मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सेलिना जेटली (Celina Jaitly) सध्या आयुष्यातील अत्यंत वेदनादायी आणि कठीण टप्प्यातून जात आहे. एकीकडे पती पीटर हागसोबतचा तिचा घटस्फोटाचा वाद न्यायालयात सुरू आहे, तर दुसरीकडे स्वतःच्या मुलाला गमावल्याचे दुःख तिला आतून पोखरत आहे. अलीकडेच सेलिनाने सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडीओ शेअर केला असून, तो पाहून चाहत्यांच्याही डोळ्यात पाणी आले आहे. या व्हिडीओमध्ये ती तिचा दिवंगत मुलगा शमशेरच्या कबरीजवळ जाऊन त्याची स्वच्छता करताना दिसत आहे. मुलाच्या आठवणींनी व्याकूळ झालेल्या सेलिनाला यावेळी अश्रू अनावर झाले आणि ती स्वतःलाच सावरू शकली नाही.
View this post on Instagram
https://prahaar.in/2026/05/07/vijay-thalapathy-sarkar-movie/
हा व्हिडीओ शेअर करताना सेलिनाने एक मोठी भावनिक पोस्टही लिहिली आहे. तिने सांगितले की, गेल्या काही आठवड्यांमध्ये तिने आयुष्यातील सर्वात वेदनादायी क्षण अनुभवले आहेत. “मी एक आई आहे आणि आता माझ्या भावना लपवणं शक्य नाही,” असं म्हणत तिने आपल्या मनातील दुःख जगासमोर मांडलं. हा व्हिडीओ शेअर करणं तिच्यासाठी अजिबात सोपं नव्हतं, मात्र आपली वेदना आणि सत्य लोकांसमोर मांडण्याची गरज असल्याचं तिनं स्पष्ट केलं.
लग्नानंतर आयुष्यात केलेल्या तडजोडींबद्दल बोलताना सेलिनाने सांगितले की, तिने कुटुंब आणि नात्यासाठी स्वतःचं करिअर, देश आणि कुटुंबियांनाही मागे सोडलं होतं. पतीसोबत राहण्यासाठी ती भारतातून दुबई, सिंगापूर आणि ऑस्ट्रियापर्यंत गेली. पण एवढं सर्व काही करूनही तिच्या वाट्याला फक्त मानसिक त्रास, वेदना आणि संघर्षच आला, असा आरोप तिने केला आहे. मालमत्तेचं नुकसान करण्यात आलं असून मानसिक छळाचाही सामना करावा लागल्याचं तिनं पोस्टमध्ये म्हटलं आहे.
https://prahaar.in/2026/05/07/sunita-ahuja-lockup-show/
दरम्यान, सेलिना जेटलीची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेक नेटकरी आणि चाहते तिच्या समर्थनार्थ पुढे येत असून तिला धीर देण्याचा प्रयत्न करत आहेत. अभिनेत्रीने नोव्हेंबर २०२५मध्ये पती पीटर हागविरोधात घरगुती हिंसाचार आणि मानसिक छळाचा गुन्हा दाखल केला होता. सध्या हे प्रकरण न्यायालयात सुरू असून, सेलिनाच्या या भावनिक पोस्टमुळे पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा रंगली आहे.