Home ब्रेकिंग न्यूज युद्धावर अब्जावधी डॉलर खर्च झाल्यामुळे अमेरिका आर्थिक संकटात, विमानतळ कर्मचाऱ्यांचा पगार देणार अ‍ॅलन मस्क ?

युद्धावर अब्जावधी डॉलर खर्च झाल्यामुळे अमेरिका आर्थिक संकटात, विमानतळ कर्मचाऱ्यांचा पगार देणार अ‍ॅलन मस्क ?

0
युद्धावर अब्जावधी डॉलर खर्च झाल्यामुळे अमेरिका आर्थिक संकटात, विमानतळ कर्मचाऱ्यांचा पगार देणार अ‍ॅलन मस्क ?

वॉशिंग्टन डीसी : अमेरिका आणि इस्रायल यांनी २८ फेब्रुवारी २०२६ पासून इराण विरोधात युद्ध सुरू केले आहे. या युद्धात २३ दिवसांत अमेरिकेने अब्जावधी डॉलर खर्च केले आहेत. या खर्चामुळे अमेरिका सरकार देशातील विमानतळ कर्मचाऱ्यांचे पगार करू शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. विमानतळांवर प्रवाशांची सुरक्षा आणि हालचालींचे व्यवस्थापन करणाऱ्या टीएसए (TSA) कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहेत. हे थकीत पगार देण्यासाठी उद्योगपती अ‍ॅलन मस्क यांनी पुढाकार घेतला आहे. विमानतळावर काम करणाऱ्या ट्रान्सपोर्टेशन सिक्युरिटी ॲडमिनिस्ट्रेशनच्या (TSA) कर्मचाऱ्यांचे पगार देण्याची तयारी मस्क यांनी दाखवली आहे.

टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ अ‍ॅलन मस्क यांची संपत्ती २१ मार्च २०२६ च्या नोंदीनुसार ८१४ अब्ज डॉलर एवढी आहे. ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्यापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर लॅरी पेज आहेत. या पार्श्वभूमीवर मस्क यांनी विमानतळावर काम करणाऱ्या ट्रान्सपोर्टेशन सिक्युरिटी ॲडमिनिस्ट्रेशनच्या (TSA) कर्मचाऱ्यांचे पगार देण्याची तयारी दाखवली आहे.

युद्धाच्या मुद्यावरून अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात राजकीय संघर्ष सुरू आहे. यामुळे अनेक सरकारी निधींच्या विनियोगाचे निर्णय रखडले आहेत. विमानतळावर काम करणाऱ्या ५० हजार ट्रान्सपोर्टेशन सिक्युरिटी ॲडमिनिस्ट्रेशनच्या (TSA) कर्मचाऱ्यांचे पगार पण थकले आहेत. हे पगार देऊन अमेरिका सरकारवरील थकबाकी दूर करण्याची तयारी मस्क यांनी दाखवली आहे.

पगार मिळत नसल्यामुळे ट्रान्सपोर्टेशन सिक्युरिटी ॲडमिनिस्ट्रेशनचे सुमारे २० टक्के कर्मचारी मागील काही दिवसांपासून रजेवर आहेत. यामुळे विमानतळावरील कामकाजाचे व्यवस्थापन हा एक कठीण मुद्दा झाला आहे.

अमेरिकेत, वाहतूक सुरक्षा प्रशासन अर्थात ट्रान्सपोर्टेशन सिक्युरिटी ॲडमिनिस्ट्रेशनचे (TSA) कर्मचारी विमानतळ सुरक्षा आणि प्रवासी वाहतुकीसाठी जबाबदार असतात. त्यांचे पगार अमेरिकेचे संघीय सरकार देते. TSA ही अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाची (DHS) एक एजन्सी असल्यामुळे, तिचे बजेट आणि पगार अमेरिकन काँग्रेसने मंजूर केलेल्या कायद्यानुसार ठरवले जातात. अंशतः सरकारी कामकाज ठप्प झाल्यामुळे टीएसए कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळण्यास अडचणी येत आहेत. अत्यावश्यक सेवा असल्यामुळे, त्यांना विनावेतन काम करण्यासही भाग पाडले जात आहे.

संघीय कायद्यांमुळे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी व्यावसायिकाची मदत अर्थात बाह्य मदत मिळवण्याची प्रक्रिया गुंतागुंतीची आहे. यावर काय आणि कसा मार्ग काढणार हे अद्याप अस्पष्ट आहे. पण मस्क यांनी विमानतळ कर्मचाऱ्यांचा पगार देण्याची तयारी दाखवल्यामुळे जगाचे लक्ष अमेरिकेतल्या आर्थिक संकटाकडे वेधले गेले आहे.