Categories: कोलाज

‘रात्रीस चांदण्यांचे, सुचते सुरेल गाणे…’

Share

नॉस्टॅल्जिया – श्रीनिवास बेलसरे

गदिमा, शांता शेळके, मधुकर जोशी, भा. रा. तांबे, सुरेश भट अशांच्या बरोबर मंगेश पाडगावकर म्हणजे मराठीतला आणखी एक चमत्कार! त्यांनी ज्या विषयावर कविता लिहिल्या आणि पुढे त्यांची अत्यंत लोकप्रिय गाणी झाली त्याची गणती नाही असेच म्हणावे लागेल. पाडगावकरांच्या कवितांचे विषय तरी किती?
‘अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी, लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती’,
‘हात तुझा हातातून धुंद ही हवा,

रोजचाच चंद्र आज भासतो नवा’यासारखी हळवी प्रेमगीते किंवा ‘जेव्हा तिची नि माझी चोरून भेट झाली, झाली फुले कळ्यांची झाडे भरात आली.’ आणि ‘भेट तुझी माझी स्मरते, अजून त्या दिसाची, धुंद वादळाची होती रात्र पावसाची’ सारखी धुंद प्रणयगीते, ‘डोळ्यांमधले आसू पुसती ओठावरले गाणे.’ ‘शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी’, डोळ्यांत सांजवेळी आणू नकोस पाणी, त्या दूरच्या दिव्यांना सांगू नको कहाणी’, आणि ‘धुके दाटलेले उदास उदास, मला वेढिती हे तुझे सर्व भास…’ सारखी भावूक विरहगीते लिहिणारे पाडगावकर कधी चक्क ‘सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का’ आणि ‘पुस्तक नंतर वाचा, आता खेळा नाचा’सारखी बालगीतेही लिहीत,

बा. भ. बोरकरांच्या पंगतीला बसताना पाडगावकर ‘श्रावणात घननिळा बरसला, रिमझिम रेशीम धारा’सारख्या अतिरम्य, चित्रमय निसर्गकविता लिहित, तर त्यांच्या ‘अशी पाखरे येती’ सारख्या गाण्यातसुद्धा आलेली आईच्या प्रेमाचा महिमा सांगणारी ‘एक हात तो हळू थरथरला, पाठीवर मायेने फिरला, देवघरातील समयीमधूनी अजून जळती वाती…’ ही त्यांची ओळ कुणालाही हळवे करून टाकते. हा कवी हे एक आगळेच मिश्रण होते. त्यांनी कोळीगीते लिहिली,
‘भावभोळ्या भक्तीची ही एकतारी, भावनांचा तू भुकेला रे मुरारी’,
‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे, तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे.’,
सारखी अस्सल भक्तीगीते लिहिली.

जीवनाबद्दल वेगळाच विचार मांडून काहीसे हलकेफुलके तत्त्वज्ञान देणाऱ्या ‘दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्यावाचून झुलायचे’ आणि ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे.’ सारखी आशयघन प्रेरणादायी गाणी मंगेशजींचीच! त्यांनी लिहीलेली सर्वच विषयांवरची गाणी अप्रतिम ठरली आहेत.
जेव्हा समाज सुस्थिर होता, बहुतेक नैसर्गिक भावभावना निकोप असत, सामाजिक नितिमत्ता अबाधित होती त्यावेळच्या भावूक प्रेमिकांच्या कथा लिहाव्यात, तर पाडगावकरांनीच! होय ‘कथा’! अगदी २/३ कडव्यांच्या कवितेतही हा माणूस एखादी संपूर्ण प्रेमकथा सांगून जायचा, तेही तिचे सगळे पदर कवेत घेऊन. याच नाजूक, हळव्या प्रेमकथांचा अंत अनेकदा विरहात, कायमच्या ताटातुटीत होणे जेव्हा सार्वत्रिक होते त्याकाळी त्यातून येणाऱ्या वेदनादायी विरहाचे दु:ख, बोच, हुरहूर अत्यंत संयतपणे व्यक्त करावी तीही पाडगावकरांनीच!
प्रेमाच्या कथेची सुरुवात ते तिचा सुखद आणि अगदी दु:खद शेवट इथपर्यंत, कधी रोमँटिक, खेळकर सुरुवातीपासून ते समंजसपणे घेतलेल्या कायमच्या निरोपापर्यंतचे एकेक क्षण, भावनेच्या आंदोलनाचे एकेक पदर, पाडगावकर शब्दांच्या कॅमेऱ्याने टिपून रसिकांपुढे जणू एक अल्बमच
ठेवत असत.

त्यांचे असेच एक भावगीत खूप लोकप्रिय आहे. उर्दू शायरीत जशा प्रेमिकांच्या मनातल्या नाजूक लहरी, त्यांच्या केवळ परस्परांनाच समजणाऱ्या लोभस अदा चित्रित होतात तसे त्यांच्या या गीतात दिसते. साधे तिचे लाजणे आणि सहजच सस्मितपणे कवीकडे पाहणे हाच पाडगावकरांनी कवितेचा विषय करून टाकला! प्रियेच्या एकेका हावभावाचा अर्थ ते काढतात. अर्थात तो त्यांना अनुकुल असाच निघणार. म्हणून ते पहिल्याच ओळीत म्हणतात –
‘लाजून हासणे अन् हासून हे पाहणे, मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे.’
जणू प्रिया लाजते तेही तिचे खरे लाजणे नाहीच आणि तिने कवीकडे हसून पाहिले तर तोही एक बहाणाच! मात्र कवीच्या मनात तिच्या या दोन्ही अदा काहूर माजवून ठेवतात. रात्री निद्रेच्या अधीन होताना तिचे रूप आठवण्यासाठी पापण्या उघड्या ठेवणे कवीला जड वाटू लागते आणि त्या मिटताच तिचा चंद्रासारखा विलोभनीय चेहरा डोळ्यांसमोर येतो. हे सगळे स्वप्नवत अवस्थेतच का शक्य होते, तिची प्रत्यक्ष भेट का होत नाही? ती समोर असताना असे का घडत नाही अशा जीवघेण्या प्रश्नाची उत्तरे मला सापडत नाहीत अशी कवीची तक्रार आहे.
‘डोळ्यांस पापण्यांचा का सांग भार व्हावा?
मिटताच पापण्या अन् का चंद्रही दिसावा?
हे प्रश्न जीवघेणे हरती जिथे शहाणे,
मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे.’
मग कवी आपले खरे दु:ख सांगतो. तो म्हणतो, ‘प्रिये, तुझ्या धनुष्याकार पापण्या फार घातक आहेत. तिथूनच तर माझ्यावर बाणांचा वर्षाव होत असतो. असे धनुष्य तुझ्याकडे आहेत त्यात तुला आमची दु:खे कशी कळणार? ज्याच्या हृदयात तुझ्या नजरेचे बाण शिरतात, रुतून बसतात ना, त्यांनाच ते कळू शकते! तू चोरून टाकलेला एखादा कटाक्षही किती घायाळ करून जातो ते तुला कसे कळणार?
‘हाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे? हृदयात बाण ज्याच्या त्यालाच दुःख ठावे!
तिरपा कटाक्ष भोळा, आम्ही इथे दिवाणे, मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे.’
ती अभावितपणे नुसती समोरून गेली तरी प्रियकराला शुक्रासारखा एखादा तेजस्वी तारा उगवल्याचा भास होतो. जणू फुलांच्या देशातून सुंगधी वाऱ्याची झुळूक यावी तसे तिचे येणे आणि जाणे असते. तिच्या दर्शनाने भर उन्हातसुद्धा चांदणे पडल्यासारखे वाटू लागते. गाणी सुचू लागतात.

‘जाता समोरुनी तू उगवे टपोर तारा, देशातूनी फुलांच्या आणि सुगंध वारा.
रात्रीस चांदण्याचे सुचते सुरेल गाणे, मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे.’
तारुण्यातील प्रेमाच्या, प्रियाराधनाच्या किती नाजूक अस्पष्ट छटासुद्धा हा कवी टिपतो ते पाहिले की पुन्हा मागे जावून ती धुंदी, तो वेडेपणा, ते हरवलेपण, प्रसंगी अगदी ती दु:खेसुद्धा अनुभवावी असे वाटू लागते. आपल्याबरोबर रसिकाला त्याच मनस्थितीत केव्हाही कुठेही घेऊन जाऊ शकण्याचे सामर्थ्य अशा सिद्धहस्त कवींच्याजवळच असते. त्यांचे शब्द एखाद्या संमोहन-तज्ज्ञासारखे रसिकांवर जादू करतात, मोहिनी टाकतात आणि घटकाभर का होईना काळावर विजय मिळवून तारुण्यातील धुंदीच्या पुन:प्रत्ययाचा आनंद देतात. म्हणून तर
हा नॉस्टॅल्जिया!

Recent Posts

रावळपिंडी स्टेडियम उद्ध्वस्त; भारताच्या ड्रोन हल्ल्याने पाकिस्तान हादरला!

पाकिस्तान सुपर लीगमधील सामना रद्द, परदेशी खेळाडूंनी केली देश सोडण्याची तयारी! कराची : पाकिस्तानातून आलेल्या…

17 minutes ago

Mumbai Rain Update: मुंबईकरांना अवकाळी पाऊसाने झोडपले, ‘या’ भागात यलो अलर्ट

मुंबई: दोन दिवसांपासून अचानक हजेरी लावलेल्या अवकाळी पावसामुळे, मुंबईकरांची चांगलीच धावपळ उडाली आहे. आजही मुंबईत…

40 minutes ago

१६ वर्षांपूर्वीचा बॉम्बस्फोट, पण अजूनही निकाल नाही!

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल ३१ जुलैपर्यंत लांबणीवर मुंबई : संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या २००८ मधील मालेगाव…

49 minutes ago

नालेसफाई नव्हे, ही तर भ्रष्टसफाई! पालकमंत्री आशिष शेलार यांचा थेट हल्ला

मुंबई : "३५ दिवसांत फक्त १० टक्के नालेसफाई? मग उरलेली रक्कम कुठं गेली?" असा थेट…

1 hour ago

‘ऑपरेशन सिंदूर’ अजूनही सुरुच! दहापट उत्तर देणार, पाकिस्तानची घाबरगुंडी, केंद्राची सर्वपक्षीय ताकद एकवटली

नवी दिल्ली : भारताच्या यशस्वी ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरही पाकिस्तानकडून शस्त्रसंधी उल्लंघन थांबलेले नाही. या पार्श्वभूमीवर केंद्र…

2 hours ago

Operation Sindoor : पाकव्याप्त काश्मीरमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’!

पाकिस्तानची दोन लढाऊ विमाने नष्ट देशभरात मॉकड्रील करण्यापूर्वीच भारताने पहलगाम हल्ल्याचा सूड उगवलाय. पाकिस्तान झोपेतून…

2 hours ago