Home ब्रेकिंग न्यूज Pune: बांगलादेशच्या झेंड्यावरून फूड स्टॉल्सची तोडफोड; पुण्यातील MIT कॉलेजमध्ये राडा

Pune: बांगलादेशच्या झेंड्यावरून फूड स्टॉल्सची तोडफोड; पुण्यातील MIT कॉलेजमध्ये राडा

0
Pune: बांगलादेशच्या झेंड्यावरून फूड स्टॉल्सची तोडफोड; पुण्यातील MIT कॉलेजमध्ये राडा

पुणे: पुण्यातील कोथरुड येथील एमआयटी महाविद्यालयात आयोजित वर्ल्ड कल्चरल फेस्टिवलमध्ये मोठा राडा झाला आहे. फूड फेस्टिवलमध्ये बांगलादेशी विद्यार्थ्यांनी लावलेल्या झेंड्यांच्या स्टिकर्सवरून वाद निर्माण झाला आहे. ज्याचे रूपांतर नंतर तोडफोडीत झाले. या घटनेमुळे कॅम्पसमध्ये काही वेळ तणावाचे वातावरण होते. अखिल भारतीय युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी हा राडा केल्याचं समजत आहे. या घटनेनंतर फेस्टिवलच्या ठिकाणी एकच गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.

एमआयटी कॉलेजमध्ये दरवर्षीप्रमाणे विविध देशांतील संस्कृतीचे दर्शन घडवणारा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात सहभागी झालेल्या बांगलादेशी विद्यार्थ्यांनी आपल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर बांगलादेशच्या झेंड्याचे स्टिकर्स लावले होते. या स्टिकर्सवर काही विद्यार्थ्यांनी तीव्र आक्षेप घेतला. या वादाचे रुपांतर आंदोलनात झाले. भाजप युवा मोर्चाशी संबंधित असल्याचा दावा करणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी आणि विद्यार्थ्यांनी तिथे धाव घेत बांगलादेशचे झेंडे असलेले स्टिकर जाळल्याचा आरोप आहे.

संतापलेल्या आंदोलकांनी बांगलादेशी विद्यार्थ्यांचे फूड स्टॉल्स पाडून तिथे तोडफोड केली. यावेळी दोन्ही गटात बाचाबाची झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी दोन्ही बाजूंना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. सध्या कॅम्पसमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्याच्या स्थितीत तेथे तणाव पूर्ण शांतता आहे.