Home ब्रेकिंग न्यूज देशात इंधनाचा तुटवडा नाही, तरीही पंतप्रधान मोदींची स्ट्रॅटर्जी तयार

देशात इंधनाचा तुटवडा नाही, तरीही पंतप्रधान मोदींची स्ट्रॅटर्जी तयार

देशात इंधनाचा तुटवडा नाही, तरीही पंतप्रधान मोदींची स्ट्रॅटर्जी तयार

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; अफवा पसरवणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

मुंबई : जागतिक स्तरावर इंधनाचे मोठे संकट उभे ठाकलेले असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे भारताला त्याची झळ बसलेली नाही. देशात इंधनाचा कोणताही तुटवडा नाही आणि भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी केंद्र सरकारची रणनीती तयार आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली. दरम्यान, इंधन टंचाई किंवा टाळेबंदीबाबत (लॉकडाऊन) चुकीच्या बातम्या आणि अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध राज्य सरकार कठोर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, जगातील अनेक विकसित देशांमध्ये इंधन संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही देशांनी कामाचे दिवस कमी करून चार दिवसांचा आठवडा केला आहे, तर काहींनी सक्तीचे ‘वर्क फ्रॉम होम’ लागू केले आहे. मात्र, भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशी परिस्थिती उद्भवू दिली नाही. ज्या पद्धतीने त्यांनी या संकटाचे व्यवस्थापन केले, त्याचे कौतुक सर्वच मुख्यमंत्र्यांनी बैठकीत केले. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किमती वाढूनही केंद्र सरकारने त्याचा भार स्वतः उचलल्याने सर्वसामान्यांना त्याची झळ बसली नाही, असे फडणवीस यांनी सांगितले.

अफवा पसरवणे हा ‘देशद्रोह’च!

देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार आहे का, असे विचारले असता फडणवीस म्हणाले, “काही लोक जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करत आहेत. देशात किंवा राज्यात कुठेही लॉकडाऊन लागणार नाही. अशा अफवा पसरवणे हा एक प्रकारे देशद्रोहच आहे. अशा खोडसाळ प्रवृत्तींवर कठोर कारवाई केली जाई,” असा इशारा त्यांनी दिला.

इंधन सुरक्षेसाठी पीएनजीवर भर

राज्यात एलपीजी सिलिंडरचा पुरवठा ७५ टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. भविष्यात सिलिंडरची टंचाई भासू नये म्हणून ‘पीएनजी’ (पाईप गॅस) जोडणी प्रक्रियेला गती दिली जात आहे. गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रातील अटी व शर्ती शिथील करण्यात आल्या आहेत. या संदर्भात राज्य सरकारने शासन निर्णय निर्गमित केला आहे. पाईप गॅसचा विस्तार झाल्यास घरगुती एलपीजीवरील अवलंबित्व कमी होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. देशात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि भविष्यासाठीही सरकारची तयारी पूर्ण आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये आणि घाबरून जाऊ नये, असे आवाहन देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.