नवी दिल्ली : जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा भारत दौऱ्यावर आहेत. ते या दौऱ्याच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. नियोजीत कार्यक्रमानुसार जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा शुक्रवार ९ मे २०२५ रोजी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. ते उत्तर प्रदेशच्या जलद विकासाकरिता जागतिक बँक कशाप्रकारे मदत करू शकते या विषयावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा करणार आहेत. उत्तर प्रदेश सध्या एक ट्रिलियन डॉलर्सची (१०० अब्ज डॉलर्स) अर्थव्यवस्था उभारण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे.
उत्तर प्रदेशमधील हॉटेल ताज येथे जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा अनेक बैठका आणि कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमांमध्ये उत्तर प्रदेशचे सचिव मनोज कुमार सिंह पण उपस्थित असतील. संध्याकाळी अजय बंगा आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यात चर्चा होणार आहे. अजय बंगा रात्री मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सरकारी भोजनाचा आनंद घेतील.
लखनऊमधील कार्यक्रमांनंतर, जागतिक बँकेचे अध्यक्ष चिन्हाट ब्लॉकमधील टेक-होम रेशन प्रकल्पाला भेट देतील. बाराबंकीतील राजौली येथे जातील, जिथे ते मधमाशी पालन केंद्राला भेट देतील आणि आत्मनिर्भर महिलांशी संवाद साधतील. बंगा दिल्लीला परत जाण्यापूर्वी हॉटेल ताज येथे एका कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. यानंतर ते दिल्लीला रवाना होणार आहेत.