Home ब्रेकिंग न्यूज एक महिन्यात बोगस जन्मदाखले ताब्यात घ्या; डॉक्टर आणि संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करा

एक महिन्यात बोगस जन्मदाखले ताब्यात घ्या; डॉक्टर आणि संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करा

0
एक महिन्यात बोगस जन्मदाखले ताब्यात घ्या; डॉक्टर आणि संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करा

नवनिर्वाचित महापौरांनी पहिल्याच बैठकीत बांग्लादेशी विरोधात ऍक्शन

मुंबई (विशेष प्रतिनिधी)

मुंबईमध्ये बोगस जन्मदाखल्यांच्या तक्रारींमुळे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी महापालिका प्रशासनाला जेरीस आणलेले असतानाच आता नवनिर्वाचित महापौरांनी आपली पहिलीच बैठक या विषयावर घेवून आरोग्य विभागाला चांगलेच फैलावर घेतले. या बैठकीमध्ये आरोग्य विभागाला सूचना देत महापौर रितू तावडे यांनी अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या नागरिकांना दिलेली बोगस २३७ जन्म प्रमाणपत्र आरोग्य विभागाने एक महिन्याच्या आत ताब्यात घ्यावी असे निर्देश महापौरांनी यावेळी दिले.

बांग्लादेशी फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचा निर्धार महापौर रितू तावडे यांनी काही दिवसापूर्वी व्यक्त केला होता. त्याच अनुषंगाने महानगरपालिका मुख्यालयातील महापौर दालनात शुक्रवारी १३ फेब्रुवारी २०२६ संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत नवनिर्वाचित महापौरांनी सूचना केल्या.

याप्रसंगी उप महापौर संजय घाडी, भाजपचे गटनेते गणेश खणकर, माजी खासदार किरीट सोमय्या, नगरसेवक प्रकाश गंगाधरे, निल सोमय्या, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.दक्षा शहा तसेच संबंधित तहसीलदार, परवाना विभागाचे व पोलीस विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

उपायुक्त शरद उघडे यांनी या बैठकीत २३७ प्रमाणपत्र पोर्टलवर रद्द करण्यात आले असल्याची माहिती दिली. परंतु अवैधरित्या प्रमाणपत्र वितरित करणाऱ्या संबंधित डॉक्टर व संबंधित आरोग्य अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी महापौरांनी दिले. आतापर्यंत ८ जणांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात आली असली तरी उर्वरितांवर सोमवारपासून कारवाई करण्याचे निर्देशही महापौरांनी दिले. विलंबित प्रकरणात २१ दिवसांनंतर जन्मप्रमाणपत्र वितरण करण्यात आली असून त्यांची फेर चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी केली.

तसेच २ वैद्यकीय अधिकारी यांना निलंबित करण्यात आले असून इतरांवर कारवाई करण्याचे निर्देशही दिले.१ जानेवारी २०१६ नंतरचे संपूर्ण दस्तऐवज तपासण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रारंभी, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी बोगस जन्म प्रमाणपत्र ताब्यात घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.