बुधवारी मॉक ड्रिल होणार म्हणजे नक्की काय होणार ? ६५ आणि ७१ च्या आठवणी ताज्या

Share

नवी दिल्ली : पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारत – पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने देशात निवडक ठिकाणी बुधवार ७ मे २०२५ रोजी नागरी संरक्षण मॉक ड्रिल घेण्यास सांगितले आहे. सायरन वाजवून चाचणी घ्या, असे निर्देश देण्यात आले आहेत. हा आदेश येताच जुन्या पिढीतील अनेकांच्या १९७१ आणि १९६५ च्या लढाईच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

सायरन वाजताच पळापळ व्हायची. जो – तो सुरक्षित जागा गाठायचा. सर्व काचांना काळ्या रंगाचे पडदे लावले जायचे. घरातला प्रकाशाचा एकही किरण बाहेर जाणार नाही याची काळजी घेतली जायची. वडीलधारी मंडळी धुम्रपान करण्यालाही विरोध करायची. नकळत तेवढा प्रकाश एखाद्या हवाई हल्ल्याचे कारण ठरू शकेल. बॉम्ब पडेल या भीतीमुळे ही खबरदारी घेतली जायची. लढाई सुरू असताना रात्री ब्लॅकआऊट असायचा, नागरिकांना रस्त्यावर येण्यास मनाई असायची; अशा आठवणी अनेकजण सांगतात.

हवाई हल्ल्याचे सायरन हे कारखान्यांमध्ये वाजवल्या जाणाऱ्या सायरनसारखेच असतात. युद्धादरम्यान सर्वत्र सायरन लावले जातात. सायरन अशा प्रकारे बसवले जातात की जास्तीत जास्त लोकांना सहज ऐकू जाईल. शत्रू हवाई हल्ला करणार असे जाणवू लागताच सायरन वाजू लागतात. सगळ्यांना सावध केले जाते. सायरन वाजताच स्वतःचे रक्षण कसे करायचे याचे प्रशिक्षण दिले जाते. मॉक ड्रिलमध्ये सायरन वाजल्यावर काय करायचे हे अधिकारी समजावून सांगतात.

महाराष्ट्रात १६ ठिकाणी बुधवार ७ मे २०२५ रोजी मॉक ड्रिल होणार आहे. शत्रूने हवाई हल्ला केल्यास स्वतःचे आणि जमल्यास इतरांचे कसे संरक्षण करायचे याचे प्रशिक्षण महाराष्ट्रातील मॉक ड्रिल दरम्यान दिले जाणार आहे. युद्धजन्य परिस्थितीसाठी राज्यातील नागरी आणि लष्करी यंत्रणा किती सज्ज आहे याचीही तपासणी केली जाणार आहे. ब्लॅकआऊट कसे करायचे आणि ब्लॅकआऊट काळात कसे वागावे याचेही प्रशिक्षण दिले जाणार आहे.

भारतातील २४४ जिल्ह्यांमध्ये मॉकड्रिल होणार आहे. यात महाराष्ट्रातील १६ ठिकाणांचा समावेश आहेत. महाराष्ट्रात मुंबई, उरण आणि तारापूर येथे कॅटेगरी वनची मॉकड्रिल होणार आहे. ठाणे, पुणे, नाशिक, रोहा – धाताव – नागोठणे, मनमाड, सिन्नर, थळ वायशेत, पिंपरी – चिंचवड येथे कॅटेगरी टूची मॉकड्रिल होणार आहे. छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे कॅटेगरी थ्रीची मॉकड्रिल होणार आहे.

मॉक ड्रिल सुरक्षा प्रशिक्षणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या ड्रिलमुळे व्यक्ती आपत्कालीन परिस्थितीत स्वतःला आणि शक्य असल्यास इतरांना वाचवण्यास सक्षम होते. दुखापत किंवा नुकसान होण्याचा धोका कमी करण्यास मदत होते. लढाईची शक्यता असल्यास नागरी संरक्षण मॉक ड्रिल घेतल्या जातात. यात प्रामुख्याने हवाई हल्ल्यापासून स्वतःचे रक्षण करणे, इमारतीची पडझड झाली अथवा आग लागली तर स्वतःचे आणि जमल्यास इतरांचे रक्षण करण्यासाठी प्रशिक्षण दले जाते. आग विझवण्यासाठी करायच्या मदतीचे आणि वैद्यकीय पथकाला करायच्या मदतीचे प्रशिक्षण निवडक सदस्यांना दिले जाते.

ब्लॅकआऊट म्हणजे काय ?

ब्लॅकआऊट म्हणजे पूर्ण अंधार. सर्व दिवे बंद. रात्रीच्या वेळी जेव्हा जेव्हा सायरन वाजतो तेव्हा कुठेही दिवे दिसू नयेत. प्रकाशाचा अंधुकसा किरणही दिसू नये याची खबरदारी घेतली जाते. हवाई हल्ल्यापासून संरक्षणासाठी हा उपाय करतात. जर तुम्ही घराच्या आत काम करत असाल आणि तुम्हाला प्रकाशाची गरज असेल तर सर्व खिडक्या काळ्या पडद्याने झाकून टाकतात.

प्रकाशात शत्रूचे विमान लांबून दिसू शकते. यामुळे अनेकदा विमान हल्ले हे रात्रीच्या वेळी होतात. शत्रूच्या लढाऊ विमानाला रात्री आकाशातून जाताना खाली प्रकाश दिसणार नाही, नागरी वस्तीचे अस्तित्व लक्षात येणार नाही याची काळजी घेऊन मनुष्यहानी टाळण्यासाठी ब्लॅकआऊट करतात.

इस्रायलची लोकसंख्या भारताच्या तुलनेत कमी आहे. यामुळे तिथे प्रत्येक इमारतीखाली मोठे भक्कम बंकर बांधले जातात. भारतात सीमेजवळ ग्रामस्थांसाठी बंकर आहेत. पण देशात इतरत्र अशी व्यवस्था नाही. १९६५ आणि १९७१ मध्ये युद्धाच्या आधी तणाव वाढू लागताच देशात ठिकठिकाणी खंदक खणण्यात आले. सायरन वाजताच सर्वजण आपापल्या खंदकांकडे जात असत. जिथे खंदक नव्हते तिथे लोक जमिनीवर झोपायचे. रस्त्यावर जी काही वाहने धावत असत ती एका बाजूला पार्क करायची आणि संपूर्ण रस्ता रिकामा व्हायचा. आता पुन्हा तशीच तयारी करावी लागेल, असे तज्ज्ञ सांगत आहेत.

मॉक ड्रिल म्हणजे काय ?

वैद्यकीय आणीबाणी, भूकंप, आग, स्फोट, हवाई हल्ला अशा आणीबाणीत स्वतःच्या रक्षणासाठी करायच्या उपायांचा प्रत्यक्ष कृती करुन केलेला सराव म्हणजे मॉक ड्रिल.

मॉक ड्रिलचे प्रकार

विविध प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितींना तोंड देण्यासाठी मॉक ड्रिल अर्थात कवायती केल्या जातात. यातील निवडक मॉक ड्रिलचे प्रकार

  1. अग्निशमनची मॉक ड्रिल : जिथे आग लागली आहे त्या इमारतीमधून सुरक्षित बाहेर पडण्याची, इमारत वेगाने रिकामी करण्याची आणि आग विझवण्याची कवायत
  2. भूकंपासाठीची मॉक ड्रिल : भूकंप होत असल्यास स्वतःला वाचवणे, ज्या इमारतीत आहोत ती इमारत वेगाने रिकामी करण्याची कवायत
  3. वैद्यकीय आपत्कालीन मॉक ड्रिल : हृदयविकाराचा झटका, गंभीर दुखापत किंवा इतर वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठीची मॉक ड्रिल
  4. केमिकल स्पिल मॉक ड्रिल : घातक घन पदार्थ किंवा रसानय यांची गळती झाली अथवा ते सांडले तर त्या पासून स्वतःला आणि इतरांना वाचवणे, परिसराचे निर्जंतुकीकरण करणे, घातक पदार्थाचा वा रसायनाचा कमीत कमी त्रास व्हावा यासाठी तातडीने उपाय करणे याची मॉक ड्रिल
  5. अ‍ॅक्टिव्ह शूटर ड्रिल : वेगाने धावणे, लपणे किंवा लपविणे किंवा बचाव करणे याची मॉक ड्रिल
    इव्हॅक्युएशन ड्रिल : कोणत्याही अनिश्चित आपत्कालीन परिस्थितीत इमारती रिकाम्या करुन सुरक्षित ठिकाणी गर्दीचे व्यवस्थापन करण्याची मॉक ड्रिल

Recent Posts

रोहित पर्व विसावले

भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…

29 minutes ago

युद्ध सुरू : नागरिकांसाठी जागरूकता

युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…

39 minutes ago

रोहित शर्मा:रॅग्ज टु रिचेस कहाणी

उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…

59 minutes ago

India Pakistan War News : पाकड्यांना भारताचे जोरदार प्रत्युत्तर! कराची बेचिराख!

सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…

1 hour ago

रेस्टॉरंटमधील सर्व्हिस चार्ज: एक अनुचित वसुली

मधुसूदन  जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…

1 hour ago

India-Pakistan war: भारताच्या कारवाईला अमेरिकेचे समर्थन, पाकिस्तानला फटकारले

नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…

2 hours ago