लाहोर : भारतीय सैन्याने बुधवार ७ मे रोजी पाकिस्तानमध्ये अतिरेक्यांच्या विरोधात केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर गुरुवार ८ मे रोजी लाहोरमध्ये लागोपाठ तीन स्फोट झाले. या स्फोटांमुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भारताने पुन्हा हवाई हल्ला केल्याची चर्चा पाकिस्तानमध्ये सुरू झाली आहे. स्फोट लाहोरच्या जुन्या विमानतळाच्या जवळ झाले.
लाहोरच्या जुन्या विमानतळाच्या आवारात ड्रोन पडला. यानंतर स्फोटाचा आवाज ऐकू आला, असे एका स्थानिकाने पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी सांगितले. या घटनेनंतर लाहोरमधील विमानवाहतूक तातडीने थांबवण्यात आली आहे. लाहोरमधील वॉल्टन विमानतळ, गोपालनगर आणि नसराबाद या तीन ठिकाणी असे एकूण तीन स्फोट झाल्याचे वृत्त पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांनी दिले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर हा दुसरा हल्ला झाल्याचे पाकिस्तानमधील निवडक वृत्तवाहिन्या सांगत आहे. भारताने या स्फोटांबाबत अद्याप काहीही सांगितलेले नाही.
स्फोटांचे आवाज ऐकू येताच लाहोरमध्ये ठिकठिकाणी सायरन वाजू लागले. लोक भराभर सुरक्षित ठिकाण गाठू लागले. व्हायरल झालेल्या एका व्हिडीओत वॉल्टन विमानतळ परिसरात स्फोटामुळे निर्माण झालेला धूर दिसत आहे. पाकिस्तानमधून आलेल्या ताज्या वृत्तानुसार कराची, लाहोर, सियालकोट येथील विमानवाहतूक बंद करण्यात आली आहे. पुढील आदेशापर्यंत ही विमानवाहतूक बंद राहणार आहे.