बांधिलकी

बांधिलकी

जीवनगंध : पूनम राणे

आज कौशिकचा अकरावा वाढदिवस होता. कौशिकने आपल्या मित्र- मैत्रिणींना वाढदिवसासाठी आमंत्रित केले होते. विविध रंगांच्या फुग्यांनी घर सजवले होते. ‘हॅपी बर्थडे’ कौशिक असा त्याच्या नावाचा फलक लावण्यात आला होता. आईने कौशिकसाठी सुंदर ड्रेस खरेदी केला होता. कौशिकी आणि कौशिक ही दोन भावंडे. कौशिकी बाबांची लाडकी होती, तर कौशिक आईचा लाडला होता. आईने कौशिकसाठी त्याच्या आवडीचा केक घरीच तयार केला होता.

कौशिकचे आजी-आजोबा गावावरून मुंबईला आले होते. ते दोघेजण मोठ्या आनंदाने या कार्यक्रमात सहभागी झाले होते. वाढदिवसासाठी कौशिकचे काका, काकी, मावशी, आत्या व त्यांची मुले उपस्थित होती. सारे घर माणसांनी भरून गेले होते. साऱ्या घरात आनंदी वातावरण होते. बरोबर ७ वाजता कार्यक्रम सुरू झाला. जमलेल्या सर्वांनी कौशिकचे औक्षण केले. केक कापून, सर्वांनी टाळ्या वाजवून ‘हॅपी बर्थडे’ या गाण्यावर नृत्य सुरू केले. कौशिकच्या मित्र-मैत्रिणींनी व नातेवाइकांनी कौशिकला भेटवस्तू दिल्या. कौशिकनेही आलेल्या सर्वांना भेटवस्तू दिली.

कार्यक्रम सुरू असतानाच बाबा म्हणाले, आज आपण सर्वजण येथेच जवळ असणाऱ्या एका वृद्धाश्रमाला भेट देणार आहोत. कौशिकच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सहवास या वृद्धाश्रमातील वृद्धांना आपण अन्नदान करणार आहोत. तेथील वृद्धांना जाऊन भेटणार आहोत. त्यांची विचारपूस करणार आहोत. त्यांच्यासोबत एक-दोन तास आनंदाने घालवणार आहोत. जेणेकरून त्यांनाही त्यांच्या जीवनात आनंद निर्माण होईल. सर्व मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. सर्वांनी आनंदात उड्या मारून जोरदार टाळ्या वाजवल्या.

घरापासून वृद्धाश्रम जवळच असल्याने सर्वजण चालतच वृद्धाश्रमात पोहोचले. पूर्वकल्पना वृद्धाश्रम चालकांना देण्यात आली होती. सर्वजण वृद्धाश्रमात पोहोचले. एका हॉलमध्ये सर्व आजी-आजोबांना एकत्र करण्यात आले. सर्वांसमोर केक कापून पुन्हा एकदा कौशिकचा वाढदिवस आजी-आजोबांसोबत साजरा करण्यात आला. कौशिकच्या बाबांनी शंभर शाल वृद्धांसाठी आणल्या होत्या. त्या सर्व शाल कौशिक व त्याच्या मित्रांच्या हस्ते वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना देण्यात आल्या. आज विशेष आनंद आजी-आजोबांच्या चेहऱ्यावर दिसत होता. मात्र त्यांची नजर जमलेल्या मुलांमध्ये आपल्या नातवंडांना शोधत होती.

काही आजी-आजोबांनी सुंदर गाणी गायली. काही आजोबांनी एकपात्री अभिनय सादर केला. दोन तास केव्हा गेले हे कळलेच नाही. शेवटी एका आजीने आपले मनोगत व्यक्त केले, ती म्हणाली, “आम्ही वृद्ध झालो आहोत. आमच्या घरी आमची काळजी घ्यायला कोणीही नाही. एकटेपण खायला येते. काहींची मुले परदेशी शिकत आहेत. काहींचे पती किंवा पत्नी त्यांना सोडून देवाघरी गेलेले आहेत. त्यामुळे येथे समवयस्कांसोबत राहून सहजीवनाचा आम्हाला आनंद घेता येतो. वृद्धाश्रम ही काळाची गरज आहे असे आम्हाला वाटते. आपल्यासारखे पालक आणि मुले येऊन इथे आम्हाला भेटतात आणि आम्हाला आमची नातवंडे भेटल्याचा आनंद मिळतो. त्यात आपण दिलेली ही मायेची शाल या थंडीच्या दिवसांत आम्हाला नेहमीच उपयोगी पडेल. आपली आठवण सतत आमच्या सोबत राहील. सर्वजण मोठे व्हा. समाजाची बांधिलकी लक्षात ठेवा.” यावर सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवल्या आणि सोबत आलेली मुले म्हणाली, “हो… हो… आम्हीही आमचा वाढदिवस इथेच साजरा करण्यासाठी आमच्या आई-बाबांसोबत येऊ,” असे म्हणून सर्वांचा निरोप घेऊन सर्वजण घरी परतले.

तात्पर्य : आपणही अशा छोट्या कार्यक्रमातून प्रसंगातून इतरांना आनंद देऊ शकतो आणि समाजाशी बांधिलकी ठेवू शकतो.