Home ब्रेकिंग न्यूज Iran-US-Israel War : इराणला मोठा धक्का! माजी परराष्ट्र मंत्री कमाल खर्राजी यांचे निधन

Iran-US-Israel War : इराणला मोठा धक्का! माजी परराष्ट्र मंत्री कमाल खर्राजी यांचे निधन

0
Iran-US-Israel War : इराणला मोठा धक्का! माजी परराष्ट्र मंत्री कमाल खर्राजी यांचे निधन
Former Foreign Minister Kamal Kharrazi

– अमेरिकेच्या हवाई हल्ल्यानंतर प्राणज्योत मालवली

इराण अमेरिका युद्धाबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. इराणचे माजी परराष्ट्र मंत्री कमाल खर्राजी यांचे गुरुवारी (९ एप्रिल) उशिरा रात्री निधन झाले. गेल्या आठवड्यात झालेल्या अमेरिकन हवाई हल्ल्यात ते जखमी झाले होते. या वृत्ताची पुष्टी इराणच्या सरकारी दूरदर्शनने केली आहे. त्यामुळे आता हे युद्ध कोणतं वळण घेणार याकडे संपूर्ण जगाचं लक्ष आहे.

अहवालानुसार, तेहरानमधील त्यांच्या निवासस्थानी हा हल्ला करण्यात आला होता. हल्ल्यानंतर त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. इराणी माध्यमे आणि स्थानिक अहवालांमध्ये याला ‘हत्या करण्याचा प्रयत्न’ असे म्हटले आहे.

https://prahaar.in/2026/04/10/iran-us-israel-war-ceasefire-how-can-pakistan-which-indirectly-helps-iran-be-a-peacemaker-america-questions-pakistans-mediation-role/

खर्राजी हे इराणच्या ‘स्ट्रॅटेजिक फॉरेन रिलेशन्स कौन्सिल’चे अध्यक्ष होते. ही संस्था थेट देशाच्या सर्वोच्च नेत्याला सल्ला देते आणि परराष्ट्र धोरणाशी संबंधित महत्त्वाच्या निर्णयांमध्ये मोठी भूमिका बजावते. ही घटना अशा वेळी घडली आहे, जेव्हा अमेरिका आणि इस्रायलचे इराणवरील हल्ले सलग पाचव्या आठवड्यातही सुरू आहेत. मोहम्मद खातामी यांच्या सुधारवादी कार्यकाळात खर्राजी यांनी परराष्ट्र मंत्री म्हणून काम केले होते. त्यानंतर त्यांनी देशाचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचे परराष्ट्र विषयक सल्लागार म्हणूनही महत्त्वाची जबाबदारी सांभाळली.

खर्राजी २०२२ मध्ये दिलेल्या एका विधानामुळेही चर्चेत आले होते. एका मुलाखतीत त्यांनी म्हटले होते की, इराणकडे अणुबॉम्ब तयार करण्याची तांत्रिक क्षमता आहे, मात्र तो तयार करण्याचा निर्णय देशाने घेतलेला नाही. त्यांच्या या वक्तव्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर इराणच्या भूमिकेबाबत चिंता वाढली होती.