी जलसंधारणाची कामे मार्गी लागावीत, यासाठी हे टास्क फोर्स ‘मिशन मोड’वर काम करणार आहे.