मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे नेतृत्व, माजी उपमुख्यमंत्री तथा दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या हृदयद्रावक घटनेला आज दोन महिने पूर्ण झाले आहेत. २८ जानेवारी २०२६ च्या त्या दुर्दैवी सकाळी ९ वाजता नियतीने ‘दादां’ना महाराष्ट्रापासून हिरावून नेले. आज दोन महिने उलटले तरी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता आणि नेता या धक्क्यातून सावरलेला नाही. महाराष्ट्राच्या जनमानसात आजही या अपघाती निधनामुळे तीव्र वेदना आहेत. या दुःखद प्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भावूक होत अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. दुसरीकडे, या विमान अपघाताबाबतचा संशय अद्याप मिटलेला नाही. आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा, यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विधानसभेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “हा अपघात जर घातपात असल्याचे निष्पन्न झाले, तर त्यामागे असलेल्या कोणालाही सोडले जाणार नाही,” असा कडक इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला आहे. दादांच्या विरहाच्या वेदना आणि तपासाची टांगती तलवार यामुळे आजही राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
https://prahaar.in/2026/03/28/eknath-shinde-said-saheb-while-showing-culture-vidhan-parishad-but-uddhav-thackeray-jyoti-waghmare-s-blunt-criticism/
दादा,
आज तुम्हाला जाऊन दोन महिने पूर्ण झाले. काळ पुढे सरकतोय, पण मन अजूनही तुमच्याच आठवणींमध्ये गुंतून राहिले आहे. प्रत्येक क्षणी तुमची उणीव प्रकर्षाने जाणवते आणि त्याचवेळी दैनंदिन राजकीय व सामाजिक कामकाजात तुमचे अस्तित्वही जाणवत राहते.तुमच्यातील लोकाभिमुख – विकासाभिमुख… pic.twitter.com/AH7XfoxsOI
— Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) March 28, 2026
शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार आणि दादांची शिकवण
“राष्ट्रवादी काँग्रेसची वाटचाल ही नेहमीच शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांवर आधारित राहिली आहे आणि भविष्यातही अजितदादांनी दिलेली हीच प्रेरणा आमचा मार्ग उजळवत राहील,” असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला आहे. अजित पवार यांच्या निधनाला दोन महिने पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली. लोककल्याणाचे कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेताना, “या परिस्थितीत दादांनी काय केले असते?” हा विचार करूनच मी प्रत्येक पाऊल उचलते, असे सांगताना त्या कमालीच्या भावूक झाल्या. अजितदादांच्या अनुपस्थितीमुळे निर्माण झालेली राजकीय आणि वैयक्तिक पोकळी कधीही भरून निघणारी नाही, याची जाणीव कायम सतावत असल्याचेही त्यांनी नमूद केले. मात्र, दादांनी दिलेली मूल्ये, त्यांची कार्यपद्धती आणि त्यांनी जपलेला वारसा हेच आता राष्ट्रवादी परिवारासाठी मार्गदर्शक दीप ठरत आहेत. “तुमच्या शब्दांमधील ताकद मला आजही संकटात उभे राहण्याची ऊर्जा देते. तुमची स्वप्ने पूर्ण करणे आणि तुम्ही दाखवलेली जनसेवेची दिशा पुढे नेणे, हाच माझा खरा निर्धार आहे,” अशा शब्दांत सुनेत्रा पवारांनी अजितदादांच्या विचारांशी असलेली आपली बांधीलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.