काश्मीरमध्ये पहलगाम येथे निसर्ग सौदर्यांचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या ज्या २६ पर्यटकांना दहशतवाद्यांनी त्यांचा धर्म विचारून थेट गोळ्या घातल्या. त्याचा बदला भारतीय सैन्य दलाने ‘ऑपरेशन सिंदूर’चा जबरदस्त प्रहार करून घेतला. दि. २२ एप्रिलच्या पहलगाम हत्याकांडाने सर्व देशाला हादरा बसला. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने तब्बल पंधरा दिवसांनी पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तान व पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील सात शहरांतील नऊ दहशतवादी तळ अवघ्या पंचवीस मिनिटांत उद्ध्वस्त केले. ६ आणि ७ मेच्या मध्यरात्रीनंतर भारतीय हवाई दलाने दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ले केले. क्षेपणास्त्रांनीही अचूक वेध घेतला आणि पाकिस्तानची दाणादाण उडाली. भारतीय सैन्यदलाकडून हल्ला होणार याची पूर्ण कल्पना पाकिस्तानला होती. भारत कसा व केव्हा हल्ला करणार, हल्ल्याचे टार्गेट काय असणार याबद्दल भारताने शेवटपर्यंत गुप्तता पाळली होती, पण ७ मे रोजी भल्या सकाळी भारतीय विमानांच्या पाकिस्तानवरील हल्ल्याची दृश्ये टीव्हीच्या पडद्यावर दिसू लागली तेव्हा देशात आनंदाची लाट उसळली. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यामातून दहशतवाद्यांचे नऊ मोठे तळ नेस्तनाबूत केल्याचे बघून काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र जनतेने सैन्यदलाचा जयजयकार केला. सोशल मीडियावर तर भारत माता की जय, मोदीजींचे अभिनंदन अशा पोस्टचा वर्षाव होत होता. मोदींसारखे कणखर नेतृत्व देशाला लाभले म्हणूनच भारत पाकिस्तानला धडा शिकवू शकला अशी भावना देशभर निर्माण झाली. जे लोकांना पाहिजे तेच मोदी करून दाखवतील असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटले होते. पहलगाम हत्याकांडातील दहशतवाद्यांना ‘चुन चुन कर मार देंगे’ असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले होते. पहलगामची घटना घडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून भारतात परतले. ते काश्मीरला गेले नाहीत म्हणून विरोधी पक्षाच्या काही नेत्यांनी त्यांच्यावर टीकाही केली. पण बिहारमध्ये मधुबनी येथे बोलताना मोदी म्हणाले, ‘दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल अशी त्यांना कठोर शिक्षा मिळेल’. मोदींनी देशाला दिलेला शब्द खरा करून दाखवला. जो कोणी हिंदूना टार्गेट करील त्याची अवस्था काय होईल हे ‘ऑपरेशन सिंदूर’ ने सर्व जगाला दाखवून दिले.
भारताने पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दशतवाद्यांचे नऊ तळ हे आपले टार्गेट ठरवले होते. पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबाद येथील लष्कराच्या प्रशिक्षण केंद्राला लक्ष्य केले. सोनमर्ग, गुलमर्ग व पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांनी येथे प्रशिक्षण घेतले. कोटली, भिंबर, सियालकोट, मुरीदके, भवालपूर येथे जिथे-जिथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जाते तेथे भारतीय हवाई दलाने हल्ले करून ती केंद्रे बेचिराख करून टाकली. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये २४ क्षेपणास्रे डागली. हे तर होणारच होते हे सर्व जगाला ठाऊक होते. देशाचे नेतृत्व मोदींकडे असताना पहलगाम हत्याकांडानंतर भारत शांत बसणार नाही हे जगाने ओळखले होते. पुलवामा हत्याकांड झाल्यानंतर भारताने सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानला धडा शिकवला होता पण त्यानंतरही पाकिस्तानने भारतावर दहशतवादी हल्ले चालूच ठेवले होते. म्हणूनच पाकिस्तानला जरब बसेल अशी अद्दल घडवणे जरूरीचे होते. भारतीय सेना दल व हवाई दल यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम संयुक्तपणे राबवली. भारतीय हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंह व लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी या दोन महिला अधिकाऱ्यांनी नवी दिल्लीत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ‘ऑपरेशन सिंदूर’ची तपशीलवार माहिती जगाला दिली. जैश ए मोहमंद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसुद अजहरच्या कुटुंबातील दहा जणांचा व त्याच्या निकटचे असलेल्या चार जणांचा भारतीय हवाई हल्ल्यात मृत्यू झाला याची कबुली त्याने स्वत:च दिली आहे. भारताच्या मोस्ट वॉन्टेड मसुद अजहरच्या कुटुंबातील मरण पावलेल्या त्या सर्वांच्या नावांची यादीही जाहीर झाली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवताना सर्वसामान्य नागरीकांना कोणतीही इजा होणार नाही याची काळजी भारतीय सैन्याने घेतली होती. तसेच भारताने पाकिस्तानी सैन्य केंद्रावर कुठेही हल्ला केला नाही. दहशतवाद्यांचे तळ हेच ‘ऑपरेशन सिंदूर’चे टार्गेट होते. नऊ ठिकाणी केलेल्या हल्ल्यात शंभरपेक्षा जास्त दहशतवादी ठार झाले असल्याची शक्यता आहे. पाकिस्तानचे लढाऊ विमान पाडण्यातही भारतीय हवाई दलाला यश मिळाले आहे. जैशच्या किमान ४५ दहशतवाद्यांचा खात्मा झाला असावा असा अंदाज आहे. पाकिस्तानातील चार व पाकव्याप्त काश्मीरमधील पाच अशा नऊ तळावर भारताने हवाई हल्ले केले. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधे नऊ दहशतवादी केंद्रे भुईसपाट केल्यावरही भारताची तीन विमाने पाडल्याचा प्रचार पाकिस्तान मीडियावरून चालू आहे. पण तसे कोणतेही पुरावे पाकिस्तानला जगापुढे मांडता आलेले नाहीत. पाकिस्तामधील दहशतवादी केंद्रांवर भारताने केलेल्या हल्ल्याला ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव स्वत: मोदींनी दिले होते. ऑपरेशन सिंदूरचा आराखडा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी तयार केला असला तरी त्यावर पूर्ण देखरेख मोदींची होती. महिलांना त्यांच्या डोळ्यांदेखत त्यांच्या पतींना गोळ्या घालून दहशतवाद्यांनी ठार मारले असे भयानक हत्याकांड यापूर्वी कधी झाले नव्हते. मुंबईवर २६/११ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोनशे नागरीकांचा मृत्यू झाला होता, त्यानंतर पहलगाम येथे दहशतवाद्यांनी नागरीकांवर केलेला हा मोठा हल्ला होता. पहलगाम हल्ल्यात महिलांसमोर त्याच्या पतीला कंठस्नान घातले होते. दहशतवाद्यांनी महिलांचे कुंकू पुसले. म्हणूनच ‘ऑपरेशन सिंदूर’ने त्या विधवा महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्या महिलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ने उरी, पठाणकोट, पुलवामा, पहलगाम याचा बदला घेतला आहे, पण ही लढाई संपलेली नाही. निवृत्त लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या भाषेत सांगायचे तर, ‘ऑपरेशन सिंदूर’ ही भारताच्या कारवाईची फक्त एक झलक आहे, पिक्चर अभी बाकी है…!