मुंबई : मुंबई महानगरपालिका क्षेत्रात दररोज अंदाजे ६ हजार ५०० मेट्रिक टन घनकचरा गोळा केला जातो. या कचऱ्यापैकी ९० टक्के कचरा हा कांजूरमार्ग कचराभूमीवरच टाकला जातो. मात्र, मुंबई उच्च न्यायालयानं कांजूरमार्ग कचराभूमीची जागा वनक्षेत्र म्हणून घोषित केल्याने तात्काळ नवे डंपिंग ग्राऊंड उभारणे ही महापालिकेसाठी जवळपास अशक्य गोष्ट आहे. त्यामुळे मुंबईत दिवसाला जमा होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट आता कुठे लावायची?, हा यक्ष प्रश्न महापालिकेसमोर आहे.
मुंबई महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या चार कचराभूमींपैकी बोरिवलीतील गोराई कचराभूमी २०१७ बंद करण्यात आली. त्यानंतर आता मुलुंड कचराभूमी बंद करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यामुळे मुंबईतील सर्व घनकचरा पूर्व उपनगरातील देवनार आणि कांजूरमार्ग येथील कचराभूमीवरच नेऊन टाकला जातो. मुंबई महापालिकेच्या कचरा गाड्या दररोज ९५० फेऱ्या मारून हा कचरा कांजूर व देवनार कचराभूमीवर टाकतात. देवनार कचारभूमीची क्षमता मर्यादित असल्याने तिथे ५०० ते ६०० मेट्रिक टन कचरा टाकला जातो, तर मुंबईचा ९० टक्के कचरा हा कांजूरमार्ग कचराभूमीवर नेऊन टाकला जातो.
https://prahaar.in/2025/05/03/rains-will-arrive-in-kerala-on-june-1-and-in-maharashtra-on-june-7-8/
जुन्या कचऱ्यावर प्रक्रिया करून कांजूरमार्गची जागा रिकामी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेला तीन महिन्यांचा कालावधी दिला आहे. मात्र, महापालिकेकडून या कचराभूमीचा होणारा वापर आणि सध्याच्या घडीला पर्याय उपलब्ध नसणे, या गोष्टींमुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याशिवाय महापालिका प्रशासनाकडे दुसरा पर्याय उपलब्ध नाही. मुलुंड कचराभूमी बंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे, त्यामुळे तिथं नवा कचरा टाकता येणार नाही. देवनार कचराभूमीची जागाही धारावी प्रकल्पासाठी मागितली गेली आहे. त्यातच कांजूरमार्ग कचराभूमीही बंद करावी लागल्यास महानगरपालिकेकडे पर्यायी जागा उपलब्ध नाही.
नवीन जागा शोधण्याचे युद्धपातळीवर आव्हान
भविष्यात वाढत्या लोकसंख्येमुळे महापालिकेसमोर घनकचऱ्याची समस्या अतिगंभीर होणार आहे. शहरालगत असलेल्या कचराभूमी एकामागोमाग बंद कराव्या लागल्यामुळे कचराभूमीसाठी नव्या पर्यायी जागा शोधणे हे महापालिकेसमोरील मोठे आव्हान असणार आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी महापालिकेने आधीच मुलुंडमधील ५६ एकर जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. ज्यात मुलुंड कचराभूमीच्या ४१.३६ एकर जागेचा समावेश आहे. तर देवनार कचराभूमीची १२४.३ एकर जागाही धारावी पुनर्वसनासाठी देण्याचा निर्णय नुकताच झालेला आहे. त्यामुळे आता मुंबईतील घनकचरा विल्हेवाटीसाठी कुठे नेऊन टाकायचा? हा महापालिकेसमोरील सर्वात मोठा प्रश्न आहे.