ऋतुराज : ऋतुजा केळकर
न तथा तप्यते
विद्ध: पुमान् बाणै: सुमर्मगै:।
यथा तुदन्ति मर्मस्था
ह्यसतां परुषेषव:॥
आज वाचनात हा श्लोक आला आणि मन तिथेच हरवून गेलं. आयुष्यातील कित्येक प्रसंग नजरे समोरून झरझर अगदी चित्रपटासारखे उभे राहिले. कित्येकदा बरोबर असूनही फक्त आचार विचारांची मर्यादा म्हणून झालेले अपमान विसरून किंबहुना गिळून परत हास्याचा मुखवटा घेऊन मीच नव्हे तर प्रत्येकजण वावरतो. त्याच कारण एकच की हे जीवन हे एक रंगमंच आहे. आपल्याला परमेश्वराने दिलेली भूमिका ही योग्य त्या पद्धतीने पार पडून आपल्या भूमिकेत म्हणा किंवा कुठल्याही जीवनाच्या प्रवेशात जीव न अडकवता आपल्या अनंताच्या पुढील प्रवासास निर्विकारपणे निघावं लागत अगदी गत जन्मातील भूमिकेचा अगदी कुठलाही रंग आपल्या आत्म्यावर न ठेवता. पण असं करता करता, हा वरील श्रीमद्भागवत महापुराणाच्या एकादश स्कंधातील तेविसाव्या अध्यायातील श्लोक कुठे तरी या प्रवासाला खिळ हा घालतोच.
या श्लोकात सांगितले आहे की, शरीराच्या मर्मस्थानी घुसलेले बाण जितका त्रास देत नाहीत, तितका त्रास दुष्ट लोकांच्या कठोर शब्दांनी होतो. हे विचार मानवी जीवनात खोलवर परिणाम करणारे आहेत. खरतर शारीरिक वेदना काही काळानंतर कमी होते, पण कटू वचनांनी झालेली दुखापत मनाला दीर्घकाळ नव्हे, तर कायमच वेदना देते. शब्दांचे बाण हे नेहमीच मनाच्या मर्मस्थानी असे रुतून बसतात की रात्रंदिवस एक घायाळ करणारी वेदना देऊन जातात. हा श्लोक एका अत्यंत महत्त्वाच्या जीवनतत्त्वांचा उलगडा करतो. शरीरावर एखाद्या शस्त्राचा प्रहार जितका तीव्र असतो ना त्याहून अधिक वेदनादायक असतो कटू शब्दांचा प्रहार. वाणी हे अस्त्र आहे. त्यामुळे कुठल्याही शब्दांचा विचारपूर्वक वापर केला पाहिजे, कारण ते शस्त्रासारखे किंबहुना त्याही पेक्षा जास्त प्रभावी असतात.
शब्दांचे बाण किंवा व्रण शरीरावर नाही, तर आत्म्यावर होतात ते अखिल सृष्टीत आघात करणारी शत्रे अनेकानेक असली तरीही शब्द हे सर्वांत सूक्ष्म आणि तरीही सर्वांत प्रभावी शस्त्र आहे. शरीरावर आदळणारा बाण रक्तस्राव घडवतो, पण शब्द मनाच्या गाभ्याला घायाळ करतो. म्हणूनच महाभारताच्या महायुद्धात वचने जखमा करणारी अधिक ठरली. कर्णाने द्रौपदीचा केलेला अपमान, भीष्मांच्या मौनामुळे झालेली पीडा आणि गांधारीचे शाप हे सर्व शब्दांचे अस्त्र होते ज्यांनी इतिहास घडवला.
https://prahaar.in/2025/05/08/13-civilians-killed-59-injured-in-pakistan-ceasefire-violations-along-loc-says-mea/
जेव्हा द्रौपदीचा अपमान सभेत झाला, तेव्हा तिला प्रत्यक्ष बाणांनी कोणीही छिन्न-विछिन्न केले नव्हते पण तरीही कौरवांच्या कठोर शब्दांनी तिचे हृदय छिन्नविछिन्न झाले. एका रजस्लवा स्रीला नव्हे, तर एका राणीचा उल्लेख भर सभेत “दासी” म्हणून करण्यात आला की ज्या वचनांनी तिचा आत्मसन्मान धुळीस मिळाला. म्हणूनच तिच्या डोळ्यांत येणाऱ्या अश्रूंनी भविष्य घडवले एक महायुद्ध सुरू झाले की ज्यात शेवटी अधर्माचा नाश झाला. द्रौपदीच्या वैखरीतून त्याक्षणी निघालेले शब्द हे शाप बनून संपूर्ण कौरवांच्या समूळ नाशास कारणीभूत ठरले.
आता आपल्या दैनंदिन जीवनात देखील आजूबाजूला आपण हे वारंवार अनुभवतो. अनेकदा कुणीही आपल्याला स्पर्श करत नाही, पण त्यांच्या कठोर वचनांनी मन उद्ध्वस्त होते. एक साध उदाहरण देते पहा पटतंय का ते. जर आई-वडिलांनी आपल्या मुलाला वारंवार “तू काहीच करू शकत नाहीस!” असे म्हटले, तर त्या मुलाचा आत्मविश्वास नष्ट होतो. त्याच्या मानसिक जखमा बऱ्या होण्यासाठी अनेक वर्षे लागतातच. शिवाय त्याच्या हातून पुढे कुठलीच गोष्ट घडू शकत नाही. आता दुसरं उदाहरण घ्यायचं झालं तर कार्यालयात जर कोणाला सतत कमी लेखले गेले, त्यांच्या कर्तृत्वावर टीका केली गेली, तर त्यांचे मनोबल खचते आणि एक तर तो सरळ सरळ ते कार्यस्थळ सोडून निघून जातो. समाजात काही वेळा कोणाच्या आर्थिक स्थितीवर, रंगरूपावर किंवा शिक्षणावर टीका केली जाते. हे शब्द त्यांच्या आयुष्यात खोलवर जखमा करत राहतात. सामाजिक कटूता यात कधी-कधी आत्मघातापर्यंत देखील परिस्थिती जाते. मनुष्याला पराजयापेक्षा कटू शब्द अधिक त्रास देतात. कोणीतरी आपल्यावर टीका केली की आपल्या मनात त्याचा खोलवर परिणाम होतो. प्रत्यक्ष संकटांपेक्षा मनाला लागणारी टोचणी अधिक दुखावणारी असते. म्हणूनच, आपण आपल्या शब्दांचा वापर विचारपूर्वक केला पाहिजे. शिवाय आपल्या आजूबाजूला जर कुणी अशी शाब्दिक हिंसा करत असेल, तर ते रोखणे अत्यंत गरजेचे आहे. आयुष्यात शब्दांचे सौंदर्य तसेच त्यांची मर्यादा समजून घेतली पाहिजे. संस्कृत साहित्य आणि संतवाणी सांगते “मधुरं वदनं भवेत् सुखं” म्हणजेच मधुर वाणीमुळे नेहमी आनंद निर्माण होतो. म्हणूनच संयम बाळगणे ही एक अशी साधना आहे की जी वाईटात वाईट प्रसंगातून बाहेर काढते. त्यामुळे कटू बोलण्याऐवजी प्रेमाने आणि समजूतदारपणे संवाद साधणे म्हणजे खरे आध्यात्मिक साधक होणे. म्हणूनच आपण बोलताना नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की आपले शब्द प्रेमळ आणि सकारात्मक असावेत. तसेच ते द्विअर्थी तर मुळीच असता कामा नये.
कारण माणसाच्या जीवनात शारीरिक वेदना काही क्षणांसाठी असतात. जखमा भरून येतात, वेदना कमी होतात आणि शरीर पूर्ववत होते. परंतु कठोर शब्दांनी होणारी दुखापत ही अधिक तीव्र आणि खोलवर परिणाम करणारी असते. भगवद्गीतेत देखील भगवान श्रीकृष्ण म्हणतात की, “शब्दं स्पर्शं च रूपं च रसं च गन्धान्…” अर्थात इंद्रियांद्वारे मिळणारे अनुभव क्षणिक असतात. पण मनाला भिडणाऱ्या शब्दांचा प्रभाव दीर्घकाळ टिकतो. म्हणूनच, शब्द सावधगिरीने वापरणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
कसं आहे ना की, प्रत्येक शब्द हा एक तो ज्ञानाची देणगी देऊ शकतो, प्रेमाचा स्पर्श देऊ शकतो किंवा एखाद्याच्या मनाला गंभीर जखम करू शकतो. म्हणूनच संत तुकाराम म्हणतात “ऐसी अक्षरे रसिके मेळवीन।” अर्थात जे शब्द मधुर असतील, तेच खऱ्या अर्थाने भक्तीचा आणि आत्मशुद्धीचा मार्ग दाखवू शकतात ही सुवर्णाक्षरे मनावर गोंदवून ठेवावीत. जर का कायम या विचारांची जाणीव ठेवली, तर आपण केवळ स्वतःच नव्हे तर आपल्या आसपासच्या लोकांनाही शांतता आणि सकारात्मकता देऊ शकतो. कारण गोड शब्द हे मन प्रफुल्लित करण्यासाठी नेहमीच समर्थ ठरतात. रोजच्या जीवनात देखील अनेकदा आपल्याला याचे प्रत्यय येताच असतात. कसं आहे ना की, शारीरिक जखमा कालांतराने भरून येतात, पण शब्दांनी झालेला घाव दीर्घकाळ ठसठसत राहतो. म्हणूनच आपण जे बोलतो, ते काळजीपूर्वक, प्रेमपूर्वक आणि हितकारक असावे. एखाद्याने भावनाशून्यपणे “तू असमर्थ आहेस!” असे म्हटले, तर ते शब्द व्यक्तीच्या आत्मविश्वासाचा संहार करतात. दुसरीकडे प्रेमाने दिलेला एक आश्वासक शब्द संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. म्हणूनच एक लक्षात असु दे की, शब्द हे अस्त्रही आहेत आणि उपचारही म्हणूनच योग्य शब्दांची निवड हा आत्मविकासाचा मार्ग आहे. आपण आपल्या भाषेवर शब्दांचे संस्कार असे करा की त्यातील माधुर्यातून आपल्याच नव्हे तर समोरच्याच्या व्यक्तीशिल्पातून अजरामर असे व्यक्तिमत्त्व घडेल आणि अखेरीस माझ्याच शब्दात सांगायचे झाले तर,
‘शिल्प शब्दांचे घडविते व्यक्तिमत्त्व…
रांगोळीत जणू भरते…
भावनांचे रंग…