भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली. भारतीय कसोटी संघाचा कर्णधार म्हणून रोहित शर्माने आपल्या फलंदाजीच्या जोरावर जागतिक पातळीवर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. काही महिन्यापूर्वीच टी-२० प्रकारातून रोहित शर्माने निवृत्ती जाहीर केली होती. आयपीएल स्पर्धां मध्यावर आलेली असताना रोहित शर्माने आपली निवृत्ती जाहीर केल्याने क्रिकेटप्रेमींकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. ज्या खेळाडूला आपण कधी आणि केव्हा थांबावे, हे जेव्हा समजते, त्याच खेळाडूला मान-सन्मानाने निवृत्ती मिळते. रोहित शर्मा हा खऱ्या अर्थाने मुंबईकर खेळाडू. मुंबईच्या अनेक खेळाडूंनी भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळलेली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ज्याने प्रथम दहा हजार धावांचा टप्पा ओंलाडला, त्या सार्वकालिक महान अशा सुनील गावस्करांपासून, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री, सचिन तेंडुलकर अशा विविध रथी-महारथींचा त्यात समावेश होत आहे. एकेकाळी मुंबईच्याच खेळाडूंचा सर्वाधिक भरणा भारतीय क्रिकेट संघामध्ये पाहायला मिळत असे. पण जिथे भरती आहे, तिथे ओहोटी ही असतेच. जीवनात चढ-उतार हे येतच असतात. एकेकाळी भारतीय संघामध्ये प्राबल्य असणाऱ्या मुंबईकर खेळाडूंना आज त्याच भारतीय संघामध्ये अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागत आहे. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैयस्वाल, शिवम दुबे अशी नावे आज भारतीय संघातील कोणत्या ना कोणत्या फॉरमॅटमध्ये चमकताना पाहावयास मिळत आहेत. त्यातील यशस्वी जैयस्वालने मुंबईची साथ सोडून आगामी हंगामापासून गोवा क्रिकेटला आपलेसे करण्याचा निर्णय घेतला. शिवम दुबे अस्तित्वासाठी संघर्ष करत आहे. रोहित शर्मानंतर केवळ सूर्यकुमार यादवच्याच रूपाने सध्या तरी मुंबई क्रिकेटचे अस्तित्व भारतीय संघात पाहावयास मिळणार आहे. ही दुनिया उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी आहे. जोपर्यत चलती आहे, तोपर्यंतच मान-सन्मानाला गती आहे. एकदा गती मंदावली की समाजात, आप्तस्वकियांमध्ये कोणी फारसे ओळखत नाही. तसाच काहीसा प्रकार अलीकडच्या काळात क्रिकेट खेळामध्ये रुजू झाला आहे. जोपर्यंत तुमच्या बॅटमधून धावांचा कारखाना सुरू आहे, जोपर्यत तुमच्या गोलंदाजीवर बळी मिळवत आहात, तोपर्यंतच तुमचे संघामध्ये स्थान निश्चित आहे. एकदा का तुमच्या बॅटमधून धावा येण्याचा वेग मंदावला, तुमच्या गोलंदाजीवर बळी मिळणे अवघड झाले की संघाचे दरवाजे तुम्हाला बाहेर पडण्यासाठी उघडले जातात. जागतिक पातळीवर नावलौकीक मिळविलेल्या खेळाडूला अशा प्रकारची ‘आऊंटगोईंग’ ही अपमानास्पदच असते. सुनील गावसकर हा चांगला खेळत असताना, अगदी शेवटच्या कसोटी सामन्यात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ९६ धावा केलेल्या असतानाही या ‘अवलियाने’ युवकांना संघात संधी मिळावी म्हणून वयाच्या ३३-३४व्या वर्षी निवृत्ती पत्करली. नाहीतर आजचे खेळाडू वयाची चाळीशी जवळ आली अथवा उलटली तरी निवृत्ती घेण्याचे नाव घेत नाहीत. मग अशा खेळाडूंची संघातून ‘गंच्छती’ ही ठरलेली असते.
रोहित शर्माला आज-ना उद्या क्रिकेटच्या कसोटी खेळातून निवृत्ती ही घ्यावी लागणार होतीच. त्याच्या बॅटमधून धावा निघत नव्हत्या, तसेच त्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला कसोटी मालिकेमध्ये सातत्याने अपयशाचा सामना करावा लागत होता. आयपीएल स्पर्धेतही रोहित शर्मा हा गेल्या दोन सामन्यांत चांगली फलंदाजी करू शकला नव्हता. त्याचबरोबर रोहित शर्मा हा फक्त इम्पॅक्ट प्लेअर म्हणूनच खेळत होता. निवृत्ती जाहीर केल्यामुळे आता तो कसोटी क्रिकेटमध्येही खेळणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. आयपीएलनंतर भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार होता. त्यासाठी रोहित शर्माची निवड होणार की नाही, याची चर्चा सुरू होती. पण निवड समितीने संघ निवडण्यापूर्वीच आपण कसोटी क्रिकेट खेळणार नसल्याचे आता रोहित शर्माने स्पष्ट केले आहे. रोहित शर्मा यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात कर्णधार होता. या दौऱ्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताला पराभव पत्करावा लागला होता. या पराभवामुळे भारताला ‘डब्ल्यूटीसी’च्या फायनलमध्ये खेळता आले नव्हते, पण त्यानंतर रोहित शर्मावर भारतीय क्रिकेटप्रेमींकडून, माजी खेळाडूंकडून जोरदार टीका झाली होती. रोहित शर्माला अखेरच्या कसोटीत खेळवलेच नव्हते. त्यावेळी रोहित शर्मा काहीच म्हणाला नव्हता. पण आता इंग्लंड दौऱ्यावर निवडच होणार नसल्याचे स्पष्ट झाल्यावर रोहित शर्माने अखेर कसोटी क्रिकेट न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमध्ये चांगले नेतृत्व केले होते. विराट कोहलीनंतर रोहितने भारतीय कसोटी संघाला एक चांगल्या उंचीवर नेले होते. पण गेल्या मालिकेत मात्र रोहितच्या बॅटला सूर गवसला नव्हता. रोहित शर्माशिवाय भारतीय क्रिकेटचे कधीकाळी पानही हलत नव्हते, अर्थांत रोहितच्या कारकिर्दीतील हा सुवर्ण काळ होता. टी-२० एकदिवसीय सामने, कसोटी सामने अशा तीनही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मानी केलेले आहे. भारतीय संघाचे नेतृत्व टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर २९ जून २०२४ रोजी निवृत्ती जाहीर होईपर्यंत शर्मा भारताच्या ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय संघाचा कर्णधार देखील होता. ७ मे २०२५ रोजी तो कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला आणि कर्णधार म्हणून तीन वर्षांचा कार्यकाळ संपला. त्याने कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली. मुंबई इंडियन्स, इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये एक फ्रँचायझी संघ, १० वर्षे संघाचे नेतृत्व केले आणि त्यांना पाच जेतेपदे मिळवून दिली. शर्मा त्याच्या फलंदाजीच्या कौशल्यासाठी ओळखला जातो आणि त्याचे चाहते त्याला ‘हिटमॅन’ असे टोपणनाव देतात. तो कधीकधी ऑफ-स्पिनर देखील असतो. शर्मा हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतके करणारा एकमेव खेळाडू आहे. सर्व फॉरमॅटमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय षटकार, विश्वचषकांमध्ये सर्वाधिक षटकार आणि एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. तो २००७ चा टी-२०आय विश्वचषक, २०१३ चा आयसीसी (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०२४ चा टी-२०आय विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा सदस्य होता. षटकार मारावे तर सौरव गांगुली आणि रोहित शर्मानेच असे आजही भारतीय क्रिकेटप्रेमींकडून बोलले जात आहे. भारतीय वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळणाऱ्या व भारताला १९८३ साली प्रथमच विश्वचषक मिळवून देणाऱ्या कपिलदेव निखंजने हॅडलीच्या कसोटीतील ४३१ बळींचा विक्रम मोडण्यासाठी आपली कारकिर्द लांबवली व ४३४ बळी झाल्यावर खेळातून निवृत्ती घेतली. शेवटच्या काळात तर कपिलची गोलंदाजी दोन ते तीन टप्पा पडत होती. यशाच्या सर्वोच्च शिखरावर असणाऱ्या रोहित शर्माला सूर हरवताच निवृत्ती जाहीर करावी लागली. हिटमॅनची निवृत्ती ही चाहत्यांना हळहळ लावणारी आहे.
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरसह भारतातील काही राज्यांमध्ये पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्याला भारत्या एअर सिस्टीमने…