Home कोकण रायगड राजिप, पंचायत समित्या निवडणुकीच्या तोंडावर पोलीस यंत्रणा सज्ज

राजिप, पंचायत समित्या निवडणुकीच्या तोंडावर पोलीस यंत्रणा सज्ज

0
राजिप, पंचायत समित्या निवडणुकीच्या तोंडावर पोलीस यंत्रणा सज्ज

अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका होत असल्याने जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा सर्वपरिने सज्ज झाली. त्या अानुषंगाने जिल्ह्यातील समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा पोलिसांनी उगारला. जिल्ह्यात १ हजार १८४ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून, १८ जणांना जिल्ह्यातून तडीपार करण्यारोबरच एमपीडीए कायद्यांतर्गत एका व्यक्तीवर कारवाई करण्यात आली.

रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ गट, पंचायत समितीच्या ११८ गणासाठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान घेण्यात येणार असून, ९ फेब्रुवारीस मतमोजणी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर प्रचारालाही वेग आला. निवडणूक कालावधीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने व्यापक उपाययोजना सुरू केल्या आहे. नगर परिषद निवडणूक काळात रोहा, महाड, खोपोली नगर परिषदेत मारहाणीचे प्रकार घड़ले होते. त्यादृष्टीने रायगड पोलिसांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या अानुषंगाने चोख तयारी केली. ज्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत, तसेच निवडणुकीत काळात गोंधळ घातल्याप्रकरणी ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, अशा सर्व समाजकंटकांविरोधात पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया पोलिसांनी केली आहे. तसेच गुंडप्रवृत्तीच्या लोकांवर तडीपारीची कारवाईही करण्यात येत आहे. रायगड पोलीस दलाच्या हद्दीत आतापर्यंत १ हजार १८४ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. १८ जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आलेली आहे. एकावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे.

शस्त्रे जमा

निवडणूक काळात परवाना असलेली शस्त्रे प्रशासनाकडे जमा केली जातात. त्यानुसार जिल्हा परिषद निवडणूक जाहीर झाली असल्याने शस्त्रे असणाऱ्याकडून जमा करण्यासाठी सर्वांना आवाहन करण्यात आली होती. १ हजार ४२९ जणांनी आपली शस्त्रे पोलिसांकडे जमा केल्याची माहिती रायगड पोलीस दलाकडून देण्यात आली आहे.