मुंबई : बोरिवलीच्या निसर्गरम्य संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आजपासून ‘वनराणी’ पुन्हा एकदा पर्यटकांच्या सेवेसाठी सज्ज झाली असून, उद्यानाचा कोपरा न कोपरा आता पुन्हा या ट्रेनच्या आवाजाने दुमदुमणार आहे. गेल्या ४ वर्षांपासून तांत्रिक कारणांमुळे आणि चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे बंद असलेली ही सेवा आता नव्या रुपात भाविकांच्या आणि पर्यटकांच्या भेटीला येत आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते आज दुपारी १२ वाजता या ट्रेनला हिरवा कंदिल दाखवण्यात येईल.
नव्या ‘वनराणी’ची खास वैशिष्ट्ये
https://prahaar.in/2026/03/14/relief-for-travelers-during-summer-vacations-special-summer-trains-to-run-on-several-routes-including-mumbai-pune-and-solapur/
यावेळी उद्यानात एक नाही तर दोन वेगवेगळ्या प्रकारच्या टॉय ट्रेन्स पर्यटकांचे मनोरंजन करणार आहेत. अहमदाबादहून दाखल झालेली ही ट्रेन आधुनिकतेचा नमुना आहे. याचे छप्पर पारदर्शक असून खिडक्या मोठ्या आहेत, ज्यामुळे पर्यटकांना ट्रेनमध्ये बसूनही जंगलाच्या सौंदर्याचा मनसोक्त आनंद घेता येईल. ही ट्रेन पूर्णपणे मोकळी (Open) असल्यामुळे निसर्गाच्या अगदी जवळ असल्याचा अनुभव पर्यटकांसाठी रोमांचकारी ठरेल. विशेषतः मुलांना ही ट्रेन भुरळ घालणारी ठरणार आहे.
बंद पडलेली सेवा आणि पुनरुज्जीवन
२०२१ मध्ये आलेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे उद्यानातील रेल्वे मार्गाचे आणि इंजिनचे मोठे नुकसान झाले होते, परिणामी ही सेवा थांबवण्यात आली होती. मात्र, उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांनी या प्रकल्पात वैयक्तिक रस घेऊन पाठपुरावा केल्यामुळे या ऐतिहासिक टॉय ट्रेनचे पुनरुज्जीवन होऊ शकले आहे. या नवीन रेल्वे प्रणालीची सर्व चाचणी पूर्ण झाली असून, ती आता प्रवाशांसाठी सुरक्षित आणि सज्ज आहे.