Home ब्रेकिंग न्यूज Casting Yard Accident : दहिसर – भाईंदर जोड मार्ग कास्टिंग यार्ड दुर्घटना, VJTI मार्फत चौकशी

Casting Yard Accident : दहिसर – भाईंदर जोड मार्ग कास्टिंग यार्ड दुर्घटना, VJTI मार्फत चौकशी

0
Casting Yard Accident : दहिसर – भाईंदर जोड मार्ग कास्टिंग यार्ड दुर्घटना, VJTI मार्फत चौकशी
bmc news

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : दहिसर – भाईंदर जोड मार्ग कास्टिंग यार्ड येथे आज प्लॅटफॉर्म कोसळून दोन कामगारांचा मृत्यू झाल्याच्या घटनेची सखोल व निष्पक्ष चौकशी तातडीने करण्यात येईल. चौकशीत कामगार सुरक्षिततेत कोणतीही त्रुटी आढळल्यास संबंधित कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्यात येईल. कार्यस्थळी कामगारांच्या सुरक्षिततेबाबत प्रमाणित कार्यपद्धती निश्चित करण्यात आली असून तिचे पालन करण्यात आले होते का याची शहानिशा करण्यात येईल. तसेच, महानगरपालिका प्रशासनाकडून वस्तुस्थिती तपासली जाईल. नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी सुनिश्चित करण्यासाठी ‘VJTI’च्या प्राध्यापकांच्या तज्ज्ञ चमूची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर चमू सत्वर चौकशी करून वस्तुनिष्ठ व तथ्याधारित अहवाल सादर करणार आहे. अहवालातील निष्कर्षांच्या आधारे संबंधित कंत्राटदारांविरुद्ध कठोर व दंडात्मक कारवाई करण्यात येईल. कामगार सुरक्षिततेतील कोणत्याही त्रुटींची ओळख पटवून त्या दूर करण्यासाठी ठोस शिफारसी सादर करण्याची विनंती ‘VJTI’ टीमला करण्यात आली आहे.

मुंबईत विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून कामगारांच्या सुरक्षिततेबाबत कोणताही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. कामगार सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य असून कामगारांच्या सुरक्षिततेबाबत महानगरपालिका प्रशासनाचे शून्य सहिष्णुतेचे धोरण कायम आहे.

सर्व उंच आधार संरचना (गॅन्ट्री), क्रेन्स व इतर यंत्रसामग्रीची तृतीय पक्षामार्फत सखोल व पुनः सुरक्षा तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . तसेच, सुरक्षा लेखापरीक्षण नियमित व काटेकोरपणे राबविण्यात येत आहे.

किनारी रस्त्याच्या (वेसावे ते भाईंदर) सर्व पॅकेजमध्ये ‘कार्यस्थळ -आधारित सुरक्षा’ची आदर्श प्रणाली अनिवार्यपणे राबविण्यात येईल. कामगार सुरक्षा पडताळणीसाठी स्वतंत्र तज्ज्ञ संस्थेची नियुक्ती करून त्यांच्या माध्यमातून सुरक्षा प्रोटोकॉलची सखोल, सर्वंकष व पुनर्तपासणी सुनिश्चित करण्यात येईल; कोणतीही त्रुटी आढळल्यास तत्काळ दुरुस्तीची कार्यवाही करण्यात येईल, असेही महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.