महसूल विभागात हालचाली; ‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संधी हुकणार?
मुंबई : राज्याच्या महसूल विभागात तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना थेट उपजिल्हाधिकारी पदी पदोन्नती देण्याच्या हालचालींना वेग आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी १०८ तहसीलदारांना पदोन्नती दिल्यानंतर, आता पुन्हा ५१ तहसीलदारांची उपजिल्हाधिकारी पदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. मात्र, या मोठ्या प्रमाणावरील पदोन्नतीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) माध्यमातून थेट उपजिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, त्यांच्या संधीवर गदा येण्याची भीती व्यक्त होत आहे.
विद्यार्थ्यांचा वाढता विरोध
– राज्यात स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक आधीच विस्कळीत असल्याने विद्यार्थी हवालदिल आहेत. त्यातच महसूल विभागाने यापूर्वी १०८ जणांना दिलेल्या पदोन्नतीवर विद्यार्थ्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला होता. आता पुन्हा ५१ पदांची प्रक्रिया राबवली जात असल्याने ‘एमपीएससी’च्या माध्यमातून होणाऱ्या थेट पदभरतीवर संक्रांत येईल, अशी भावना उमेदवारांमध्ये आहे.