लखनऊ: उत्तर प्रदेशच्या अमेठी जिल्ह्यातून हैराणजनक बातमी समोर आली आहे. येथे एका लग्न समारंभादरम्यान तंदुरी रोटी आधी घेण्यावरून झालेल्या वादात दोन तरूणांना आपला जीव गमवावा लागला. सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवले. ही धक्कादायक घटना बलभद्रपूर गावात घडली. येथे एका शुल्लक गोष्टीने हिंसक रूप गाठले आणि कुटुंबाचा आनंद दु:खात रुपांतरित झाला.
खरंतर ही घटना शनिवार संध्याकाळची आहे. येथे बलभद्रपूर गावात राहणारे रामजियावन वर्मा यांच्या मुलीचे लग्न होते. वरात शांततेत आली होती. तसेच लग्नाच्या प्रथा सुरू होत्या. मात्र जशी जेवण्याची वेळ झाली आणि तंदुरी रोटी वाढायला सुरूवात करण्यात आली. या दरम्यान १८ वर्षीय रवी कुमार उर्फ कल्लू आणि १७ वर्षीय युवक आशिष कुमार यांच्यात वादावादी सुरू झाली. हा शुल्लक वाद पाहता पाहता इतका वाढला की दोन्ही तरूण काठीने हाणामारी करू लागले.
या हिंसक वादात आशिषचा जागीच मृत्यू झाला तर गंभीररित्या जखमी झालेल्या रवीला लखनऊच्या ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आले. मात्र रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. या बातमीमुळे आनंदी कुटुंबामध्ये शोकाचे वातावरण पसरले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टेमसाठी पाठवले आहेत.