ठाणे : कार एक्स्पो नव्हे तर ठाण्याच्या महानगरपालिका मुख्यालयाच अंगण आलिशान गाड्यांनी व्यापून गेलं होत. निमित्त होत शुक्रवारी झालेल्या ठाणे महापालिकेच्या महासभेचे. सभेला येताना नगरसेवकांनी आणलेल्या गाड्या महापालिकेच्या महासभेपेक्षा चर्चेचा विषय ठरला. वेलफेयर… डिफेंडर…थार… हायक्रॉस…. या गाड्यांवरूनच ठाण्याच्या नगरसेवकांचा रुबाब झळकून आला.
तब्बल चार वर्षांपासून सुरु असलेला प्रशासक कार्यकाळ संपुष्टात येऊन महापौर – उपमहापौर विराजमान झाल्यानंतर शुक्रवारी ठाणे महापालिकेची सर्वसाधारण सभा झाली. याआधी प्रशासक कार्यकाळ सुरु होण्याआधी कोरोना काळातही पालिका मुख्यालयात नगरसेवकांची वर्दळ कमी झाली होती. त्यामुळे लोकप्रतिनिधींचा फारसा वावर मुख्यालयात नसल्याने अधिकारी – कर्मचारीही सुशेगात होते. मात्र नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर काही दिवसातच महापौर – उपमहापौर निवड झाली. त्यावेळी एकत्र आलेले लोकप्रतिनिधी शुक्रवारी पुन्हा प्रथमच होणाऱ्या महासभेसाठी जमले.
आलिशान गाड्या
याच सभेच्या निमित्ताने नगरसेवक आपल्या लाखोंच्या गाड्यांसह दाखल झाले. काही गाड्यांची किंमत दोन ते अडीच कोटींच्या घरात असून या महागड्या गाड्यांच्या शर्यतीत सत्ताधाऱ्यांसह विरोधकही आघडीवर होते.