अमृतसर : भारताने पाकिस्तानमध्ये अतिरेक्यांच्या विरोधात केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ केल्यानंतर अमृतसरमध्ये ब्लॅकआऊट आणि मॉक ड्रिल करण्यात आले. संपूर्ण पंजाबमध्ये सुरक्षा पथकांना हाय अलर्ट देण्यात आला आहे. सुटीवर असलेल्या सुरक्षा पथकांच्या सदस्यांना तातडीने कामावर परत बोलावण्यात आले आहे. देशव्यापी नागरी संरक्षण सरावाचा एक भाग म्हणून, अमृतसर जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक सुरक्षा आणि तयारी सुनिश्चित करण्यासाठी ब्लॅकआऊट आणि मॉक ड्रिल केले. नागरिकांना महत्त्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नका आणि रात्री शक्यतो घरातच थांबा असे आवाहन करण्यात आले आहे. बुधवारी ७ मे रोजी रात्री साडेदहा ते अकरा असा अर्धा तास ब्लॅकआऊट करण्यासाठी पूर्ण अमृतसरचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला होता.
https://prahaar.in/2025/05/08/centre-calls-all-party-meeting-today-to-brief-leaders-on-operation-sindoor/
दिवसा हवाई हल्ला झाला तर त्याला प्रतिकार करणे हे रात्रीच्या तुलनेत सोपे जाते. यामुळे हवाई हल्ले हे अनेकदा रात्री केले जातात. रात्री हवाई हल्ला करणाऱ्या विमानांना नागरी वस्ती, महत्त्वाच्या इमारती, कारखाने, तेलसाठे आदी दिसू नये यासाठी ब्लॅकआऊट करतात. काळोखामुळे विमानांना शहर पटकन दिसत नाही आणि हल्ला टळण्याची शक्यता वाढते. याच कारणामुळे भारत – पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्राच्या सूचनेनुसार खबरदारीच्या उपायांचा सराव सुरू आहे. नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि बिहारसह अनेक राज्यांमध्ये बुधवारी ब्लॅकआऊट आणि मॉक ड्रिल करण्यात आले. ब्लॅकआऊटसाठी रात्री काही काळासाठी विजेचा पुरवठा खंडीत करण्यात आला होता. देशातील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये हा प्रयोग करण्यात आला. राजधानी नवी दिल्ली, अमृतसर, बाडमेर, सूरत, सिमला, पाटणा आदी शहरांमध्ये रात्री काही काळासाठी विजेचा पुरवठा खंडीत करुन ब्लॅकआऊटचा सराव करण्यात आला.