उमेश कुलकर्णी
भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर आहेच, पण ती रॅग्ज टु रिचेस कथा सांगणारी आहे. त्यातीलच एक म्हणजे आपला मुंबईचा क्रिकेटपटू रोहित शर्मा. रोहित म्हणून ओळखला जाणारा या क्रिकेटपटूने कालच कसोटी क्रिकेटमधून संन्यास जाहीर केला. त्याच्या आयुष्याची कहाणी ही कोणत्याही बॉलिवूडपटू नायकाच्या कथानायकाला साजेशी आहे. त्यात सारे काही आहे. म्हणजे संघर्ष आहे तसेच यशाला एकदा गवसणी घातल्यावर मागे वळून न पाहणेही आहे.. हिटमॅन तो कसा बनला याची कहाणी प्रत्येकाला प्रेरणादायक तर आहेच, पण अंगात जिद्द असली आणि खेळाची प्रतिभा असली, तर रंकाचा राव होतो याचे प्रेरणा देणारी आहे.
रोहित शर्माचा जन्म नागपूरचा. पण तो मुंबईत राहिला आणि लहानाचा मोठा झाला. त्याचे आई-वडील अत्यंत गरीब होते. वडील हरिनाथ शर्मा यांची कमाई जास्त नव्हती. त्यामुळे रोहितने आपल्या संघर्षाच्या दिवसात घरोघरी जाऊन दूधही विकले होते. असे त्यानेच एका मुलाखतीत सांगितले. रोहितकडे क्रिकेटचे किट घेण्यास पैसे नसणार हे उघड होते. पण त्याचे मित्र आणि काकांनी मिळून कसेबसे पैसे जमवून त्याला क्रिकेट क्लबचे सदस्य करून घेतले. त्यानंतर रोहितचा संघर्ष संपला नाहीच. त्यानंतर त्याने क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. त्याच्याकडे शाळेची फीस भरण्यास पैसे नसत. रोहितचे बालपण हे संघर्षाने भरलेले होते. त्याचे वडील एका खासगी कंपनीत केअर टेकर म्हणून काम पाहत. पण त्यांनी रोहितला कसेबसे करून क्रिकेट अकादमीपर्यंत पोहोचवले आणि मग रोहितने अंगभूत गुणांच्या जोरावर उडी मारली. तो अंडर १९ क्रिकेट खेळायला लागला आणि त्याला प्रशिक्षक लाभले ते दिनेश लाड यांच्यासारखे. त्यांनी रोहितमधील गुण पारखले आणि तो सुरुवातीला गोलंदाज म्हणून खेळायला लागला. त्यानंतर त्याने फलंदाजी स्वीकारली आणि तो चांगला फलंदाज म्हणून नावारूपाला आला. रोहितकडे आज विशाल बंगले आहेत आणि करोडो रुपयांची संपत्ती आहे. पण सुरुवातीच्या दिवसात तो डोंबिवलीतील एका खोलीत राहत होता. पण स्वप्न पाहणे कधीही सोडू नये. एक ना एक दिवस ते खरे होतातच आणि त्यासाठी मार्ग मात्र चांगले वापरले पाहिजेत. रोहितच्या उदाहरणावरून हेच लक्षात येते.
रोहित आपल्या काकांशी क्रिकेटवर चर्चा करत असे. त्याची क्रिकेटचे ज्ञान पाहून त्याच्या काकांनी कसेबसे पैसे जमवले आणि त्याला एका छोट्याशा क्रिकेट अकादमीत प्रवेश मिळवून दिला. त्यानंतर त्याने पुढच्या शिक्षणासाठी रिझवी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. अखेर रोहितला मुंबई क्रिकेट सापडले आणि तो मुंबई क्रिकेटचा अहम भाग बनला. क्रिकेट करिअर बनवण्यात रोहितसमोर आव्हान त्याची गरिबी होती. पण त्यावर त्याने मात केली आणि तो आज देशातील टॉपचा क्रिकेटर म्हणून निवृत्त झाला.
https://prahaar.in/2025/05/08/ipl-match-shifted-amid-ind-pak-tension-now-the-match-will-be-held-here-instead-of-dharamshala/
रोहितने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती का घेतली याबाबत वेगवेगळे तर्क वितर्क लढवले जात आहेत. पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर सातत्याने अपयश येत असल्याने निवड समितीने त्याला कसोटी क्रिकेट कर्णधारपदावरून दूर करण्याचा निर्णय घेतला होता. तसे त्याला कळवण्यात आले. त्यामुळे त्याने अगोदरच निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. कोणत्याही खेळाबाबत असा संकेत आहे की, तुम्ही का निवृत्त होत आहात असा प्रश्न विचारण्याच्या आत तुम्ही निवृत्त झाला पाहिजेत. अन्यथा कपिल देव यांच्यासारखी स्थिती होते. रोहितने तसा उशीरच केला.
निवड समितीने निर्णय घेण्यापूर्वीच निवृत्त होण्याचा निर्णय रोहितने घेतला असता, तर त्याच्या निर्णयात शान राहिली असती. पण रोहितला निदान उशिरा तरी कळले. पण धोनीला ते अजूनही कळत नाही. त्याने आयपीएलमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेण्याची वेळ कधीच निघून गेली आहे. त्याला सारेच लोक कंटाळले आहेत. ते असो. पण रोहितच्या नंतर भारताचा कसोटी कर्णधार कोण हा कळीचा प्रश्न आहे. शुभमन गिल आणि जसप्रीत बुमराह यांची नावे आघाडीवर आहेत. के एल राहुलही चांगला कसोटी कर्णधार होऊ शकतो. बुमराह सध्या उपकर्णधार आहे. त्यामुळे त्याच्याकडे सूत्रे हाती देण्यापूर्वी निवड समिती या दोन नावांचा विचार करेल.
रोहितने २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेत पाच शतके ठोकली होती. ते रेकॉर्ड विस्फोटक फलंदाजीचा नमुना होते. टी -२० मध्ये रोहितच्या नावावर सर्वात जास्त चार शतके लावण्याचा रेकॉर्ड कायम आहे. एकदिवसीय सामन्यात दुहेरी शतक लावण्यात सचिननंतर रोहित असा एकमेव खेळाडू आहे की ज्याने तीन वेळा दुहेरी शतक केले आहे. रोहितने ६७ सामने खेळले आणि ११६ डावांमध्ये त्याने ४३०१ धावा केल्या. १२ शतके आणि १८ अर्धशतके आहेत. पण आकडेवारीवरून क्रिकेटपटूची महानता सिद्ध होत नाही. रोहितने ज्या पद्धतीने आणि ज्या परिस्थितीत क्रिकेट खेळले, ती त्याची महानता सिद्ध करणारी आहे. २००७ मध्ये त्याने पदार्पणातच शतक ठोकले होते.
रोहितवर शेकडो आरोपही झाले. तसे ते अनेक क्रिकेटपटूंवर झाले. पण त्यामुळे त्यांच्या क्रिकेट कारकीर्दीला ग्रहण लागले नाही. रोहित आता निवृत्त होत आहे. पण तो आयपीएल खेळतच राहणार आहे. पण त्याची अनुपस्थिती जाणवेल हे निश्चित. कारण रोहितमुळे मधल्या फळीला आकार आला होता आणि सलामीला, तर तो प्रचंड फॉर्मात होता. ते क्षण भारत आता कधीही जगू शकणार नाहीत. रोहितची ही कहाणी आहे, ती रॅग्ज टु रिचेस.