Home ब्रेकिंग न्यूज Panvel : पनवेलच्या आदई-नेवाळी दगडखाणीबाबत गावकऱ्यांच्या विश्वासाने तोडगा काढणार

Panvel : पनवेलच्या आदई-नेवाळी दगडखाणीबाबत गावकऱ्यांच्या विश्वासाने तोडगा काढणार

0
Panvel : पनवेलच्या आदई-नेवाळी दगडखाणीबाबत गावकऱ्यांच्या विश्वासाने तोडगा काढणार
CHANDRASHEKHAR BAWANKULE

मुंबई : रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातल्या आदई आणि नेवाळी येथील दगडखाणींमुळे स्थानिक ग्रामस्थांना होणाऱ्या त्रासाची गंभीर दखल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली असून, हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांसोबत बैठक घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट करण्याचे निर्देश महसूलमंत्र्यांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रालयातील आपल्या दालनात बैठक घेतली. या बैठकीत खाणकामाच्या परवानग्या आणि स्थानिकांच्या तक्रारींबाबत चर्चा करण्यात आली. त्यावेळी हे निर्देश देण्यात आले.

आदई आणि नेवाळी परिसरातील दगडखाणींमुळे स्थानिक नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. या खाणींना देण्यात आलेल्या ‘तात्पुरत्या स्वरूपाच्या’ परवानग्यांवरून स्थानिकांनी आक्षेप घेतला होता. या खाणींच्या कायदेशीर बाबी आणि नियमावलीबाबत ग्रामस्थांमध्ये संभ्रम आणि असंतोष निर्माण झाला होता.

या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, सध्या सुरू असलेल्या खाणकामाच्या परवानग्या नियमानुसार तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत. यावर महसूलमंत्र्यांनी थेट हस्तक्षेप करत निर्देश दिले की, संबंधित गावच्या ग्रामस्थांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः गावकऱ्यांना बोलावून त्यांच्याशी संवाद साधावा आणि खाणकाम सुरू असलेल्या खाणींबाबतची वस्तुस्थिती त्यांना सविस्तर समजावून सांगावी. जर खाणकाम नियमानुसार आणि कायदेशीर चौकटीत सुरू असेल, तर तसे ग्रामस्थांना पटवून द्यावे. या बैठकीतून स्थानिकांच्या तक्रारींचे निरसन करून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा, अशा स्पष्ट सूचना महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिल्या आहेत.