Home ब्रेकिंग न्यूज Latur: वडिलांच्या निधनानंतर अवघ्या दीड तासात दिला बारावीचा पेपर; शिवानीची जिद्द मनाला चटका लावून गेली

Latur: वडिलांच्या निधनानंतर अवघ्या दीड तासात दिला बारावीचा पेपर; शिवानीची जिद्द मनाला चटका लावून गेली

0
Latur: वडिलांच्या निधनानंतर अवघ्या दीड तासात दिला बारावीचा पेपर; शिवानीची जिद्द मनाला चटका लावून गेली

लातूर: लातूरमधील एका १७ वर्षीय मुलीच्या जिद्दीला सलाम करणारी घटना समोर आली आहे. या मुलीने शिक्षणासाठी दाखवलेली जिद्द पाहून संपूर्ण परिसर स्तब्ध झाला आहे. वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर अवघ्या दीड तासात या मुलीने बारावीच्या गणिताचा पेपर दिला आहे. मनाला चटका लावणाऱ्या प्रसंगातही एका १७ वर्षीय मुलीने शिक्षणासाठी दाखवलेली जिद्द संपूर्ण परिसराला मनाला चटका लावून गेली आहे. लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील हागदळ-गुगदळ भोजूचीवाडी (ता. कंधार) येथील शिवानी माधव देवकत्‍ते हिने वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर अवघ्या दीड तासात बारावीच्या गणिताचा पेपर देत सर्वांनाच सुन्न केले.

नेमकं घडलं काय?

शिवानीचे वडील माधव भिमराव देवकत्‍ते हे पुण्यात वाहनचालक म्हणून काम करत होते. कुटुंबाचा आधारस्तंभ असलेले माधव देवकत्‍ते यांचे शुक्रवारी सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झाले. बातमी समजताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता हागदळ येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. घरात आक्रोश, नातेवाईकांचा आधार आणि आठवणींचा वेदनादायी पूर असणाऱ्या वातावरणात शिवानी उभी होती.

परंतु सकाळी अकरा वाजता जळकोट येथील श्री गुरुदत्त ज्युनियर कॉलेजमध्ये बारावीचा गणिताचा पेपर होता. वडिलांच्या चितेला अग्नी दिल्यानंतर अवघ्या काही क्षणांतच शिवानीने मनावर दगड ठेवला. “बाबांनी शिक्षणासाठी खूप कष्ट घेतले… त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे,” या निर्धाराने तिने परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.

५० किमी अंतर पार करत पोहोचली परीक्षा केंद्रावर

हागदळ-गुगदळ ते जळकोट हे सुमारे ५० किलोमीटर अंतर पार करत ती वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचली. डोळ्यांत अश्रू होते, पण मनात वडिलांची प्रेरणा. तिने गणिताचा पेपर शांतपणे लिहिला. शिवानीची ही जिद्द अनेकांना प्रेरणा देणारी ठरली आहे. दुःख कितीही मोठं असलं, तरी स्वप्नं आणि शिक्षण यांची ज्योत विझू देऊ नये, याचं जिवंत उदाहरण शिवानीने घालून दिलं आहे.