मुंबई : भाजप नेत्या आणि महापौर रितू तावडे यांनी फेसबुकच्या माध्यमातून एक आक्रमक पोस्ट शेअर करत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर (UBT) जोरदार हल्ला चढवला आहे. “मिठी नदीतून निघणारा गॅस ही नैसर्गिक संपत्ती नसून, गेली २५ वर्षे मुंबईवर सत्ता गाजवणाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचा साचलेला कचरा आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
https://prahaar.in/2026/03/14/state-government-guidelines-for-gas-cylinder-supply-priority-to-essential-services-stocks-are-ample-appeal-issued-not-to-heed-rumors/
२५ वर्षांच्या सत्तेचा हिशोब अन् ‘ब्रिमस्टोवॅड’चा उल्लेख
रितू तावडे यांनी आपल्या पोस्टमध्ये मुंबई महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या अकार्यक्षमतेवर बोट ठेवले आहे. मिठी नदीच्या रुंदीकरणासाठी आणि स्वच्छतेसाठी ‘ब्रिमस्टोवॅड’ (Brimstowad) प्रकल्पांतर्गत हजारो कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, इतका मोठा निधी खर्च होऊनही प्रत्येक पावसाळ्यात मुंबई का बुडते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “हा पैसा मुंबईकरांच्या हितासाठी वापरण्याऐवजी मातोश्रीच्या लाडक्या कंत्राटदारांच्या तिजोरीत गेला आहे,” असा खळबळजनक आरोपही त्यांनी यावेळी केला.
देशाला ऊर्जेच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्रंदिवस प्रयत्न करत असताना आणि ‘उज्ज्वला’ योजनेद्वारे घराघरात गॅस पोहोचवत असताना, मुंबईतील नेत्यांनी मात्र येथील जलस्त्रोतांना ‘गॅस चेंबर’ बनवून ठेवले आहे, अशी टीका तावडे यांनी केली. मिठी नदीच्या दुर्गंधीमुळे स्थानिक नागरिकांना श्वसनाचे आजार होत असून, स्वतःला ‘पर्यावरण प्रेमी’ म्हणवणारे नेते २५ वर्षांत एक नदी स्वच्छ करू शकले नाहीत, हेच त्यांच्या सत्तेचे सर्वात मोठे अपयश असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘मिठी घोटाळ्याची’ चौकशी होणार
रितू तावडे यांनी मुंबईकरांना आवाहन करताना म्हटले आहे की, आता नाक बंद करून जगण्याचे दिवस संपले असून भ्रष्टाचाराला गाडण्याची वेळ आली आहे. “आमची मुंबईत सत्ता आल्यावर आम्ही या ‘मिठी घोटाळ्याची’ सखोल चौकशी करू. हे भ्रष्टाचाराचे स्मारक आम्ही नष्ट करू,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबईला या दुर्गंधीतून आणि भ्रष्टाचारातून मुक्त करण्यासाठी भाजप कटिबद्ध असल्याचेही त्यांनी शेवटी स्पष्ट केले.