मुंबई : मे 2026 महिन्यात देशभरातील बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली असून, विविध सण, राष्ट्रीय आणि प्रादेशिक सुट्ट्यांमुळे एकूण 13 दिवस बँका बंद राहणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) ने जाहीर केलेल्या अधिकृत सुट्टीच्या कॅलेंडरनुसार 27 एप्रिल ते 3 मे या आठवड्यातच काही महत्त्वाच्या सुट्ट्या येत असल्याने ग्राहकांनी बँकेच्या कामांचे नियोजन आधीच करणे गरजेचे ठरणार आहे.
या आठवड्यात 1 मे रोजी महाराष्ट्र दिन, कामगार दिन, बुद्ध पौर्णिमा आणि पंडित रघुनाथ मुर्मू जयंती या निमित्ताने देशातील बहुतांश राज्यांमध्ये बँका बंद राहतील. त्यानंतर 3 मे रोजी रविवार असल्यामुळे पुन्हा एकदा बँकांना सुट्टी असेल. मात्र 2 मे हा पहिला शनिवार असल्याने त्या दिवशी बँका सुरू राहणार आहेत. बँका दर महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या शनिवारी सुरू असतात, तर दुसरा आणि चौथा शनिवार सुट्टीचा असतो, ही बाब ग्राहकांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
https://prahaar.in/2026/04/28/contaminated-water-in-mantralaya-over-100-employees-at-mantralaya-fall-ill-due-to-contaminated-water/
बँकांच्या या सुट्ट्या ‘नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट’ अंतर्गत जाहीर केल्या जातात. या कायद्याअंतर्गत चेक क्लिअरन्स, प्रॉमिसरी नोट्स यांसारख्या व्यवहारांवर या दिवशी प्रक्रिया केली जात नाही. मात्र, विविध राज्यांमध्ये स्थानिक सणांनुसार सुट्ट्यांमध्ये थोडाफार फरक असू शकतो, त्यामुळे ग्राहकांनी आपल्या स्थानिक शाखेशी संपर्क साधून खात्री करणे अधिक योग्य ठरेल.
दरम्यान, शाखा बंद असल्या तरी डिजिटल बँकिंग सेवा सुरळीत सुरू राहणार आहेत. मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, यूपीआय व्यवहार आणि एटीएमद्वारे पैसे काढणे या सर्व सुविधा कोणत्याही अडथळ्याशिवाय उपलब्ध असतील. त्यामुळे तातडीचे व्यवहार ग्राहक ऑनलाइन माध्यमातून सहज करू शकतात.
https://prahaar.in/2026/04/28/big-news-mp-bajrang-sonawanes-car-meets-with-a-serious-accident-in-beed/
मे महिन्यातील इतर महत्त्वाच्या सुट्ट्यांमध्ये 9 मे रोजी रवींद्रनाथ टागोर जयंती, 16 मे राज्य दिन, 26 मे रोजी काझी नझरुल इस्लाम जयंती तसेच 27 आणि 28 मे रोजी बकरी ईद (ईद-उल-अजहा) यांचा समावेश आहे. याशिवाय सर्व रविवार आणि दुसरा व चौथा शनिवार (9 व 23 मे) या दिवशीही बँका बंद राहणार आहेत.
अनेक सुट्ट्यांचा एकत्र परिणाम पाहता, ग्राहकांनी चेक क्लिअरन्स, कर्ज व्यवहार किंवा इतर महत्त्वाच्या बँकिंग कामांसाठी आधीच नियोजन करणे गरजेचे आहे. अन्यथा शेवटच्या क्षणी अडचणींचा सामना करावा लागू शकतो.