Home क्रीडा IPL IPL 2026 : शुभमन गिलच्या दुखापतीमुळे गुजरात टायटन्सच्या चिंतेत वाढ

IPL 2026 : शुभमन गिलच्या दुखापतीमुळे गुजरात टायटन्सच्या चिंतेत वाढ

0
IPL 2026 : शुभमन गिलच्या दुखापतीमुळे गुजरात टायटन्सच्या चिंतेत वाढ
shubhman gill

मुंबई : गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल (Shubman Gill) आयपीएल २०२६ च्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या (Rajsthan Royals) सामन्यात खेळू शकला नाही. त्याच्या अनुपस्थितीमुळे संघाला पराभव स्वीकारावा लागला. जर तो राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात संघात असता, तर निकाल कदाचित वेगळा लागला असता. सामना संपला आहे आणि संघ पुढील सामन्यावर लक्ष केंद्रित करत आहे. पण चाहत्यांना अजूनही एक प्रश्न पडला आहे की, गिल मैदानावर कधी परतणार? .

सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचा तिसरा सामना ८ एप्रिल २०२६ रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे. या महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वी, सहाय्यक प्रशिक्षक पार्थिव पटेल यांनी गिलच्या पुनरागमनावर मौन सोडले आहे. ते म्हणाले की, संघ गिलच्या लवकरच परतण्याची आशा बाळगून आहे. पटेल म्हणाले, “नोव्हेंबर २०२५ मध्ये खेळल्या गेलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेदरम्यान त्याच्या मानेला दुखापत झाली होती. अलीकडेच त्याला पुन्हा त्रास जाणवू लागला. आम्हाला आशा आहे की, तो आगामी सामन्यासाठी तंदुरुस्त होईल.” ही दुखापत फार गंभीर दिसत नाही. दुखापतींचे व्यवस्थापन हे माझ्या कौशल्याचे क्षेत्र नाही, पण मी तुम्हाला खात्री देतो की तो लवकरच बरा होईल. राजस्थान रॉयल्सविरुद्ध शुभमन गिलच्या अनुपस्थितीत राशिद खानने गुजरातचे नेतृत्व केले.

रवी बिश्नोईच्या (Ravi Bishnoi) भेदक गोलंदाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सवर विजय मिळवला. राजस्थानने हा रोमांचक सामना ६ धावांनी जिंकला. पंजाब किंग्सविरुद्धचा सलामीचा सामना गमावल्यामुळे गुजरातची आयपीएल २०२६ मध्ये सुरुवात खराब झाली. दुखापतीमुळे शुभमन गिल संघाबाहेर होता आणि त्याच्या जागी राशिद खानने (Rashid Khan) संघाचे नेतृत्व केले.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राजस्थान रॉयल्सने दमदार सुरुवात केली. यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी यांनी शानदार फलंदाजी करत ६.२ षटकांत पहिल्या विकेटसाठी ७० धावा जोडल्या. वैभवने १८ चेंडूंमध्ये पाच चौकार आणि एका षटकारासह ३१ धावा केल्या. यशस्वीने ३६ चेंडूंमध्ये ५५ धावांची शानदार खेळी केली.