Home ताज्या घडामोडी ठाणे जिल्ह्यात महापौर पदावर ‘लाडक्या बहीणीं’चे राज्य

ठाणे जिल्ह्यात महापौर पदावर ‘लाडक्या बहीणीं’चे राज्य

ठाणे जिल्ह्यात महापौर पदावर ‘लाडक्या बहीणीं’चे राज्य

पद आरक्षित नसतानाही शिवसेनेकडून तीन महापालिकांत महिलांना संधी

मुंबई : महापालिका निवडणूक पार पडल्यानंतर आता महापौर निवडीची प्रक्रिया सर्व ठिकाणी सुरू असून ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या असलेल्या ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकेमध्ये यंदा अनपेक्षित पद्धतीने महिलाराज येणार आहे. महापौरपदासाठी महिला आरक्षण नसतानाही शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापौरपदासाठी पक्षातील लाडक्या बहिणींवर विश्वास दाखवला आहे. ठाण्यातून शर्मिला पिंपळोलकर-गायकवाड, कल्याण डोंबिवलीत हर्षाली थविल चौधरी आणि उल्हासनगर येथे अश्विनी निकम यांची महापौरपदी वर्णी लागणार आहे. लाडक्या बहिणींनी शिवसेनेला भरभरून प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे महापौरपद देताना लाडक्या बहिणींनाच प्राधान्य द्यावे अशी आग्रही भूमिका खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घेतली होती. त्यावर एकनाथ शिंदे यांनी शिक्कामोर्तब केल्याने ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या महापालिकांवर आता महिलाराज दिसणार आहे. महिलांसाठी पद आरक्षित नसताना त्यांना हे पद मिळण्याची ही या पालिकांच्या इतिहासातली पहिलीच वेळ आहे.

ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकेमध्ये महायुतीचाच महापौर होणार हे निकालातून स्पष्ट झाले होते. त्यामुळेच निकालानंतर शिवसेना कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार, याबाबत नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता होती. या तिन्ही ठिकाणची महापौरपदे महिलांसाठी आरक्षित झालेली नव्हती. त्यामुळे पुरुषांनाच तिथे संधी मिळेल अशी अटकळ बांधली जात होती. परंतु, ती चुकीची ठरली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजवर लाडक्या बहिणींच्या सबलीकरणाला प्राधान्य दिलेआहे. त्यामुळेच महिलांना संधी ही आरक्षणाची वाट न पाहता कुवतीनुसार मिळावी हा विचार करून तीनही महापालिकांमध्ये महापौरपदासाठी नगरसेविकांची निवड करण्यात आली आहे, असे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.

नवी मुंबईत खुल्या जागेवर ओबीसी महिलेला संधी

नवी मुंबई महापालिका निवडणुक प्रचारात भाजप व शिवसेनेत झालेले राजकीय घमासान, खालच्या पातळीपर्यंत गेलेले शाब्दिक युद्ध यामुळे या ठिकाणी महाराष्ट्राचे लक्ष वेधले गेले होते. १११ सदस्य संख्या असलेल्या नवी मुंबई महापालिकेत एका अपक्षाच्या समर्थंनासह भाजपचे ६६, शिवसेनेचे ४२, उबाठा गट २ व मनसे १ संख्याबळ आहे. या ठिकाणी महापौर पद महिला खुल्या गटासाठी राखीव असल्याने नेत्रा शिर्के व माथाडी कामगारांचे श्रद्धास्थान असलेल्या अण्णासाहेब पाटील यांच्या कन्या भारती पाटील यांची नावे चर्चेत होती. भाजपने या ठिकाणी खुल्या प्रवर्गातील नगरसेविकेला संधी न देता ओबीसी समाजातील वाणिज्य शाखेच्या द्विपदवीधर असलेल्या प्रभाग २३ मधील नगरसेविका सौ. सुजाता पाटील यांना संधी दिली. ओबीसी वर्गासोबत असल्याचा संदेश नवी मुंबईच्या महापौर निवडीतून देण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे.