Home ब्रेकिंग न्यूज विधिमंडळ हेही विनोदांना जन्म देणारे व्यासपीठ

विधिमंडळ हेही विनोदांना जन्म देणारे व्यासपीठ

0
विधिमंडळ हेही विनोदांना जन्म देणारे व्यासपीठ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधान भवनात ‘जावे विनोदाच्या गावा’ विशेष कार्यक्रम

मुंबई : “विधिमंडळ हेही एकप्रकारे अनेक विनोदांना जन्म देणारे व्यासपीठ आहे. कारण, येथे तिथे घडणाऱ्या घटना, विनोद जर कमी केले, तर कदाचित मराठी नाटक-चित्रपट यांच्या कथानकांमध्ये ५० टक्के घट येईल, इतका मसाला आपण सगळे मिळून साहित्यिकांना देत असतो. त्यामुळे आपणदेखील साहित्याची निर्मिती करत असतो”, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी केले.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधान भवनात आयोजित ‘जावे विनोदाच्या गावा’ या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उपसभापती नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्यासह आमदार आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी खास शैलीत केलेल्या कोट्यांमुळे उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.

मुख्यमंत्री म्हणाले, “पूर्वी विधानमंडळात भाषणांमध्ये विनोद, कोट्या, व्यंग अशा अनेक छटा पाहायला मिळायच्या. अलिकडच्या २०-२५ वर्षांत विलासराव, गोपीनाथ मुंडे यांच्या भाषणांमध्ये एकमेकांवर केलेल्या कोट्या, त्यातून निर्माण होणारे विनोद असायचे. पण दुर्दैवाने अलिकडच्या काळात अनेकदा विनोदाला अस्मितेशी जोडले जाते. त्यामुळे त्या विनोदातले मर्म निघून जाते. माणूस हल्ली घाबरून-घाबरून विनोद करायला लागला आहे. आपण जे बोलतोय त्यातून काय अर्थ निघेल आणि दिवसभर माध्यमांमध्ये काय चालेल, त्यामुळे आपल्या भाषणांतला निखळ आनंद कमी झालेला आहे”, अशी खंत फडणवीस यांनी भाषणात बोलून दाखवली.

भाषेमुळे मुंबईत आल्या अडचणी

मुंबईत आल्यानंतर सुरुवातीच्या काळात आपल्याला मराठीमुळे फार अडचणींचा सामना करावा लागल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. “आपली मराठी भाषा दर ५-७ किलोमीटरवर बदलते. मी मुंबईत आलो तेव्हा सुरुवातीच्या काळात मला फार अडचणी आल्या होत्या. कारण शब्दाशब्दाला ‘का बे’, ‘साल्या’ असे ‘सांस्कृतिक’ मराठी मी बोलायचो. पण येथे आल्यावर मला लक्षात आले, की ही संस्कृती मुंबईला पटण्यासारखी नाही. पुण्यात तर आपल्याला बहिष्कृतच केले जाईल. त्यामुळे मी हळूहळू स्वत:ला उत्तम मराठी कसे बोलता येईल या दिशेने नेले. पण प्रत्येक भागातल्या मराठीचा आपला गोडवा आपल्याला कायम ठेवायचा आहे”, असेही ते म्हणाले.

 “आज आपण मराठीचा गौरव करत आहोत. यानिमित्ताने आपली भाषा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवी, यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. लोकसाहित्य, लोककला, लोकनाट्य, लोकगीते आपल्याला जिवंत कशी ठेवता येतील हे बघावे लागेल. जगात इंग्रजी सर्वात मोठी भाषा आहे. कारण ती राज्यकर्त्यांची भाषा होती. राज्यकर्त्यांची भाषा ही जगाची भाषा होते. त्यामुळे आपणही आपल्या भाषेला ज्ञानभाषेत रुपांतरीत करायला हवे. मराठी बोलणाऱ्याला मराठीमुळे प्रगती करता येते, असा भाव आपण निर्माण करायला हवा”, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.